१२ जानेवारी २००५ रोजी, सिंदखेडराजा येथे असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म या नव्या धर्माची स्थापना करण्यात आली होती. शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जीजाबाईना प्रेरणास्त्रोत मानून मानवतेची मुल्ये व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि महिलांचा आदर करणार्या या शिवधर्माचे प्रकटन प्रातिनिधिक स्वरूपात होत असल्याचे सांगून या धर्माची संहिता सुध्दा असेल असे डॉ. आ.ह.साळुंखे व मा.पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केले होते. शिवधर्माच्या स्थापनेत श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा पुढाकार होता. तर डॉ. आ.ह.साळुंखे यांचे या शिवधर्मास अध्ययनशील अधिष्ठान लाभले होते. या धर्माची भूमिका सार्वजनिक हिताची व विधायक राहण्याची ग्वाही साळुंखे उपस्थित जमावास दिली होती. शिवाय “हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांच्या काळजावर विखारी घाव घातले गेले. त्यांना ते समजले नाही. तरीही तोच आमचा धर्म असे ते समजत राहिले. आता धर्माचा अर्थ कळू लागला आहे. म्हणून संताप वाढतो आहे. परंतु या संतापाच्या उर्जेचा वापर नवनिर्मितीसाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवधर्म स्थापनेच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. शिवधर्मास आता १९ वर्ष पूर्ण होत आहेत. या १९ वर्षात शिवधर्म किती वाढला व त्यास धर्माचे स्वरूप प्राप्त होवून विधिवत कार्य होत आहेत का, लोक अधिकाधिक स्वरूपात धर्म बदल करून शिवधर्म स्वीकारताहेत का? या धर्माच्या निर्मितीचे फलित काय? या दृष्टीकोनातून धर्म स्थापनेच्या घटनेचे विवेचन व्हावयास हवे.