((लेखक:संजय पवार, मासिक:कलमनामा)
नव्वदच्या दशकात हिंदुत्वाचा जो उन्माद संघ आणि संघप्रणित सर्व संघटना (यात भाजपही आला) देशभर पसरवला, त्याला महाराष्ट्रात शिवसेनेने खतपाणी घातलं. ‘मराठी’चा मुद्दा बाजूला सारून बाळासाहेबांनी भगवी वस्त्रं चढवली ती अखेरच्या श्वासानंतरही उतरवली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतभर त्यांची ओळख ‘हिंदुहृदयसम्राट’ अशीच राहिली. हिंदुच्या बाजूने जेव्हा संघासकट भाजप आणि त्यांची चिल्लीपिल्ली अडचणीच्या काळात ‘गोलमाल’ बोलत तेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ कुठल्याही थराला जाऊन, कुठल्याही शब्दात परिणामांची पर्वा न करता बोलत आणि त्या बोलण्यावर ठाम राहत. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर खटले भरले गेले पण निर्णयाप्रत आले नाही, काही खटले माघारीही घेतले गेले. यामागचं राजकीय इंगित, इतरांचे ‘लकवे’ शोधणार्या तंदुरुस्त लोकांनाच माहीत!
वाढत्या शहरीकरणात उत्सवाच्या सार्वजनिकरणातून निर्माण होणार्या नागरी, सामाजिक समस्याबाबत कुणी आवाज उठवायचा प्रयत्न केला की तो लगेच धर्माविरोधी, हिंदुविरोधी, नास्तिक, भिकार समाजवादी, आऊटडेटेड कम्युनिस्ट ठरवला जातो किंवा ग्रीन टेररिस्ट म्हणजे पर्यावरणीय अतिरेकी ठरवले जातात. अशा लोकांना धमकावण्यापासून पार ठार मारण्यापर्यंतचे प्रयत्न होतात. बरं हे सगळं पोटतिडकीने सांगणारे जवळपास ९९ टक्के धर्माने हिंदू आणि हिंदुमधल्याच उच्च/मध्यम आणि निम्न जातीतले असतात! त्यातले अनेक ‘सश्रद्ध’ही असतात पण त्यांचा विवेक आणि नागरीभान जागरूक असल्याने ते केवळ स्वतःच नाही तर समाजाचंच नागरी स्वास्थ्य सांभाळण्यासाठी प्रवाहाविरोधात बोलत असतात, लिहित असतात, लढत असतात!
पण गर्दीचं एक मानसशास्त्र असतं. त्याला विवेकासह, सभ्यता, नम्रता आणि समजुतीचं वावडं असतं. त्यात त्या गर्दीला धार्मिक रंग असेल (मग ती कुठल्याही धर्माची असो) तर ती गर्दी करेंगे या मरेंगे या निर्धाराने बेभान, बेफान, क्रूर होते.
सध्या साजरे होणारे दहीहंडी, गणपती उत्सव पाहिले की वाटतं यात लोकसहभागापेक्षा मजबुरी अधिक आहे. कृष्ण आणि गणपती हे तसं म्हटलं तर जननायक! गणपतीला तर गावकूसाबाहेरील अस्पृश्य तमासगिरांनी ‘गण’नायक म्हणजे ‘लोकांचा’ देव केला. त्याचा गावातल्या नाट्य‘मंदिरात’ तसा प्रवेश उशिरा झाला. कृष्ण आणि गणपती गावकूसाबाहेरच्या कलेत ‘मानवी’ अवतारात, मानवी भावभावनांसह खेळ रंगवत! गावात त्यांना बुद्धिची देवता संभवामि युगे युगेवाला अवतारी पुरुष अशी खास दैववादी, रूढी, परंपरावादी रूपं देण्यात आली. कृष्ण (यादव) म्हणजे त्या अर्थाने दुधवाला भैय्याच! त्यामुळे त्याचा संचार गोरगरिबात जास्त. आमच्या राजकीय नेत्यांनी ९/१० थराच्या हंड्या चढवून त्या हंडीतलं सामान्य गोठ्यातलं दही २५/५० लाखांचं करून ठेवलं.
