Thursday, April 2, 2026

सम्राट अशोकाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष: ऐतिहासिक विस्मरण कि राजकीय-सांस्कृतिक रणनीती?

 


भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि नैतिकतेवर आधारित म्हणून सम्राट अशोकाचे स्थान निर्विवाद आहे. त्यांच्या राज्याच्या सीमा भारतीय उपखंडाच्या जवळजवळ संपूर्ण भागावर पसरल्या होत्या. उपलब्ध शिलालेख, स्तंभलेख आणि पुरातत्त्वीय पुराव्यांवरून त्याचा विस्तार दिसतो. अशोकाच्या शिलालेखांमध्ये व्यक्त झालेली दृष्टी, शासनतत्त्वे आणि ‘धम्म’ ही संकल्पना आजही आधुनिक राज्यकारभारासाठी आदर्श मानली जाते. त्याने अहिंसा आणि समतेला राजकीय तत्त्वज्ञानाचे केंद्र बनवले आणि प्रजेला नैतिक अधिकार दिला. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारत जगात विश्वगुरु बनला होता. तरीही,  आजची भारतीय राजसत्ता आणि ब्राम्हणी  सांस्कृतिकशाही अशोकाला इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून सतत बाजूला ठेवीत आहे. अशोकाची जयंती  व त्याच्या कार्यावर शासन व सांस्कृतिक विभागाकडून सतत दुर्लक्ष होत आहे.  

अशोकाचे विस्मरण करायला लावणे हे केवळ ऐतिहासिक नाही तर ते  आजच्या भारतातील सत्ताकेंद्रांच्या मानसिक-राजकीय-सांस्कृतिक रचनेशी जोडलेले आहे. कारण अशोकाचा वारसा हा  समतावादी, अहिंसक, सर्वधर्मीय आदर आणि प्रजेला केंद्रस्थानी ठेवणारी शासनपद्धती आहे. अशोकाचा हा आदर्शवाद वर्चस्ववादी सांस्कृतिक राजकारणाला अस्वस्थ करणारा आहे.

अशोकाचा नैतिकतेवर आधारित राज्यकारभार

अशोकाचे सर्व शिलालेख हे त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच प्रकाशित करण्यात आले होते. शिलालेखानुसार धम्म म्हणजे अहिंसा, समता, सर्वधर्मीय आदर होय. या तत्वानुसारच त्याचे शासन चालत होते. अशोकाची हि शासन पध्दती वर्णव्यवस्था आणि ब्राह्मणवादी राजसत्तेच्या मूलभूत तत्त्वांना थेट आव्हान देणारी आहे.

अशोकाला राजसत्ता व ब्राम्हणी व्यवस्था का दुर्लक्षित करते? कारण

·         धम्म-राजनीती विरुद्ध वर्णव्यवस्था : अशोकाचा धम्म समतेवर आधारित असून वर्णव्यवस्थेच्या विरोधात उभा आहे. तर ब्राह्मणवादी राजसत्ता ‘दैवी अधिकार’ आणि ‘वर्णानुक्रम’ यावर आधारित असल्यामुळे अशोकाचा गौरव म्हणजे वर्णव्यवस्थेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणूनच राजसत्ता त्याला मुख्य प्रवाहातून दूर ठेवते

  • अशोकाने धम्माच्या माध्यमातून ब्राह्मणवादाला सर्वात मोठे आव्हान दिले: अशोक हा बौध्द असूनही त्याने सर्व धर्मांना आश्रय व सन्मान दिला होता. त्याने पाखंड्यांना धर्मातून बाहेर काढले, पशुबळी देणारे यज्ञकर्म नाकारले, वर्णव्यवस्था फेटाळत ब्राह्मणांच्या धार्मिक मक्तेदारीला आव्हान देत स्त्रियांना व वंचितांना स्थान दिले. म्हणूनच आजच्या सत्त्ताधार्यांना  व सांस्कृतिकशाहीला अशोकाचा गौरव करणे म्हणजे स्वतःच्या वर्चस्वाला तडा देणे असल्याचे वाटते.
  • ‘आर्य-केंद्रित’ इतिहास अशोकाच्या अनुक्रमात बसत नाही : भारतीय इतिहास आजही  वैदिक परंपरेभोवती फिरते. सम्राट अशोक व त्याच्या धम्माला सन्माननीय यादीत समाविष्ठ केल्यास वैदिक, यज्ञ व दैवी राजा हे समीकरण बदलून धम्मविचाराचा  सन्मान व नैतिक राजा असे होते. सांस्कृतिकवाद्याच्या पारंपारिक वैदिक-महाकाव्य-गुप्तकाळ-राजपूत -मुघल- ब्रिटिश या मांडणीत बौध्द भारताचा सुवर्णकाळ  मुद्दामहून वगळला जातो. सम्राट अशोकाला यात समाविष्ठ केल्यास ब्राम्हणांची वैदिक संस्कृतीची मांडणी पूर्णपणे बदलवून टाकते. आणि  
    ते सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या कथानकाला असह्य करते.

