Saturday, May 6, 2023

आदर्श समाजासाठी बुध्दाच्या विवेकवादाची गरज

भारतात ई.स.पूर्व सहाव्या शतकापर्यंत पुरोहितशाहीची किचकट धार्मिक कर्मकांडे, यज्ञामध्ये गायींची बळी प्रथा, धर्माज्ञाच्या नावाखाली दानासाठी शेतकऱ्याची पिळवणूक व त्यांच्या पशुधनाला पळवून नेण्यात येत असे. धर्मसंस्था मजबूत होवून स्वर्ग, देवता आणि अदृश्य शक्तिचे सारे नियंत्रण व पापपुण्यातून मुक्तीचे मार्ग केवळ ब्राम्हण पुराहिताद्वारेच व्हावी असा देवाचा आदेश असल्याचा दावा करण्यात येत होता. वैदिकांनी लिहिलेल्या धर्माशास्त्राना देवाची निर्मिती ठरवून त्याद्वारे समाजसंचालन करीत शास्त्राधारित सांस्कृतिकव्यवस्था निर्माण झाली होती. या व्यवस्थेने माणसात भेदाभेद करणारी जात व वर्णव्यवस्था निर्माण केली. स्त्रियांना घरी व समाजात सन्मानापासून वंचित करण्यात आले होते. ब्राम्हण पुरोहितांनी स्वत:ला देवाचे दूत घोषित केल्यामुळे गणराज्य व्यवस्थेतील राजे, सरदार व सामान्य जनतेसाठी  ब्राम्हण हेच दिशा देणारे नायक झाले होते. 

समाजात ब्राम्हणीव्यवस्थेने आपले स्थान मजबूत केल्यानंतर शोषणव्यवस्थेचे सत्र सुरु झाले. त्यामुळे बहुसंख्य समाजात आतून असंतोष निर्माण झाला असला तरीही त्याला व्यक्त होण्याची वाट मिळत नव्हती. ई.स. पूर्व सहाव्या शतकानंतर सिद्धार्थ गौतम (गौतम बुध्द)  यांचा उदय झाला. बुद्धाने यज्ञसंस्था व त्यात गाईच्या बळी देण्याच्या प्रथेवर टीका करीत शास्त्रातील धर्माज्ञावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी कर्मकांडे, आत्मा व देवाचे अस्तित्व नाकारत मानवी समाजात नैतिक आचरणाचे साधन म्हणून बुद्धिवादाचा अवलंब केला.

प्राचीन काळातील अंतर्गत धार्मिक संघर्ष 

भारताचा प्राचीन काळ हा सुवर्ण युगाचा व शांततेचा काळ होता असे सांगितले जाते. परंतु यात सत्यतेचा अभाव असून या काळात धार्मिक कलहाने परिसीमा गाठल्या होत्या. या काळात बौध्द व जैनांच्या कत्तली करण्यात आल्या. पुष्यमित्र शुंगाने (ई.स.पूर्व १८५) बौध्द भिक्षूच्या कत्तली केल्या. याच काळात अनेक भिक्षू दुसर्या देशात परांगदा झाले. ब्राम्हण पुरोहिताच्या सांगण्यानुसार सातव्या शतकात शशांक या राजाने गयेतील बोधी वृक्ष कापून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळातील राजांनी अनेक बौध्द व जैन स्तूपाचा विध्वंस करून त्या ठिकाणी मंदिरे उभारली. वैष्णवी कवी तीरुमकाईने बुध्दाच्या  सोन्याच्या  मूर्तीला वितळवून तिचे विष्णूच्या मूर्तीमध्ये रुपांतरीत केले. नंतरच्या काळात बौध्द धर्माला नष्ट करण्याचे उर्वरित कार्य मुस्लीम आक्रमककारांनी केले. त्यांनी तक्षशीला, नालंदा, विक्रमशीला, ओदान्तपुरी सारखी विद्यापीठे नष्ट केली. पण एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मुस्लिमांच्या राजवटीत वैदीक ब्राम्हणांनी वर्ण व जातीव्यवस्था अधिकाधिक मजबूत केली. मुस्लीम राज्यकर्त्यानी वैदिक ब्राम्हणांकडून बहुजन समाजाच्या होणाऱ्या शोषण व्यवस्थेत कधीही  हस्तक्षेप केला नाही. समाजसुधारणे करिता निघालेल्या समाजसुधारकांच्या वैदिकाकडून होणाऱ्या हत्यांना रोखले नाही. ब्रिटीश काळात १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्याद्वारे  हिंदू समाजव्यवस्थेत हस्तक्षेप न करण्याची हमी लिहून घेण्यात आली होती. याचा अर्थ वैदिकांनी लादलेल्या शोषणव्यवस्थेविरोधात बहुजन समाजात (हिंदू सामाज) असंतोष होता परंतु परकीय सत्तेच्या मदतीने तो दाबण्यात आला.  