कृष्णलीला आपण ऐकल्या, वाचल्या. वगनाट्यातून तर कृष्णाला एकेरीतून पार माणसात आणला. पण आजच्या दहीहंड्यात ‘सेलिब्रेटीच्या’ लेबलखाली तथाकथित मालिका, चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्रींना पैशांच्या तालावर, प्रचंड जनसमुदायासमोर, उन्मादक हावभावांच्या गाण्यांच्या फर्मायिशीवर ‘नाचवण्यात’ येतं तेव्हा वाटतं डान्सबारच्या भिंती मोडून त्याचा दरबार झालाय. मोहेनजो-दारोच्या उत्खननात एक दरबारी राजनर्तिकेची मूर्ती सापडलीय. राजनर्तिका संपूर्ण विवस्त्र आहे. दहीहंडीत नाचणार्या आमच्या तथाकथित तारकांना उन्मादी गर्दी नजरेने विवस्त्र करत असते! उच्चवर्णीय, उच्चशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातून आलेल्या या तारका ‘सुपारी’साठी कुठल्याही पातळीवर उतरतात तेव्हा आर आर आबांना विचारावसं वाटतं, बारबालांनी मग असं काय घोडं मारलं होतं.
या दहीहंड्यात जीवाची बाजी लावणार्या गोविंदांची काही हजारात बोळवण केली जाते, एखादा गोविंदा जखमी झाला, कायमचा अपंग झाला तर ‘औषधोपचारा’चा औपचारिकपणा उरकला जातो. त्याचवेळी या तारका मात्र लाखाच्या बिदाग्या घेत मंडळामागे मंडळं करत असतात. कधी काळी तमाशा, लावणीला नावं ठेवणारा हा अभिजन समाज आज कौतुकाने आपल्या पोरी भररस्त्यात निव्वळ पैसे घेऊन नाचवतोय. जय हिंदू धर्म! जय संस्कृती! जय दांभिकता! जय बाजारपण!
दहीहंडी पाठोपाठ गणपती येतो. हा सणही तीन/चार दशकांपूर्वी मर्यादित प्रमाणात होत असे. एखाद् दुसरं सार्वजनिक मंडळ असे. त्यांचे कार्यकर्ते अत्यंत विनम्रतेने अगदी चार चारदा फेर्या मारून देतील ती वर्गणी घेत असत. सादर होणार्या कार्यक्रमात स्थानिकांना वाव, मनोरंजन आणि प्रबोधनाचाही प्रयत्न असे. गणपतीपेक्षा देखावा सुंदर करण्याकडे सर्वांचा कल असे. गिरणगावात तर सर्व हाडाचे कलाकार, बहुसंख्य कोकणातून आलेले त्यामुळे मूर्तिकार, चित्रकार आणि खेळे म्हणजे गायन/वादन/अभिनयात निपुण! त्या काळात कुठलाही सार्वजनिक गणपती नवसाला पावत नसे. मुळात गणपतीला नवस बोलण्यापेक्षा, त्याचा आशीर्वाद घेण्याकडे कल असे. तो विघ्नहर्ता म्हणजे संकट दूर करेल अशी भावना असे. त्यामुळे नवसाला पावणारी दैवतं, सर्वसाधारणपणे कुलदैवतं, ग्रामदैवतं, दर्गे आदी असत.
लालबाग परळ या भागातच आमचं बालपण गेलं. त्या काळात भोईवाडा, नरेपार्क, कामगार मैदान, लाल मैदान या मैदानात सार्वजनिक गणपती बसत. या ठिकाणी दाखवले जाणारे सिनेमे, नाटकं आणि ऑर्केस्ट्रा यासाठी या गणपतीत चढाओढ असे, देखाव्यात असे. अमरहिंद मंडळ, नवहिंद बालमित्र मंडळ यांची नाटकं मैदानं ओव्हरफुल करत. तसंच त्यावेळी झंकार ऑर्केस्ट्राचा दबदबा होता. मोघे नावाचा निवेदक, एक सरदार जो सेम महमंद रफी, तर झंकारमधले अॅकॉर्डियन वाजवणारे सेम आर.डी.बर्मन!
याशिवाय शाहीर साबळे, शाहीर खामकर, बालकराम वरळीकर यांच्या कार्यक्रमांनाही गर्दी असे. कुठेही धार्मिक उन्माद नसे, राजकीय दादागिरी, शो बाजी नसे. पोस्टरबाजी नसे. रस्त्यावर अडवणूक नसे.
