(पुढील लेख सुध्लदा वाचा : लद्दाख: लेह ते नुब्रा व्हॅली मार्गे पँगोंग सरोवर (एक अविस्मरणीय प्रवास)
बौद्ध धर्माचे दोन मुख्य प्रकार आहेत. हीनयान आणि महायान. भारताव्यतिरिक्त, हीनयान परंपरेचे अनुयायी
बर्मा, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि श्रीलंका इत्यादी आग्नेय आशियातील देशांमध्ये आहेत. तर महायान
संपूर्ण आशिया, तिबेट, चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पसरलेला आहे. हीनयान परंपरेत, गौतम बुद्धाचे स्मरण करण्यासाठी
चैत्य/स्तूप स्थापित करण्याची प्रवृत्ती रूढ झाली. महायान परंपरेत, बुद्धांचे स्वरूप आणि
प्रतिमा दर्शविण्याचे विविध मार्ग आहेत. महायान परंपरेतून वज्रयान आणि तंत्रयान
उदयास येतात. महायानी बौध्द धर्माचे हे स्वरूप संपूर्ण लद्दाखमध्ये ठळकपणे दिसून येते.
म्हणूनच लद्दाखकडे महायानी बौध्द धर्माचे एकमेव केंद्र म्हणून बघता येते. बुद्धाची
शिकवण व त्यांच्या प्रवचनांच्या संकलनासाठी अनेक परिषदा आयोजित करण्यात आल्या
होत्या. अशा परिषदांना
त्या काळी संगीती हा शब्दप्रयोग वापरण्यात येत होता. अशा संगीतीमध्ये
एकत्रित केलेल्या प्रवचनांना त्रिपिटक
म्हटले गेले. पुढे हेच त्रिपिटक बौध्द धर्माचा धर्मग्रंथ म्हणून उदयास आला. लद्दाखमधील
महायान अनुयायी त्रिपिटकाला कांग्युर
म्हणून संबोधतात. येथील लामा वेळोवेळी त्याचे पठण आणि अभ्यास करत राहतात. (यह लेख भी पढे : लद्दाख में बौध्द धर्म )
बौद्ध धर्माची चौथी संगीती सम्राट कनिष्कच्या काळात काश्मीरमधील कुंडलवन येथे
झाली. त्याचा काळ सुमारे इसवी सन १०० आहे. या संगीतीमध्ये नागार्जुन, असंग, वसुमित्र आणि अश्वघोष
यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. या संगीतीचा महत्त्वाचा परिणाम म्हणजेच महायान
परंपरेची सुरुवात होय. योगाचार आणि माध्यमिक (शून्यवाद) हे महायान तत्वज्ञानाचे मुख्य
भाग आहेत. परंतु आजच्या तिबेट आणि लद्दाखसह हिमालयीन प्रदेशात (भूतान, सिक्कीम व
अरुणाचल प्रदेश) प्रचलित असलेला महायान शाखेचा पाया ई.स ७-८ व्या शतकामध्ये आचार्य
पद्मसंभव यांनी घातला. महाकश्यप आणि पद्मसंभव यांच्या लद्दाख भेटीची माहिती जुन्या
कविता आणि रचनांमध्ये आढळते. महायानमध्ये पद्मसंभव यांना बुद्धानंतरचा दर्जा प्राप्त
आहे. पद्मसंभव यांनी लद्दाखमध्ये लामा मठांची स्थापना केली. पूर्वीच्या काळी लद्दाखी
तरुण शिक्षण घेण्यासाठी बौध्द विद्यापीठ असलेल्या नालंदा, विक्रमशीला आणि
काश्मीरमध्ये जात असत. लद्दाखमधील बौद्धांनी इतर कोणत्याही धर्म किंवा पंथाला
विरोध केला नाही. इतर विचारसरणींचा आदर करणे हे लद्दाखी समुदायाचे एक विशेष
वैशिष्ट्य आहे. ते मितभाषी असून तथागत गौतम बुद्ध आणि इतर गुरुंच्या विचारांनी
प्रभावित आहेत. लद्दाखी लोक लामा लोचावा रिन्छेंन जंगपो (११ वे शतक) आणि लोचावा फकपा शेसरब (१४ वे शतक) यांची नावे मोठ्या
आदराने घेतात. त्यांनी भारतीय भाषिक ग्रंथांचे तिबेटी भाषेत भाषांतर केले. (यह लेख पढे- लद्दाख: लेह से पॅगोंग लेक व्हाया नुब्रा वॅली (एक अविस्मरणीय सफर)
लद्दाखमध्ये बौद्ध धर्माच्या परंपरांचा प्रसार करण्यात लामा मठांनी मोठी
भूमिका बजावली आहे. जातक कथा मठ आणि मंदिरांमध्ये (गोंपा) चित्रित केल्या आहेत.
येथे जुन्या मठांची संख्या इतर कोणत्याही मठांपेक्षा जास्त आहे. या मठांमध्ये
तथागत बुद्ध, अवलोकितेश्वर, पद्मसंभव, तारा आणि मैत्रेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. लेह व कारगिल क्षेत्रात अतिशय
दृश्यमान आणि सुंदर मठ स्थापन झाले आहेत, ज्यात लेह, हेमिस, थिक्से, माहे, हानले, स्पिटुक, प्यांग, लिकिर, लामायुरु, झंस्कर, डिस्किट आणि शांती स्तूप यांचा समावेश आहे. या
मठांमध्ये बौद्ध उत्सव आणि धार्मिक मेळावे नियमित आयोजित केले जातात. लद्दाखी जनतेमध्ये आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव
असलेला नवयांनी विचार आचरणात नसला तरी येथील जनतेच्या मनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर
नावाच्या व्यक्तीने आपली पकड मजबूत केली आहे. लद्दाखी प्रार्थनामध्ये मानवजातीसाठी आनंद, शांती आणि समृद्धीचे दोहे असतात. परंतु, आधुनिक जीवनशैलीच्या
गुंतागुंती, इतर धर्मांची आक्रमकता आणि धर्मातील राजकीय हस्तक्षेपामुळे बौद्ध परंपरा आणि लद्दाखी
संस्कृती टिकून राहतील का? हा एक मोठा प्रश्न आहे.
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment