देशातील महत्त्वाच्या घटनांचे कालक्रमानुसार तथ्यात्मक
वर्णन व तिचे स्पष्टीकरण म्हणजे इतिहास होय. इतिहास हा कल्पनांचा बाजार नसतो, तर त्याची निर्भरता हि पुराव्यावर आधारित
असते. जिथे पुरावे नसतात तेथे “असे म्हटल्या जाते, अशी
प्रथा आहे” अशा वाक्यांनी पडदा टाकला जातो. असे कांगोरे इतिहासाच्या चौकटीत बसणारे नसतात. परंतु
दुर्दव्याने आपल्या देशात असेच चालत आले आहे. यालाच मिथके म्हणतात. या मिथकांना
पुराव्यांची, प्रत्यक्ष चाचपणीची व सत्यस्थितीची गरज
नसते.
आपल्या देशात “इतिहासाचे पुनर्लेखन” या नावाखाली शालेय अभ्यासक्रम बदलविण्यात येत आहे. जुने न काढता त्यात अधिक भर टाकणे हे
समजण्यासारखे आहे. इतिहासाचे पुनर्लेखन याचा अर्थ आजपर्यंत शिकविला जाणारा इतिहास
नकली वा बनावट होता का?. नवी उत्खनने,
स्मारके, अभिलेख व सिक्के अशी जुनी तथ्यात्मक
साधने सापडल्यास त्यांची इतिहासात भर घालून इतिहास अधिक समृध्द करता येतो. परंतु
इतिहासाला मिटवून त्याचे पुनर्लेखन करता येत नाही. परंतु तसे झालेच तर अशा इतिहास
पुनर्लेखनात काल्पनिक, असत्य घटनांचा अंतर्भाव करून आपल्या
सोयीची मांडणी करण्याचा धोका संभवत असतो.
इतिहासाचे लेखन करण्याची
सुरुवात सुमेर (दक्षिण मेसोपोटेमिया) येथे ई.स.पूर्व ३१०० वर्षात झाली. भारतात
कल्ह्ण लिखित राजतारांगिनीच्या पूर्वार्धात इतिहासिक ग्रंथाचा अभाव दिसतो. ज्या
काळात लेखन कलाच अवगत नव्हती त्या काळाच्या आधारहीन घटनांना इतिहास म्हणून
स्वीकारणे हे अयोग्यतेच्या शेऱ्यात मोडणारी बाब आहे. पाषाणकाळापासून इसवी सन पूर्व
चौथ्या शताब्दी पर्यंत भारतात लेखनकला व तिच्या साधनाचा अभाव होता. भारतात सिंधू
सभ्यतेच्या अस्तित्वाचा पुरावा जसा उत्खननातून मिळतो तसा आर्य संस्कृतीच्या
अस्तित्वाचा पुरावा दिसत नाही. बऱ्याच काळानंतर तो लीपिबध्द केला गेल्यामुळे आर्य
संस्कृतीचे पुरावे भूगर्भाच्या आत दिसत नाही.
भारतातील प्राचीन अभिलेख हे
दगडावर कोरलेले असून ते मुख्यत: ब्राम्ही व खरोष्ठी भाषेत आहेत. भारतात असे अभिलेख
(शिलालेख,स्तंभलेख,गुहालेख
इत्यादी) लिहिण्याची परंपरा हि सम्राट अशोक काळापासून सुरु झाली. एशिया माईनरच्या
बोगाज कोई अभिलेखावरून (Bogaz-Koi inscription) ई.स.पूर्व
१४०० च्या आसपास आर्यांचे क्षेत्र व वैदिक वेदाची माहिती मिळते. तसेच डेरीयसच्या
(ई.स.पूर्व ५२२-४८६) नक्ष-ए-रुस्तम अभिलेखावरून आर्य पुढे सरकत उतर पंजाबमध्ये
आल्याचे कळते. मिश्रमधील एल-अमरना येथे मिळालेल्या मातीच्या मोहऱ्यावर कोरलेल्या
बेबिलोनिया शासकांची नावे आर्यांच्या नावाशी साम्यता दिसते. यावरून आर्यांच्या मूळ
स्थानांचे अनुमान काढता येते.
राष्ट्रीय दृष्टीकोनातून इतिहास
पुनर्लेखन हवे असा हव्यास सध्या चालू आहे. इतिहास हा केवळ राष्ट्रीय
दृष्टिकोनातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातूनही विद्यार्थी व समाजापुढे
मांडला पाहिजे. कारण हे स्पर्धेचे जग आहे, म्हणून
इतिहास हा प्राचीन व अर्वाचीन स्थितीमधील शिकविला गेला पाहिजे. हे खरेही आहे कि,
इतिहास हा सत्य घटनेची परिभाषा असते. परंतु तथ्य व ऐतिहासिक
साधनाशिवाय काही गोष्टीना इतिहास म्हणून बळजबरीने घुसडणे व खऱ्या ऐतिहासिक
दास्ताऐवजाना बाहेर फेकून देणे हे इतिहासाच्या मापदंडात बसणारे नसते. खरा संघर्ष
तो इथे आहे.