बुध्दाचे विवेक व विज्ञानवादी विचार  

भारतात विवेकावादाचा उदय हा मुख्यत: बुध्दाच्या शिकवणुकीतून झाला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बुध्दाचा विचार हाच विवेकवाद होय. विवेक व वैज्ञानिक विचाराची सुरुवात व तिच्या उच्चतम टोकाचा काळ  हा ई.स.पूर्व ६०० ते ई.स.४०० पर्यंतचा समजण्यात येतो. बुद्धांनी सृष्टीतील भौतिक घडामोडी, तिची रचना व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर प्रस्थापित विचारांच्या विरोधी तर्कशुध्द विचार मांडले. त्यांना आंधळे शब्दप्रामाण्य मान्य नव्हते. तर प्रचीती, तर्क, अनुभव व परिणीती यांच्या पडताळ्यानेच कोणतीही गोष्ट मान्य केली पाहिजे असे म्हटले होते. समाजात दु:ख होते परंतु प्रचलित व्यवस्थेत त्याचे मूळ कारण सापडत नव्हते. सृष्टीतील नियमाच्या आकलनासाठी कर्मकांड व श्रद्धेऐवजी बुद्धीप्रामाण्याचा विचार व्हावा असे सांगत त्यांनी स्वर्ग, आत्मा व  पुनर्जन्म यास स्पष्टपणे नकार दिला, कारण त्यांना यांच्या अस्तित्वाची कोणतीही प्रचीती येत नव्हती. बुध्दाची ख्याती ऐकून एक स्त्री रडत आपल्या मृत झालेल्या मुलास जिवंत करण्यास घेवून आली. बुध्दाचा विवेक ऐकण्यास तयार नव्हती. बुध्द म्हणाले, ज्या घरी आजपर्यंत कोणाचाच मृत्यू झाला नाही त्या घरून मुठभर माती घेवून ये, मग मी मृत मुलास जिवंत करेल. तिने प्रत्येक घर शोधले पण कुठेही विनामृत्यू झालेले घर मिळाले नाही. ती हताशपणे  बुध्दाकडे परत आली. बुध्द म्हणाले, मरण हे अटळ असते, ते कोणालाही टाळता येत नाही आणि मेलेल्या व्यक्तीला कधी जिवंत करता येत नाही. अशा प्रकारे प्रचीतीतून त्यांनी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्म यास स्पष्ट नकार दिला. 

बुद्ध हे केवळ विवेकवादावर थांबले नाहीत तर त्यांनी धर्म संकल्पनांना बाजूला सारून मानवतावादाच्या कल्पना प्रगल्भ केल्या. नंतरच्या काळात बुध्दाच्या भूमिकेचे अनेक पाश्चात्य तत्ववेत्त्यांनी समर्थन केले. व्हाॅल्टेअर धर्मासंबंधी म्हणाले की, धर्म म्हणजे दुसर तिसर काही नसून बेदरकार बदमाशानी अज्ञ जनतेची निरंतर पिळवणूक करण्याकरिता जाणून बुजून रचलेला कट होय. नदीच्या काठावर बसलेल्या बुद्धाकडे एक व्यक्ती यज्ञ, होमहवन, पूजापाठ व मंत्राने सर्व काही साध्य करता येते असा दावा करू लागला. यावर बुद्ध म्हणाले, जर तुमच्या मंत्रतंत्र व पूजापाठात ताकद असेल, तर त्याद्वारे मला नदीच्या या काठावरून दुसऱ्या काठावर घेवून चल. मग, ब्राम्हण पुरोहित गांगारून हे कसे शक्य आहे? असे म्हणू लागला. नदीच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी बोटीचाच  वापर लागेल. तेव्हा बुध्दाच्या कार्यकारण तत्वज्ञानाने प्रभावित होत त्यांचे शिष्यत्व पत्करले. अशाप्रकारे बुध्दाने यज्ञ, पूजापाठ व मंत्राद्वारे माणसाच्या दैनंदिन क्रियेत बदल घडून येतो हे खोटे ठरवीले. एखाद्या गोष्टीची प्रचीती येत नसतानाही तिला मानणे हे ढोंग असल्याचे सांगत साधन व क्रीयापक्रीये द्वारेच प्रगती साधता येते हे सांगत प्रचलित धर्मधारनेला व पुरोहितांच्या भोंदुगिरीला छेद दिला. 

