Thursday, February 14, 2013

दीक्षाभूमी: आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान


महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दीक्षाभूमीनावाचे पवित्र स्थान असून ते जागतिक बौद्धांचे आशास्थान बनले आहे. दीक्षाभूमीची तुलना मुसलमानाची हज व ख्रिश्चनाच्या पवित्र जेरुसलेम व वॅटीकन सिटीशी होऊ लागली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धर्माच्या श्रद्धास्थानासारखे महत्व दिक्षाभूमिला प्राप्त झाले आहे. असे असले तरी दीक्षाभूमी केवळ
श्रद्धेचे स्थान नसून ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक चळवळीचे प्रेरणास्थान बनलेले आहे. दिक्षाभूमी हि तिच्या वेगवेगळया वलयांनी केवळ भारतीय मागासवर्गीय वर्गाचेच आकर्षण केंद्र बनले नसून परदेशी पर्यटकांचा वेढाही दिक्षाभूमिला पडलेला असतो. म्हणूनच नागपूरच्या एका विरान जागेला अचानक एवढे महत्व का प्राप्त झाले याचा इतिहास जाणून घेने जेवढे महत्वाचे आहे तेवढेच दिक्षाभूमिवरच्या वादळ वा-यांनी क्रांतिकारी चळवळीला कशी उभारी मिळते हे पाहणेही महत्वाचे ठरते.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौध्द धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेब आंबेडकरानी ज्या स्थळी हिंदू धर्माची कात टाकून बौध्द धर्माची दीक्षा घेतली त्या स्थळालाच दीक्षाभूमी असे म्हणतात. बौध्द धर्माची दीक्षा देणारे हेच स्थळ  पवित्र दीक्षाभूमी म्हणून भारतातील बहुजनांचे बौध्द धर्माकडे वळण्याचे प्रेरणास्थान झाले आहे. आज दीक्षाभूमी एका मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी जी सिहगर्जना बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या गर्जनेचा लक्ष्यभेद १४ आक्टोबर 1956 ला झाला. लाखोच्या जनसमुदायाने हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्माचा स्वीकार करणे हि जगातील एकमेव अभूतपूर्व घटना होती. केवळ धर्मातरांच्या महत्वपूर्ण घटनेने नागपूर हे शहर जगाच्या नकाशावर भारतातील नवे बौध्दस्थान म्हणून झळकू लागले. दीक्षाभूमी या नावाने नागपूरला एक नवी ओळख प्राप्त होणे हे नागपूरचे सौभाग्यच होय.  धर्मांतरासाठी नागपूर शहराच्या निवडीमागील कारणाचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले, नागपूर हे नाग लोकांचे मुख्य स्थान होते. नाग लोक आर्याचे शत्रू होते. नाग व आर्याच्या युध्दात आर्यांनी नागाना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात आढळतात. त्या युध्दात वाचलेल्या नागाचे आपण वंशज आहोत. या नाग लोकांना वर येण्यासाठी एक महापुरुष हवा होता. गौतम बुध्द हेच ते महापुरुष होत. तथागत बुध्दाचा संदेश याच नागांनी संपूर्ण भारतभर पसरविला. या नाग लोकांची वस्ती या नागपूरच्या आसपास होती. येथेच प्रसिध्द नाग नदी आहे. म्हणूनच मी नागपूर या शहराची धर्मांतरासाठी निवड केली असे बाबासाहेब सांगतात.