भारताला १९४७ ला स्वातंत्र्य
मिळाले. त्यानंतर भारतीय इतिहासकारांनी इतिहास लेखन केले. या इतिहास लेखनात साधने
म्हणून ब्रिटीशांनी केलेले संशोधन (उत्खनन, सर्वेक्षण,
अभिलेख, शिक्के) व पाश्च्मात्य देशातून आलेले
युनानी तथा रोमन लेखक, चीनी लेखक (इत्सिंग, फाह्यान, ह्यूनत्सांग) व अरब लेखक अल्बेरुनी
सारख्या प्रवासी लेखकांच्या दस्तावेजांचा वापर झाला. याबरोबरच वैदिक,
बौध्द व जैन सारख्या धार्मिक साहित्याचा
सुध्दा साधने म्हणून वापर झाला. परंतु या धर्माच्या साहित्यातील संपूर्ण
लेखदर्शनाला इतिहास म्हणता येत नाही. कारण यात अतिरंजित, काल्पनिक
व स्थितीवीरपेक्ष घटना आहेत. बौध्द व जैन धर्माशी
निगडीत वास्तू जमिनीखालील उत्खननात सापडतात. परंतु वैदिक धर्मासंबंधी तसे कुठेही
दिसत नाही. त्यामुळे वैदिक साहित्यापैकी काहींची निर्मिती आर्यांच्या मूळ वस्तीस्थानात निर्माण झाली असावी तर उर्वरित साहित्य भारत प्रवेशानंतर लिहिले गेले. काही वैदिक साहित्यात तर्काधित
गोष्टी सापडत नसून त्या अतिरंजित, अवैज्ञानिक व विश्वास न बसण्यासारख्या काल्पनिक वाटतात. म्हणूनच यातील सबंधित बाबींना
इतिहास मानता येत नाही.
ज्या राष्ट्रवादाच्या नावे इतिहासाचे पुनर्लेखन घडवून
आणायचे आहे, तो राष्ट्रवाद धर्मसंकल्पनावर आधारित
व्यवस्था आणि दैवतीपणाचे पुनरुज्जीकरण करणारा नसला पाहिजे. एकाच राष्ट्रात राहणार्या
अनेकविध लोकांचा सांस्कृतिकरणाच्या प्रक्रियेतून समभावनेने एकमेकात रमण्याचा,
सहजीवन जगण्याचा आणि आपापसात एकोपा कायम राखण्यासाठी निर्माण झालेली
व्यवस्था म्हणजे “राष्ट्रवाद” होय. अशा राष्ट्रवादाचे प्रतिबिंब राष्ट्रीय शिक्षणात
उमटले पाहिजे. ज्या राष्ट्रवादाच्या नावाखाली द्वेषवाढ, विषमता, पूर्वगौरव व
दैवतीकरणाच्या सोबत हिंसा घडविली जाते, तो निश्चितच
राष्ट्रवाद नसतो. तर ती राष्ट्रवादाचा द्वेषपूर्ण ‘शब्दच्छल’ करून सतत सत्ताधारी बनून राहण्यासाठीची किमया असते. सत्तेच्या हव्यास्यापोटी जनतेची फसवणूक करीत राहणे हे छद्म
राष्ट्रवाद्यांचे अंतिम ध्येय असते. छद्म राष्ट्रवादी हे सुधारणांचे, समतेचे व बहुविध संस्कृतीचे शत्रू असतात.
इतिहास हा छद्म राष्ट्रावादानी
प्रभावित न होता, तो सत्य घटना,
तथ्य, तर्कशील व
खऱ्या मुल्यांकनाशी सबंधित असला पाहिजे. हल्लीचे युग विज्ञानाचे, नवनव्या अभियांत्रिकीचे, सूचनांचे व कृत्रिम
बुद्धिमत्तेचे (Artificial Intelligence) आहे. जगातील इतर
देश आधुनिक विचार स्वीकारून उन्नत होवू लागले आहेत. आपला देश व जनतेनेही यात मागे
राहता कामा नये याचा विचार व्हावयास हवा. पुराणातील वांगी बाहेर काढून देशाच्या
तरुण पिढीला मागासलेपणात ढकलण्याने देश प्रगत व सुधारणावादी कसा होईल? याचा विचार झाला पाहिजे. त्याऐवजी संपूर्ण भारतीय राज्यघटनेचे विविधांगी
भाग, विवेक व विज्ञानवाद अभ्यासक्रमातून
तरुण पिढीला व जनतेला शिकविल्यास ते त्यांच्या अधिकाराप्रती जागरूक होतील आणि
त्यातील दंडसंहिता व शिक्षेचे प्रावधान वाचून देशातील गुन्हेगारी कमी होत देशात
आनंददायित्व वाढेल.
ब्रिटिशांनी आपल्या
शिक्षणपद्धतींतून भारताच्या इतिहासाची मोडतोड केली आणि त्यांत विकृती, विसंगती, मिथके आणि
तथ्यहीन घटनांचा समावेश केला. या आरोपात तथ्य नाही. याउलट भारतीय संस्कृतीने
विवेकवादावर पडदा टाकीत मिथके, विकृती, विसंगती, अंधविश्वास, वर्णव्यवस्था,
जातीयवादाचा पुरस्कार करीत स्त्रिया व बहुजनांना खालच्या दर्जाचे
मानून हीन वागणूक दिली. त्यांच्या शिक्षणाच्या संधी हिसकावून घेतल्या. हे सर्व
बघूनच जेम्स मिल व विलियम आर्चर सारख्या लेखकांनी भारतीय संस्कृतीवर टीका केलेली
दिसते. या विसंगतीवर मात करण्यासाठी रानडे, ज्योतीराव फुले,
लोकहितवादी, आगरकर व रा.गो.भांडारकर यांनी विषमतापूरक पुर्वगौरववादी संस्कृतीला तिलांजली देत
तथ्य, तर्कशील व सुधारवादी इतिहासाचे
रोपण केले.
टिळक, सावरकर,
ए.सी.दास, अरविंद घोष यांनी एका नव्याच
राष्ट्रवादी विचारधारेला समोर केले. परंतु हि विचारधारा शोषणाधीष्ठीत
समाजव्यवस्थेची पाठराखण करणारी होती. ती पुर्वगौरववादी होती. आणि हा पूर्वगौरव
चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीयता, स्त्रीशोषण
व संस्कृतीरक्षणाच्या गोंडस नावाखाली धर्मांधता वाढविणारा होता. सावरकरांना
इतिहासकार म्हणून संबोधणे हा त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. सावरकर खरे तर एक
कथाकार होते. त्यांनी लिहलेली पुस्तके ही मसालेदार रंजक कथेच्या वर्गवारीतील आहेत.
अनुभवासाठी त्यांनी लिहिलेले सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचून बघितले पाहिजे.
शहराची व रस्त्यांची नावे बदलणे
हा क्रांतिकारी विचार नसून तो इतिहासाच्या पाउलखुणा पुसण्याचा जघन्य प्रकार होय.
इतिहासच बदलायचा आहे तर मग भारताचे पूर्वीचे नाव असलेले “जम्बूद्वीप” हे नाव ठेवण्यात आले पाहिजे. सनातनवादी व
पुर्वगौरववाद्यांना राष्ट्रवादाचे प्रवक्ते संबोधणे हा येथील बहुजन जनतेचा अपमान
करण्यासारखे आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली रामजन्मभूमीचे आंदोलन उभे केले परंतु
अयोध्येत झालेल्या उत्खननात रामजन्माचे काय पुरावे मिळाले हे अजूनही जनतेला कळू
दिले नाही. उत्खननात मिळालेल्या वस्तूचे प्रदर्शन का नाही भरविले? याला विवेकवाद म्हणावा कि मिथ्यावाद हे
जनतेला कळले पाहिजे.
भारत हा आक्रमित झालेला देश
आहे. भारतावरील आक्रमणाची सुरुवात आर्यापासून होत ती शक, हून, इस्लाम व
ब्रिटिशापर्यंत पोहोचते. यातील प्रत्येक शासनकर्त्यांनी येथे आपली प्रतीके रोवली.
मात्र या प्रक्रियेमध्ये मूळ भारतीयांची मूळ ओळख हरवलेली आहे. तिला शोधायचे
झाल्यास जंगलात, दऱ्यात, डोंगरात,
लेण्यात, गुहेत, जमिनीखालील
उत्खनणामध्ये शोधली पाहिजे. तीच खऱ्या भारतीय इतिहासाची कहाणी आहे. हेच खऱ्या
इतिहासाचे पुनर्लेखन ठरेल. हे करण्यास तथाकथित इतिहासबदलू आपला
बुद्धीप्रामाण्यावाद दाखवतील काय!
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment