Tuesday, June 11, 2024

बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल!


देशात नुकतीच २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये एक प्रकर्षाने जाणवले कि फुलेआंबेडकरी विचारधारेचे पक्ष म्हणविणारे सारे पक्ष हे धाराशायी झाले आहेत. बहुजनवादी राजकीय पक्ष म्हटला तर त्यात मुख्यत: बहुजन समाज पक्षाचा समावेश होतो तर प्रादेशिक स्तरावर वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांचे नाव घेता येईल. परंतु  राष्ट्रीय जनता दल व समाजवादी पक्ष  या पक्षांना फुले शाहू आंबेडकर विचारधारेतील पक्ष म्हणता येत नाही. रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष होता. या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून बहुजनांना राजकीय सत्ताधारी बनविण्याची त्यांची योजना होती परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्च्यात या पक्षाची अनेक शकले झाली. आजच्या स्थितीमध्ये तो विविध गटात विभाजित होवून अस्तित्वहीन झालाय. निवडणूक न लढता मंत्री होणारे रामदास आठवले हे केवळ निवडणूक प्यादे असून ते नगरसेवक म्हणून तरी निवडून येतील का? हा एक प्रश्नच आहे. कांशीराम यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून प्रेरणा घेवून बामसेफ हि सामाजिक संघटना व बहुजन समाज पक्ष स्थापन केला. त्यांनी देशातील बहुजन जनतेला जागृत करीत निवडणुकांच्या माध्यमातून अनेक राज्यात बसपाचे आमदार व खासदार निवडून आणले. तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बहुजन पक्षाची सत्ता स्थापण्यात यश मिळविले. बाबासाहेबांचे विचार व त्यावर कांशीराम यांचेकडून करण्यात आलेली अंमलबजावणी हा आता इतिहासाचा भाग झालाय. 

वर्तमानकाळात बहुजन समाज पक्ष हा मायावतीजीच्या मकडजालमध्ये बंदिस्त आहे. कांशीराम यांच्या निर्वाणानंतर कित्येक मासबेस लीडर असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षातून हाकलून देण्यात आले. २००७ च्या विधानसभा विजयानंतरच्या कार्यकलापानंतर जे आर्थिक व्यवहार झाले तेव्हापासून केंद्रातील सरकारे आयकर विभाग, इडी व सीबीआयचा धाक दाखवून त्यांना आपल्या सोयीप्रमाणे वागावयास भाग पाडते. दलीतावर जे अत्याचार होतात त्याबाबत मायावती केवळ ट्वीट द्वारे  भावना व्यक्त करीत असते. जनतेमध्ये न जाण्याच्या नादातून बसपाची कोअर वोटबँक दूर झाल्यामुळे  त्यांचे विधानसभा २०१९ व लोकसभा २०२४ तील प्रतिनिधीत्व शून्यावर आले. हा बसपाचे राजकीय क्षितिजावरून नष्ट होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात तीच भूमिका प्रकाश आंबेडकर इमान इतबारे पार पाडत लोकांना भावनात्मक मुद्यात गुंतवून भारतीय जनता पक्षाच्या सोयीची भूमिका घेताना दिसले. वंचितचे उमेदवार जिंकण्याचे आकडे नसताना स्वतंत्रपणे लढविण्याची भूमिका विक्षिप्तपणाची होती. त्यांच्या या भूमिकेमुळे २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अधिकच्या जागा प्राप्त झाल्या. या उलट वंचित आघाडी  कॉंग्रेस प्रणीत तिसऱ्या आघाडीसोबत असते तर प्रकाश आंबेडकर व त्यांचे काही सहकारी २०१९ व २०२४ च्या संसदेमध्ये दिसले असते व त्यांना आपला पक्ष देशात पसरविता आला असता. 


जनता विरुध्द नेते अशी स्थिती 


बहुजन वर्गाची राजकीय सत्ता हातात घेण्याची भाषा बसपाच्या स्थापनेपासूनच करण्यात येत होती. कांशीरामजींच्या वैराग्यपूर्ण वागण्याने बहुजन समाजामध्ये सत्ताधारीपणाचा जोश निर्माण झाला. आता तशी परिस्थिती नसून जनता विरुध्द नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत बसपा व सपाच्या युतीने लाभार्थी योजना व पुलवामा घटनेतून  निर्माण केलेल्या राष्ट्रभक्तीला छेद देत १५ जागावर विजय  प्राप्त केला होता. युतीचा हा टेम्पो मायावतीला कायम राखता आला नाही. तिच्या युती तोडण्याच्या निर्णयापासूनच उत्तर प्रदेश व इतर राज्यातील बसपाचा मतदार मायावातीपासून दूर होवू लागला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाला केवळ एका जागेवर विजय प्राप्त होत १३ टक्के पर्यंत मतांची घसरण झाली. यातून धडा न घेता परत लोकसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी सोबत युती न करता मायावतींनी स्वबळावर निवडणुका लढविल्या. परिणामी बहुजन मतदारांनी मायावतीला शून्यावर आणून इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात मते दिली. या निवडणुकीत बसपाला उत्तर प्रदेश मध्ये केवळ  ९.३९ टक्के मते प्राप्त झाली. लोकसभा २०१४ ते २०२४ पर्यंत बहुजन समाज पक्षाची मतांची घसरण १०.३८ टक्क्यापर्यंत झाली. महाराष्ट्रात सुध्दा याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. बहुजन जनता व बुद्धीवंताचा कल भाजप विरोधी असतानाही  प्रकाश आंबेडकरानी युती न करता स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. परिणामी वंचित पक्षासोबत सहानुभूती असणाऱ्या मतदारांनी आपले मतदान तिसऱ्या आघाडीकडे वळवीले. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा २०१९ ला  ६.९८ टक्के (३७,४३,५६०)  मतदान तर  २०२४ ला ३.६४ टक्के (१५,९५,४०१) प्राप्त झाली. मतांची अर्ध्यावर झालेली घसरण हा सहानुभूतीकार मतदारांनी वंचितला दाखवलेली विरोधात्मक नकारात्मकता होती हे लक्षात घेतले पाहिजे. नागपूरमध्ये आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे पक्षप्रमुख विजय मानकर यांना केवळ ६१० व्होट प्राप्त झाली. तीच अवस्था रिपब्लिकन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्राटीक) या पक्षांची झाली. तर दुसरीकडे याच निवडणुकीमध्ये एकाच घरात राहणाऱ्या तीन भावंडाचे (प्रकाश आंबेडकर, आनंद आंबेडकर व भीमराव आंबेडकर) वेगवेगळे तीन पक्ष दिसून तिघेही आपल्या स्वतंत्र पक्षातर्फे उभे असल्याचे चित्र दिसले. एका दृष्टीने हि निवडणूक संविधान समर्थक बहुजन जनता विरुध्द संधिसाधू नेते अशी होती.  मायावती, प्रकाश आंबेडकर व इतर नेत्यांच्या एकांगी निर्णयाचा जनतेने सपशेल पराभव केलाय. 


जनता नव्या नेतृत्वाच्या शोधात 


मागील दशकापासून फुले-शाहू-आंबेडकरवादी जनता हि प्रस्थापित नेत्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवून होती. त्यांच्यावर होणारे अन्याय, स्त्रीयावरील बलात्कार,घरावर चालणारे बुलडोझर, ऐन पावसाळ्यात व भर उन्हात झोपड्यावर चालणारे हातोडे, प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बोलल्यानंतर जाणाऱ्या नोकऱ्या, मिशी ठेवण्यावरून होणारी हत्याकांडे, वाढत चाललेली शैक्षणिक फी, बेरोजगारी व खाजगीकरणाच्या माध्यमातून समाप्त करण्यात येत असलेल्या नोकऱ्या अशा प्रकारच्या अनेक प्रश्नावर तथाकथित नेत्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी कधीच संघर्ष केलेला दिसला नाही. मात्र पाच वर्ष बिळात लपून बसलेले नेते केवळ निवडणूकांच्या तोंडावर बाहेर येवून जनतेला राजकीय सत्तेचा भावनात्मक मुद्दा बनवून मताचा जोगवा मागतात. नेत्यांचा हा स्वार्थ हेतू जनतेने पुरता ओळखल्यामुळे ती आता नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. उत्तर प्रदेशातील नगीना या निर्वाचन क्षेत्रातून निवडून आलेले चंद्रशेखर आझाद यांच्याकडे काही प्रसार माध्यमे बोट दाखवू लागली आहेत. परंतु जनतेने नेतृत्वाचा शोध व्यक्तीकेंद्रित न करता संघटन व्यवस्थेला आपला नेता मानून संघटनेचे मेसेंजर निर्माण करीत भविष्याची वाटचाल केली पाहिजे.    


बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल


बहुजन चळवळ हि व्यक्तिश्रेष्ठ संधीसाधुत्व, वर्चस्वपणा, अहंकार व अंधभक्ताच्या जाळ्यात सापडली असून त्यात त्याग, निष्ठा, विश्वास, तत्वविचार व प्रामाणिकपणा याचा अभाव दिसतोय. ती सामाजिक व राजकीय दृष्ट्या अनेक गटात विभागली आहे. स्पष्ट  शब्दात, राजकीय पक्षाचे निर्माण झालेले अनेक गटतट, बामसेफची झालेली शकले, नेतृत्वाचा हव्यास आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही या वासनेतून बहुजन चळवळ डबघाईस पावली असून ती ध्येयहीन अंताच्या टोकावर उभी आहे. एकता व लक्ष्याअभावी पुढेही तिचे विभाजन होत ती अशीच अनेक शतके चालत राहील. तात्कालिक संघर्षातून सामाजिक व राजकीय नेते निर्माण होत राहतील परंतु बहुजन समाजाला समानतेची पातळी गाठत आपले इप्सित साध्य करता येणार नाही. 


बहुजन चळवळीची पुनर्रचना करावयाची झाल्यास अस्तित्वात असलेल्या बहुजनांचे   राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांना मोडीत काढून एक नवे मॉडेल जनतेसमोर ठेवावे लागेल. व्यक्तीला महत्व न देता संघटनेसी निष्ठा ठेवत पारदार्शिक कार्यप्रणाली निर्माण केली पाहिजे. त्याग हा महत्वाचा घटक समजून नियंत्रण करणाऱ्या मातृसंघटनेची निर्मिती व्हावी. ओबीसी, अनु.जाती व जमाती या मागास जातीना राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक समानतेच्या पातळीवर आणण्याचे आश्वासन देत त्यांच्या भक्कम पाठिंब्याचे सूत्र निर्माण केले पाहिजे. एक पक्ष हि मर्यादा घालून आदर्श संघटना, पारदर्शक आचारसाहिंता व तिच्या कठोर नियमावलीची अंमलबजावणी केल्यास फुटीच्या प्रवृत्तीवर विजय मिळवीता येवू शकतो. भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी हा एक कळीचा मार्ग ठरू शकतो. आजपर्यंतची जळमटे मोडीत काढून बहुजन चळवळीची पुनर्रचना होवू शकते परंतु त्यासाठी जनतेच्या व बुध्दिवंताच्या दबावाची मुख्य गरज आहे. 


लेखक:बापू राऊत





10 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद

      Delete
  2. हे सर्व महाराष्ट्रापुरते करून झाले आहे. बौद्धांचे ४७ पक्ष वा संघटना आहेत. त्या कमी न होता दिवंसे दिवस वाढत आहेत. यांना समाजाच, संविधानाच आणि माणसाच्या विकासाचे कांही देण घेण नाही.
    शहरात वस्त्या वस्त्यात गटतट एकमेकांवर कुरघोडी करतात. खेडोपाडी हीच अवस्था आहे. विखुरलेल्या समाजाने प्रथम एकत्र होणे आवश्यक आहे. मग हे सगळे सुतासारखे सरळ होतील. जयभिम. जय संविधान.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद

      Delete
  3. १९७७ ला इंदिरा गांधी ने आणीबाणी लावल्यावर जशी जनता इंदिरा गांधी विरुध्द एकवटली होती; तसंच ह्या वेळेस मोदींच्या अघोषित आणीबाणी विरुद्ध जनता एकवटली होती; त्या मुळे भारतीय जनतेने मोदी विरोधात ( भाजपा विरोधात नव्हे) एकजूट केली होती; हे परिपक्व राजकीय पक्षांनी ओळखले होते; नेमके तेच बहुजनवादी पक्षांना ओळखता आले नाही; त्यामुळे या परिपक्व पक्षांनी बहुजनवादी पक्षासोबत एकीची खेळी केली आणि अनायसेस बहुजनवादी पक्षांतील नेत्याचा स्वाभिमान ( राजकीय भाषेत अहंकार ) ह्याचा उपयोग करुन जनतेच्या मनात हे उतरविले की बघा बहुजनवादी नेते कसे एकी तोडतायेत आणि भाजपाची बी टीम म्हणून काम करतायेत; ह्यातून प्रचंड चीड निर्माण करुन बहुजनातील बुद्धिजीवी व विचारवताना मत ट्रान्सफर करण्यासाठी वाहक म्हणून वापरून घेतले… एकूणच मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध जनतेने ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेऊन लढविली; त्या अर्थी इंडिया आघाडीला मिळालेले यश सुद्धा त्यांच्या नेत्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने मिळाले नसून जनतेच्या एकजुटीचा विजय आहे; हे त्यानी लौकरात लौकर समजून घेतले पाहिजे; अन्यथा …..