हजारो वर्ष भारतीय समाजात दृढमल झालेली जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता हिंदुच्या हृदय परिवर्तनाच्या मार्गाने कोसळून पडेल यावर बाबासाहेब आंबेडकरांचा अजिबात विश्वास नव्हता. स्वातंत्र्य लढयात किंवा कामगार शेतक-यांच्या वर्ग लढयात स्पृश्य अस्पृश्य एकत्र आले किंवा विठ्ठलाच्या भक्तीसाठी एकत्र आले तरी त्याने सामाजिक व्यवहारात काहीही फरक पडत नाही, हा त्यांचा अनुभव होता. त्यामुळे अस्पृश्य समाजाने स्वत: संघटीत होऊन आपल्या मुक्तीसाठी संघर्ष करणे अपरिहार्य आहे हा त्यांचा दृढ विश्वास होता. याच भूमिकेतून बाबासाहेबांनी गांधीजींच्या भूमिकेविरुध्द संघर्ष केला. या देशाचे नाव मुळात: भारत आहे परंतु जाणूनबुजून या देशाला हिंदुस्थान म्हटल्या जाते. हे हिंदुस्थानवाले इतर सगळ्या लोकांचा द्वेष व राग करतात. विशेषत: आंबेडकरी समाजाला आपला नंबर एकचा शत्रू समजतात. या हिंदूवाल्यांना वाटते कालचा आमचा नोकर जर मालक झाला तर आमचे काय होईल?. या भीतीनेच ते घटनेतील आरक्षणाच्या धोरणावर अंमलबजावणी करीत नाहीत. बाबासाहेब म्हणाले होते, मी मनात आणले तर या देशाचा विध्वंस करू शकतो परंतु मला या देशाच्या इतिहासात माझी नोंद एक विध्वंसक होऊ नये याची मी जबाबदारी घेत आहे. एक सच्चा देशप्रेमीच असे वक्तव्य करू शकतो. जर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला असता तर या देशाचे कधीचेच वाटोळे झाले असते, हे बाबासाहेबांचा द्वेष करना-या हिंदुवाल्यांना आजही उमगलेले दिसत नाही. भारताच्या मातीत जन्मलेला बौध्द धर्म स्वीकारून बाबासाहेबांनी या हिंदुवाल्यावर किती उपकार केलेत याचे मोजमाप करता येणे शक्य नाही. कारण हे उपकार क्षितिजाच्याही पलीकडचे आहेत.
दीक्षाभूमी म्हणजे साहित्याचा मेळा. या साहित्य मेळाव्यात बाबासाहेबाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक जागतिक नीतीच्या तत्वज्ञानाचा गोडवा असतो. त्यामुळे हे तत्वज्ञान पुस्तकाच्या स्वरूपातून स्वत:जवळ बाळगण्यासाठी धम्मचक्रपरीवर्तनदिनी लाखो पुस्तकांची खरेदी होत असते. मागासवर्ग समाजाच्या उन्नतीसाठी मंजूर झालेला पैसा हा त्यांच्यापर्यंत न पोहोचता सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेतील वरचा वर्ग हडप करीत असतात. उद्देश एकच असतो, मागास घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बणू न देणे. हा सरकारी अत्याचार आहे. ह्या सरकारी अत्याचारविरोधात रणशिंग फुंकण्याची चेतना बाबासाहेबांचे साहित्य त्यांचे विचार देत असते. अशा या क्रांतिकारी साहित्याचा झरा दीक्षाभूमी वरुनच पाझरत असतो. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराच्या स्वीकारानंतर वर्णव्यवस्थेबाहेरील लोकानी लाचारी, अंधश्रद्धा व देवभोळेपणा सोडून स्वाभिमानाचा नवा मार्ग चोखाळला. केवळ ते आपल्या हक्काची भाषा बोलण्यावरच थांबले नाही तर आमच्या हक्काचा वाटा कोठे आहे?. याची विचारणा करू लागले आहेत. आपल्या हक्काची भाषा बोलणारे लोक या हिंदुव्यवस्थेला आपले शत्रू वाटायला लागली व त्याचा परिणाम म्हणून दलितांना मारणे, स्त्रियांची अब्रू काढणे, त्यांची घरे जाळणे व सामूहिक बहिष्कार टाकणे असे प्रकार होऊ लागले.