माणूस धर्मासाठी नव्हे तर धर्म माणसासाठी असतो 

वैदिक काळात बहुजन समाजाकडे स्वतंत्र विचाराचा परिपाठ नव्हता. पृथ्वीवरील जीवनापेक्षा स्वर्गातील मोक्षाचे जीवन हेच खरे जीवन असून ते प्राप्त करण्यासाठी या जीवनात शास्त्रानुसार कर्मकांडे व यज्ञासाठी दानधर्म  केले पाहिजे असे धर्मवाद्याकडून सांगण्यात आले. अशाच काळात बुध्दाचे मानवतेचे विचार बाहेर येतात. माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसाच्या विकास व कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे असे प्रतिपादन करतात.  बुध्दाने वैदिक धर्मासारखे  आपले विचार लोकावर लादले नाही तर मी जे सांगतो त्यावर दहा वेळा विचार करा. आंधळेपणाने न स्वीकारता ते विविध कसोट्यावर तपासल्यानंतरच त्याचा स्वीकार करा असे ते म्हणाले. गौतम बुद्ध यांचे घराणे हे राजेशाहीचे होते. त्यांनी स्वत:ला देवाचा अंश म्हणून घोषित केले असते तरी त्यांचे म्हणणे लोकांनी आंधळेपणाने स्वीकारले असते. पण तसे न करता त्यांनी मुक्त विचार पद्धती अंमलात आणली. त्यांनी सत्याचे सामर्थ्य व खोटेपणाच्या परिणामाची दुरावस्था  लोकांना पटवून दिली.  

बुद्धविचार  व भारतीय संविधान हे द्वेषमुक्तीचे साधन 

बुध्दाने दिलेली पंचशील तत्वे, चार आर्यसत्ये व आष्टांगीक मार्ग  हे केवळ चांगले जीवन जगण्याची तत्व नसून उत्कृष्ठ सामाजिक व्यवस्थानिर्मितीची आदर्श आचार संहिता होय. बुध्दाचा आष्टांगीक मार्ग म्हणजे अतिरेकी आचरणापासून स्वत:ला सावरण्याचा मध्यम मार्ग होय. हा मध्यम मार्ग म्हणजेच विवेकाधिष्ठित वैज्ञानिक दृष्टी होय. दु:खावर मात करण्यासाठी अतिमानवी शक्ती, ईश्वर वा देवता यावर विसंबून न राहता  स्वत:च्या प्रयत्नाने तो सोडविण्यावर भर देतात. बुध्दाने तृष्णेला दु:खाच्या कारणाचे मूळ सांगितले आहे. आणि तृष्णेवर मात करण्यासाठी आष्टांगीक मार्गाचा अवलंब म्हणजे प्रयोग, चिकित्सा  व तर्काने जीवनात  येणाऱ्या समस्यांवर मात करण्याची विवेकी वृत्ती होय. विवेकी वृत्ती हि सदैव चिकित्सक युक्तिवाद, अनुभवजन्य घटनांचे परिमार्जन ऐकण्यास तयार असते. विवेकाच्या श्रवणातून मानवी जीवन बहरत असते. कारण विवेक खोटेपणा व श्रद्धांचा भंपकपणा यातील फरक स्पष्ट करीत असतो. त्यामुळे जनमाणसात एकमेकाबाबत असलेली इर्षा व द्वेष याचे निराकरण होत सदभाव व बंधुभाव निर्माण होत सहचार्याची भावना वाढीस लागते. बुध्दाच्या विवेकावादाच्या तत्वाचे हे फलितच मानायला हवे.

बुध्दाच्या तत्वज्ञानाने मोडकळीस आलेल्या वैदिकांच्या चातुर्वण्य, यज्ञसंस्था व जात व्यवस्थेने शुंग व गुप्त राजांच्या कालखंडात उचल खाल्ली. ब्रिटीश काळापर्यंत ती व्यवस्था अबाधित राहिली. १९५० ला भारतीय संविधान लागू झाल्यानंतर धर्माची आयुधे गळून पडायला लागली होती. संविधानाच्या अंमलबजावनीने बोथट झालेली वर्ण व जातव्यवस्था आधुनिकीकरनाच्या नव्या युगात  कालबाह्य होवून समता प्रस्थापित होईल अशी धारणा होती. परंतु काही वर्षात हि धारणा सपशेल फेल झालेली दिसते. जातीय वर्चस्व व सत्ताकारणाची अभिलाषा यांचा मोह काही घटकांना आवरता येत नाही. त्यासाठी धर्मद्वेष व राजकीय सत्तेला साधन बनवून कर्मकांडे, यज्ञसंस्कृती, वर्ण जातव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व त्याचे उदात्तीकरण करण्याचे अराष्ट्रीय अभियान सुरु आहे. अशा अभियानाने देशाला वैज्ञानिक दृष्टीपासून दुरावत मागासलेपणाच्या अंधारकोठडीत ढकलले जाणे हा अदूरदृष्टीपणा होय. धर्मांध लोकांच्या हातात तलवारी दिसू लागल्या आहेत. याचे परिणाम अंतर्गत कलह व अस्थिरतेमध्ये होत समता, बंधुता व आपसातील सदभाव नष्ट होण्यात होवू शकतो. हे रोखण्यासाठी बुध्दाचा विवेकवाद व संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी हे महत्वाचे साधन ठरू शकते. त्या दृष्टीकोनातून सुज्ञ भारतीयांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 


लेखक : बापू राऊत








No comments:

Post a Comment