    ReplyDelete
  4. १९७७ ला इंदिरा गांधी ने आणीबाणी लावल्यावर जशी जनता इंदिरा गांधी विरुध्द एकवटली होती; तसंच ह्या वेळेस मोदींच्या अघोषित आणीबाणी विरुद्ध जनता एकवटली होती; त्या मुळे भारतीय जनतेने मोदी विरोधात ( भाजपा विरोधात नव्हे) एकजूट केली होती; हे परिपक्व राजकीय पक्षांनी ओळखले होते; नेमके तेच बहुजनवादी पक्षांना ओळखता आले नाही; त्यामुळे या परिपक्व पक्षांनी बहुजनवादी पक्षासोबत एकीची खेळी केली आणि अनायसेस बहुजनवादी पक्षांतील नेत्याचा स्वाभिमान ( राजकीय भाषेत अहंकार ) ह्याचा उपयोग करुन जनतेच्या मनात हे उतरविले की बघा बहुजनवादी नेते कसे एकी तोडतायेत आणि भाजपाची बी टीम म्हणून काम करतायेत; ह्यातून प्रचंड चीड निर्माण करुन बहुजनातील बुद्धिजीवी व विचारवताना मत ट्रान्सफर करण्यासाठी वाहक म्हणून वापरून घेतले… एकूणच मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध जनतेने ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेऊन लढविली; त्या अर्थी इंडिया आघाडीला मिळालेले यश सुद्धा त्यांच्या नेत्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने मिळाले नसून जनतेच्या एकजुटीचा विजय आहे; हे त्यानी लौकरात लौकर समजून घेतले पाहिजे; अन्यथा …..

    प्रदीप ढोबळे

    ReplyDelete
    Replies
    1. संविधान वाचविण्यासाठी उत्तरप्रदेश व महाराष्ट्रामधील बहुजन मतदार हा मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरला होता. मोदीची हुकुमशाही हा घटक होताच परंतु निवडणुकीमध्ये जात हा घटक परिणामकारक ठरत असल्याचे दिसते.ज्या इंडिया आघाडीला लोकानी मतदान केले ते येणाऱ्या काळात सरकारच्या विरोधात कोणती भूमिका घेणार ? हे बघतील. परंतु खेद या गोष्टीचा वाटतो कि, भविष्यात एकत्र येण्याची भूमिका मांडून या संदर्भात भरीव काम करण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही.

      Delete
    2. साहेब आपलं अगदी बरोबर आहे आपल्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. बहुजन चळवळीतील नेते राजकीय पार्ट्या संघटनातील नेते स्वतः व्यक्ती श्रेष्ठ ,संधी साधू ,वर्चस्वपणा अहंकारी आहेत व झाले आहेत यात काही शंकाच नाही. स्वतःच्या भल्याशिवाय यांना समाजाशी काही घेणे देणे नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्या दहा वर्षापासून असलेले अकार्यक्षम राज्यमंत्री. भाजपच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात या देशात नाही ते प्रकरण घडलेले आहेत उदाहरण मणिपूर येथील हिंसाचार जातीयवाद ,पुलवामा येथील अतिरेकी हल्ला, अनुछेद 370 ,सुधारित नागरिक कायदा, महाराष्ट्रातील राजकीय फोडाफोडी ,शेतकरी आंदोलन आणि अशा अनेक बाबी घडल्या या बाबींवर या प्रकरणांवर सत्तेत असलेल्या विरुद्ध आवाज उठवून जनतेचा विश्वास जिंकण्याची तसेच राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्याची आमच्या बहुजन नेत्यांना नामी संधी उपलब्ध होती ,परंतु या संधीचा लाभ त्यांनी घेतला नाही किंबहुना त्यांना तो घ्यायचाच नव्हता हे नेते कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही हे नेते बहुजन समाजास इमोशनल ब्लॅकमेल करून आपली पोळी भाजून घेत आहेत बहुजन समाजाने या भावनेच्या भरातून बाहेर पडून या सर्व नेत्यांना तसेच भाजपची बी टीम म्हणून काम करणाऱ्यांना, स्वतःच्या अहंपणा मीपणा टिकून ठेवण्याकरिता समाजाचा बळी चढवणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे अशा नेत्यांचा धिक्कार करून आपण म्हटल्याप्रमाणे बहुजन चळवळीची पुनर्रचना होणे अत्यंत आवश्यक आहे त्याकरिता नेत्यांशिवाय तन-मन-धनाने धनाने निःस्वार्थ भावनेने प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली चळवळ निर्माण करण्याकरता आता पावले उचलणं आवश्यक आहेत त्याकरिता योजना बंद कार्यक्रम तयार व्हावा/ करावा

      Delete
    3. होय, चळवळीच्या नवनिर्माणाची गरज आहे. त्यासाठी योजनाबध्द कार्यक्रम आखला पाहिजे.

      Delete