धर्मांतराच्या केवळ बावन्न दिवसानंतर बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानाची बातमी येऊन थडकते. त्यामुळे आता पुढे काय? हा प्रश्न समोर येणे स्वाभाविक होते. नव्या धर्माचे पुढे काय?. त्याचे आता काय करायचे?. या धर्मांतराने जनमानसात कसा बदल घडून आणावा?. तुम्हाला मी मिळवून दिलेल्या सवलती माझ्या खिशात आहेत, त्या मी तुम्हाला कधीही परत मिळवून देईल असे ठामपणे सांगणारा नेताच निघून गेल्यामुळे संभ्रमावस्था होतीच. डाक्टर बाबासाहेबाची पोकळी भरून काढणा-या नेत्याची आता खरी गरज होती. दुर्दव्याने तसा नेता भेटला नाही. जे भेटले ते झटपट तडजोडवादी, तात्कालिक लाभ व ऐहिक सुखाच्या पाठीशी धावणारे निघाले. ज्यांच्याकडून समाजाला मार्गदर्शन हवे होते ते लटके व अदूरदर्शी निघाल्यामुळे एक भयानक संकट जनतेसमोर होतेच. परंतु सामान्य जनताच एक मजबूत खांब बनली. अर्थात या मजबूत खांबाचा मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांच्या मौलिक विचारांनीच आपली भूमिका पार पाडली.  
दीक्षाभूमी ही अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यापैकी मराठवाडा विद्यापीठास डाक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे नाव देण्यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काढलेला लाँगमार्च ही एक ऐतिहासिक घटना होय.  दीक्षाभूमी आज भारतीय जनतेच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय पर्यटनाचे क्षेत्र झाले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जागेवर धम्मदीक्षा घेतली त्या जागेवर जागतिक दर्जाचे स्तूप बांधण्यात आले.  एका धर्मातून दुस-या धर्माकडे प्रवाहित होण्यासाठी त्या त्या धर्माची दीक्षा घ्यावी लागते. दीक्षाभूमी हे असे स्थान आहे की, ज्या ठिकाणी बहुजन जनता धर्मांतराची प्रेरणा घेत असते. नागपुरात येणारा प्रत्येक भारतीय आवर्जून दीक्षाभूमीला भेट देऊन सामाजिक लोकशाहीचे संदेश घेऊन जात असतात तर भंते सुरई ससाई सारखे केवळ दीक्षाभूमीच्या ओढीने भारतात येऊन बौध्द धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेत असतात. ही आधुनिक बोधिसत्वाची किमयाच नव्हे काय?.
नागपूरच्या काळ्या मातीला सुगंधाचा दर्पण देना-या डाक्टर बाबासाहेब आंबेडकर या झंझावाताच्या विद्वत्तेला देश विदेशातील विद्वानांनी सलाम केला आहे. नोबेल पारितोषिक विजेते, प्रोफेसर अमर्त्य सेन, बाबासाहेब आंबेडकराविषयी म्हणतात,  “Ambedkar is my Father in Economics. He is true celebrated champion of the underprivileged. He deserves more than what he has achieved today. However he was highly controversial figure in his home country, though it was not the reality. His contribution in the field of economics is marvelous and will be remembered forever..!”
तर मानवाधिकार कार्यकर्त्या व फुले आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक अमेरिकेच्या डाक्टर गेल ओम्व्हेद बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या धर्माला नवयान असे संबोधताना म्हणतात,
Ambedkar's Buddhism seemingly differs from that of those who accepted by faith, who 'go for refuge ' and accept the canon. This much is clear from its basis: it does not accept in totality the scriptures of the Theravada, the Mahayana, or the Vajrayana. The question that is then clearly put forth: is a fourth yana, a  Navayana a kind of modernistic Enlightenment version of the Dhamma really possible within the framework of Buddhism?
प्रचलित लोकशाहीच्या व्याख्येपेक्षा एक वेगळी अशी बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या होती. त्यांची लोकशाहीची व्याख्या अशी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल रक्तपात न होता जिच्यामुळे घडवून आणले जातात अशी शासन व्यवस्था व प्रणाली म्हणजे लोकशाही होय.
३ आक्टोबर १९५४ ला मुंबई आकाशवाणीवर बाबासाहेबांचे भाषण प्रसारित करण्यात आले होते
, त्यांनी  सांगितले स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हि आपल्या जीवनाची आधारभूत तत्वत्रयी असून त्यांचे बीज फ्रेंच राज्यक्रांतीत वा राजकारणात नसून बौध्द धर्मात आहे. घटनेने राजकारणात हि तत्वे अंतर्भूत केली असली तरी समाजजीवनात ती अंमलात आणायला हवी. बी.बी.सी. वरून त्यांचे भाषण मे १९५६ मध्ये प्रसारित करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी प्रज्ञा, करुणा व समानतेमुळे मला बौध्द धर्म आवडतो. समाजाला ईश्वर अथवा आत्मा अंध:पातापासून वाचवू शकत नाही. बौध्द धर्म हाच व्यक्तीला व समाजाला वाचवू शकतो, रक्तहीन क्रांतीने बुध्दाची शिकवण साम्यवाद आणू शकते असे सांगितले.