·         अशोकाचा लोकशाहीवादी वारसा आहे, दैवी नाही : अशोकाने स्वतःला कधीच दैवी राजा म्हटले नाही. त्याची सत्ता नैतिक जबाबदारी, प्रजेसाठी उत्तरदायित्व आणि अहिंसेवर आधारित होती. या उलट ब्राम्हणशाहीला दैवी राष्ट्र, दैवी राजा आणि दैवी संस्कृतीची गरज असते. अशोक या सर्वांना विरोध करतो म्हणून ब्राम्हणी राजसत्ता अशोकाच्या विरोधात उभी ठाकते.

  • अशोकाचा वारसा बहुजन, स्त्री, वंचित यांना शक्ती देतो: अशोकाने स्त्रियांना संघात स्थान दिले, वंचितांना संरक्षण दिले आणि  प्रजेला नैतिक अधिकार दिला. त्याचा हा वारसा बहुजन राजकारणाला बळ देतो, बहुजनांना इतिहासाचा केंद्रबिंदू मानतो, आणि ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान देत समतावादी राष्ट्रवाद स्वीकारतो. हे सर्व ब्राम्हणी सांस्कृतिकशाहीला मान्य नसल्यामुळे अशोकाचा गौरव करणे त्यांना जमत नाही

सांस्कृतिकशाही अशोकाला का नाकारते? - सांस्कृतिक विश्लेषण

·         अशोक कालीन  भारताचा सुवर्णकाळ स्वीकारणे म्हणजे वैदिक श्रेष्ठत्वाला धक्का: अशोकाचा गौरव म्हणजे बौद्ध भारताचा गौरव आणि वैदिक भारताच्या श्रेष्ठत्वाला आव्हान ठरते म्हणूनच अशोकाला ‘भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू’ म्हणून स्वीकारणे ब्राम्हणी  सांस्कृतिकशाहीला शक्य नाही.

·         ·         अशोकाची प्रतिमा हि ब्राम्हणी सांस्कृतिकशाहीच्या ‘योद्धा-राजा’ या प्रमेय विरोधी : सांस्कृतिक राष्ट्रवादाला हवे असते युद्ध, शौर्य, दैवीत्व, कल्पित काव्य आणि वर्चस्व परंतु याला अशोकाचा आदर्श सरळ छेद देते. ते अहिंसा, नैतिकता, समता, सत्यता  आणि लोककल्याण याचा पुरस्कार करते. आणि हे सर्व ब्राम्हणी वैदिक विचाराला असह्य करते.  

निष्कर्ष

ज्या सम्राट अशोकाचे साम्राज्य भारताच्याही पलीकडे होते, त्या अशोकाकडे राजकीय सत्ताधार्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करणे हे ऐतिहासिक विस्मरण नसून तो राजकीय व सांस्कृतिक रणनीतीचा भाग  आहे. सम्राट अशोकाचा स्वीकार म्हणजे वर्णव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान, आणि नैतिक व  अहिंसक अशा लोकशाहीवादी शासनाचा पुरस्कार करावा लागणे हे त्यांना असह्य होण्यासारखे आहे. म्हणूनच राजसत्ता आणि ब्राम्हणी सांस्कृतिकशाही अशोकाला मुख्य प्रवाहातून सतत बाजूला ठेवत असते. सम्राट अशोकाला केंद्रस्थानी आणणे म्हणजे भारतीय इतिहासाचे केवळ पुनर्लेखनच  नव्हे, तर त्याचे पुनर्स्थापन करावे लागेल. परंतु त्याऐवजी सम्राट अशोकाला पर्याय व  ब्राम्हणवादी श्रेष्ठत्वासाठी काल्पनिक पात्रे निर्माण करून त्याला विस्मृतीत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच एकेकाळी भारताचा सम्राट असणाऱ्या अशोकाची शासकीय जयंती साजरी करून  भारतीय जनतेसमोर त्याचा गुणगौरव करण्याची आजच्या सत्ताधार्यांना भीती वाटत असेल तर ते भारताचे एक ऐतिहासिक दुर्दव्यच म्हणावे लागेल.  

 

लेखक बापू राऊत

2 comments: