Wednesday, May 26, 2021

मराठा आंदोलन आणि आरक्षणास किलर ठरणारा सायलेंट झोन

 

“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. या आंदोलनाच्या विरोधी प्रतिक्रिया देण्यासाठी नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञानाही घाम फुटत होता. अलीकडेच सर्वोच्च नायायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा एक मराठा लाख मराठा सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे.  मराठा जातींना आरक्षण मिळू नये असे म्हणणारा व त्यासाठी अदृश्यपणे झुंज देणारा एक गट महाराष्ट्रात आहे. हा गट आपली आरक्षण विरोधी भूमिका कधीच लोकांच्या समोर उघडही करीत नाही व सार्वजनिकपणे मांडतही नाही. परंतु हा गट आपली आरक्षण विरोधातील भूमिका गाजावाजा न करता संथपणे आपल्या वशिलामार्फत आणि बहुजन समाजातील आपल्या बगलबच्चे मंडळी मार्फत मांडीत असतो. कारण या गटाने जर आपली मराठा आरक्षण विरोधी भूमिका जाहीरपणे मांडली तर त्यांना आपण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरूनच नष्ट होऊ अशी साधार भीती आहे. त्यासोबतच ते मराठा समाजातील काही तत्वांना हाताशी धरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात उघडपणे सक्रिय सहभागही दाखवितात. राजकारणाच्या भाषेत याला दोगली नीती असे म्हणतात. आपली व्होंटबँक मजबूत करण्यासाठी पाठींबा तर द्यायचा परंतु सोबतच आरक्षण मिळू नये याचीही तजवीज करून ठेवायची. महाराष्ट्रातील व देशातील मागासवर्ग व इतर मागास वर्ग (ओबीसी) हे मराठा आरक्षणा विरोधात नसून त्यांची भूमिका ही मराठा जातीच्या आरक्षणाच्या समर्थनार्थच आहे हे त्या त्या वर्गातील बुध्दिवंत, सामाजिक नेते व राजकीय नेत्यांशी बोलताना सहज जाणवते. त्यांचे म्हणणे वा मागणी केवळ एकच आहे, न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे. मग प्रश्न येतो तो हा की, इंद्र सहानी व नागराज यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानी घालून दिलेली ५० टक्क्याची मर्यादा का तोडता येवू नये! ही मर्यादा तोडण्यास कुणाचा विरोध आहे.? भारतीय संसद कायदा करून ती मर्यादा तोडू शकते. परंतु तसे होवू दिल्या जात नाही वा होऊ दिल्या जाणारही नाही. ५० टक्क्याची मर्यादा तुटू नये म्हणून कोण व कोणाचे बगलबच्चे न्यायालयात सारखी धाव घेत असतात? यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालयात केवळ जयश्री पाटील यांचाच अर्ज नाही तर, रुचिता जतिन कुलकर्णी आणि इतर विरुध्द मुख्यमंत्री, संजीत शुक्ला, मधुश्री नंदकिशोर जेठलिया आणि इतर, देवेन्द्र रूपचंद जैन आणि इतर, कमलाकर सुखदेव दारोडे, देशमुख इशा गिरीश, आदित्य बिमल शास्त्री आणि इतर, डॉ. अमिता ललित गुगले आणि इतर, सागर दामोदर सारडा आणि इतर, मोहम्मद सईद नुरी शफी अहमद आणि इतर, डॉ. उदय गोविंदराज ढोपले आणि इतर, विष्णुजी पी मिश्रा विरुध्द महाराष्ट्र राज्य यांच्याही याचिका आहेत. त्यामुळे केवळ गुणरत्न सदावर्तेवर बोलतोय म्हणून विरोधक ठरविणे हे अर्थहीन असून किलर असणार्‍या खर्‍या सायलेंट झोन मध्येही नजर टाकायला हवी.

  या आंदोलनाच्या संदर्भात दुसराही एक मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक सांस्कृतिकीकरणाच्या चलनातील मराठ्यांच्या कार्यकारणभावाचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीकीकरणात धार्मिक अधिकार नसलेल्या मराठा जाती ह्या आपल्या बडेजावपनाचे बरेच सोंग करीत असताना दिसतात. महाराष्ट्रात मोठमोठे यज्ञ समारंभ करण्याचे आयोजन असो, आरक्षण विरोधी मनोहर भिडे चे प्रायोजित कार्यक्रम असो, धार्मिक उत्सव असोत वा राजकीय अथवा सामाजिक पाडे असोत मराठा समाज हा त्यातील पुढारी असतोच असतो. म्हणजेच मराठा हा महाराष्ट्रातील दादा, मालक, शेर, वाघ अशा दुगण्या तर लावतोच परंतु समोरून आरे.. यायच्या अगोदरच तो कारे... म्हणणायास सरसावत असतो.. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ह्या दादां रावांना आपण “मागासलेले घटक आहोत, आपण गरीब आहोत, आपण सांस्कृतिक हतबल आहोत, आपले सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक शोषण होत आहे, असे वाटावे!, गायकवाड आयोगाच्या शब्दात आपण शूद्र आहोत” असे स्वप्न एकदमच पडावीत!. याचे आश्चर्य वाटते.

 

लेखक: बापू राऊत 

No comments:

Post a Comment