बाबासाहेबांनी नाशिक येथील येवले येथे १९३५ साली धर्मांतराची घोषना केली मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाहीया घोषणेनंतर बाबासाहेबाकडे भारतातील मुख्य धर्माच्या धर्मगुरूचे बाबासाहेब, आपले व आपल्या समाजाचे आमच्या धर्मात स्वागत आहेअशा आशयाचे बोलावणे येणे सुरु झाले. बाबासाहेबांनी मात्र कोणालाही होकार न देता सर्व धर्माचा अभ्यास केला. बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते श्रीलंकेला गेले. बाबासाहेबांनी १९५४ व १९५६ ला दोनदा ब्रम्हदेशाला भेट दिली. नागपूर येथे नियोजित ठिकाणी १४ आक्टोबर १९५६ ला श्रीलंकन बौध्द धम्मगुरु हस्ते धम्माची दीक्षा घेतली व त्यानंतर बाबासाहेबांनी स्वत: पाच लाख लोकांना धम्मदीक्षा देत बुद्ध धम्माचे पालन करण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी भारतीय बौद्धांना बुध्द व त्याचा धम्महा ग्रंथ अर्पण केला.
दीक्षाभूमी हे धर्मांतराचे व नवविचाराचे एक प्रेरणाकेंद्र झाले आहे. ज्या ज्या लोकांच्या मनात सामाजिक व वैज्ञानिक जाणिवा निर्माण झाल्या व त्यातून ज्यांच्या अंतर्मनात नव्या विचारसरणीचा प्रकाश प्रविष्ट झाला त्या त्या जणांनी बौध्द धर्माच्या नवयांनाची वाट पकडलेली दिसते. नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका डा. रुपा कुलकर्णी यांनी आपली ब्राम्हण जातीची झूल फेकत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. रूपा कुलकर्णींनी रामायणात स्त्रियांबद्दल असलेला हीन व अपमानजनक मजकूर लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेसमोर उघडकीस आणला होता. यावर हिंदुवाल्यांनी रूपा कुलकर्णी विरोधात वादळ निर्माण केले होते. धर्मांतरीत रूपा बोधिना बंड करण्याची ऊर्जा व प्रेरणा बुध्द व बाबासाहेबांच्या नवयांनातूनच मिळाली असणार हे स्पष्ट आहे. चंबळ खो-यात आपली दहशत निर्माण करून उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश सरकारांना जेरीस आणणा-या फुलनदेवीनी याच दीक्षाभूमीवर येऊन बौध्द धम्माची दीक्षा घेऊन जनमानसात आपला वेगळा ठसा उमटविला होता. आधुनिक काळातील बोधित्वाच्या (बाबासाहेबांच्या) त्या अंगुलीमाल होत्या. उदित राज या आयकर विभागाच्या अधिका-यांनी दिल्ली येथे  ४ नोव्हेंबर २००१ ला बौध्द धर्माची दीक्षा घेत  २७ अक्टोबर २००२ ला मोठे सामुहिक धर्मांतर घडवून आणत अनेक ठिकाणी धर्मात्तराचे कार्यक्रम आयोजित करून बौद्धमय भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने पाउल टाकले. मराठीतील प्रसिध्द साहित्यिक  उपराकार लक्ष्मण माने व त्यांच्यासोबतच बहुसंख्य भटक्या जमातीनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर ओबीसी समाजाचे एक नेते मा. हनुमंतराव उपरे हे आपल्या ओबीसी बांधवासोबत बौध्द धर्मात येण्यास उत्सुक आहेत. एकूणच भारतातील बहुजन समाजात आता समता व मानवी हक्काच्या विवेकाचा जागर सुरू झाल्याचे अनुमानित करता येते.

लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment