महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकाचे निकाल हे राजकीय पंडित व प्रसार माध्यमानी उत्तरोत्तर एक्झिट पोल मध्ये दाखविलेल्या अंदाजाला खरे उतरले नाही. निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सुध्दा महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांना सारख्याच जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. परंतु तसेही न होता भाजपाला केवळ ९ जागा दिलेल्या निकालाने सरकार समर्थित सर्वेक्षणाचे पोल उघडकीस आले. खरे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या पक्ष फोडीमुळे सत्ताधारी पक्षाविरोधात सुप्त रोष होता. पक्ष फोडणाऱ्या व पक्षातून फुटून निघणाऱ्या आमदारांनी मतदाराशी केलेल्या विश्वासघाताची शिक्षा मतपेटीतून व्यक्त झाली. त्यामुळे निवडणूक आयोग व केंद्र सरकारने पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करून पक्षांतर करणार्यांना परत लोकांचा कौल घेण्यास भाग पाडले पाहिजे. फोडाफोडीच्या प्रकरणाचा मोठा फटका भाजप प्रणीत महायुतीला बसणार, याची जाणीव भाजपाला झाली होती. म्हणून हा फटका कमी करण्यासाठी राज ठाकरे यांना महायुतीकडे वळविण्याचा प्रयत्न झाला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षांना मिळालेल्या निवडणूक चिन्हासारखेच दुसरे चिन्ह निवडणूक पत्रिकेवर आणून मतदारामध्ये संभ्रम होईल अशी चाल आखली गेली. नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत शेवटपर्यंत जागा संदर्भात चर्चा करतील व विशिष्ठ क्षणी ते एकला चलो चा निर्णय जाहीर करतील याची जाणीव सुध्दा भाजप नेत्यांना असावी. या तजविजीमुळे महाराष्ट्रात फारसे नुकसान होणार नाही असा विश्वास ४०० पार च्या नाऱ्यात झळकत होता.