आठवतंय ते एवढंच, देखाव्यांच्या ज्या कल्पक स्पर्धा लागायच्या त्यातूनच कधी तरी ७०च्या दशकाच्या शेवटी कधी तरी हळूच बातमी फुटली यावेळी लालबागवाले २१ फूट गणपती करताहेत! बस्स! एवढीच काय ती ‘वेगळेपणाची’ खूण होती! त्यावर्षीच्या विसर्जनात ती भव्य मूर्ती आकर्षणाचा बिंदू ठरली. प्लाझा समोरच्या फोटो स्टुडिओच्या शोकेसमध्ये विसर्जनला चाललेल्या त्या मूर्तिचाफोटा पहायलाही गर्दी असे. त्यानंतर मग आणखी काही मंडळांनी ‘उंची’ वाढवून पाहिली पण लालबागने पहिली बाजी मारली. तिथून गेल्या तीस/चाळीस वर्षांत तो ‘लालबागचा राजा’ कधी झाला आणि नवसाला कधी पावायला लागला ते त्या गणपतीलाच माहीत. अगदी याच पद्धतीने प्रभादेवीला नर्दुला टँक मैदानाशेजारी कोकणातलं एखादं टुमदार मंदिर असावं असं छोटसं सिद्धीविनायकाचं मंदिर होतं. भाविकही जनरलच असत. पण बघता बघता प्रभादेवीच्या ग्रामदेवीला प्रभादेवीला मागे टाकत हा सिद्धीविनायक इतका मोठा झाला की टेररिस्टांच्या हिट लिस्टवर आला आणि स्वतः आणि भक्तांमध्ये भिंत उभारून आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतला श्रीमंत देव झालाय. पूर्वी मुंबईच्या गर्दीत भेटायचं ठिकाण म्हणून प्रेमी युगुलं जोडीने सिद्धीविनायकाला येत. दादरसारखं मध्यवर्ती ठिकाण आणि घरी गणपतीला गेलो होतो असं सात्विक कारण देता येत असे!
कळत नाही लालबागच्या राजाची जशी ख्याती वाढत गेली त्याच काळात गिरणगाव उद्ध्वस्त होत गेला तो आजतागायत. हजारो/लाखो प्रामाणिक कामगार कुटुंबासह देशोधडीला लागले. अनेक मुलामुलींची शिक्षणं अर्धवट राहिली. घरं गेली. आजही घरांसाठी गिरणी कामगार बायका मुलांसह रस्त्यावर असताना लालबागचा राजा नेमका पावला कुणाला?
कम्युनिस्टांना हुसकावून प्रस्थापित झालेल्या सेनेने, दत्ता सामंतांच्या युनियनने, अरुण गवळीच्या अभा सेनेने हा मराठी बहुल कुशल कामगार हक्काच्या कामावरून, राहण्याच्या जागेतून हुसकावून लावताना पाहिलाय. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या सेनेच्या शिवशाहीतच दादर, परळ, लोअर परळ, वरळीत टॉवर उभे राहिले. मराठी माणूस कोकणासह वसई, विरार, डोंबिवली, बदलापूर अशा ठिकाणी फेकला गेला. सेनेच्या स्थापनेपासून मधली पाच वर्षं महाराष्ट्र सरकारात आणि गेली पंचवीस वर्षं मुंबई महापालिकेत सेनेचीच सत्ता असून मुंबईतला मराठी टक्का घसरत गेलाय. सेनेच्या दोन सेना झाल्या. मराठीच्या झेंड्याला हिंदुत्वाच्या झेंड्याने झाकोळले. सेनेचे नगरसेवक, आमदार यांना लालबागच्या राजासह सिद्धीविनायकही पावला. पण सामान्य वर्गणीदाराला मात्र तो दरवर्षी पायावर डोकं ठेवायला बोलवतोच आहे!
आणि काल काय दिसलं? झी चोवीस तास वाहिनीने दाखवलं ते चित्र भयानक होतं. स्त्री/पुरुष/मुलं असा भेद न करता एक दांडगट स्वयंसेवक अक्षरशः मानगूट, दंड, डोकं धरून भक्तांना बाहेर फेकत होता, त्यात एक गणवेशधारी महिला पोलिसही होती! काही जण हसत होते, काही अचंबित तर काही चिडले होते. विशेषतः स्त्रियांची अवस्था केविलवाणी होती. मात्र तथाकथित सेलिब्रेटींसाठी तथाकथित कार्यकर्ते प्लास्टिकच्या मणक्याने वाकत होते! या असभ्यतेचा अजूनही निषेध झालेला नाही. बेजबाबदार वागणार्या त्या कार्यकर्त्यावर कारवाई व्हायला हवी. एका बाजूला दिल्ली रेप केससाठी फासावर पाठवल्याची बातमी आणि इथे साक्षात गणपती मांडवात स्त्रियांच्या अंगाला धरून असभ्यवर्तन! आणि लालबागचा राजा स्वस्थ!
नवसाला पावणारे हे लालबागचे राजे/ सिद्धीविनायक यांना सभोवताल दिसत नाही? बेंबीच्या देठापासून आवाज कुणाचा म्हणणारे देशोधडीला लागले आणि यांच्या दर्शनाला सेलिब्रेटीसह ‘साहेबांच्या’ पुढच्या पिढ्या परदेशी बनावटीच्या गाडीतून उतरतात तेव्हा कुणाचे नवस पूर्ण झाले ते कळतच की! की देवालाही आता (भक्ती) भाव सोडून दुसराच ‘भाव’ लागतो?
No comments:
Post a Comment