भाउराव पाटलांनी शाहू
महाराजापासून अनेक गोष्टी शिकल्या. त्याच प्रेरणेतून त्यांनी १९२३ साली रयत शिक्षण
संस्था स्थापन केली. सोबतच त्यांनी शाहू बोर्डिंगज काढल्या. त्यांच्या संस्था व वसतिगृहात मराठे, माळी, मुसलमान, जैन, महार, चांभार, ढोर आणि मांग अशा सर्व जातीचे विद्यार्थी
असायचे. वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ब्राम्हणेत्तरांना आपल्या
शिक्षण संस्थातून पुढे आणायचे होते. त्यांना दाखवायचे होते की चिपळूणकर, टिळक, आगरकर आणि कर्वे प्रमाणेच ब्राम्हणेत्तर सुध्दा मोठमोठ्या शिक्षण संस्था
काढू शकतात व चालवूही शकतात. त्यांनी आपल्या संस्थात ब्राम्हनांना येण्यापासून
रोखले होते. त्यांना वाटायचे यांच्यासाठी संस्थेचे दार उघडले तर ते भराभर आत
शिरतील आणि रयत शिक्षण संस्थेची
ब्राम्हणसभा बनवून टाकतील. भटाला दिली ओसरी आणि हळूहळू भट हातपाय पसरी या म्हणी
प्रमाणे. कर्मवीरांची भीती अनाठायी नव्हतीच. नंतर आपल्या हयातीमध्येच त्यांनी घरून
येणार्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला. त्यात ब्राम्हण व
ब्राम्हणेत्तर असे दोन्ही होते. परंतु त्यांच्या वस्तिगृहात खेड्यापाड्यातून आलेली
बहुजन समाजाचीच मुले असत.
म. ज्योतीराव
फुलेंप्रमाणेच त्यांना सनातन्यांचा वर्चस्ववाद व पूर्वगौरववाद अजिबात मान्य नव्हता. दहाबारा वर्षाचे
ब्राम्हणभटाचे शेंबड पोरगं आपले आजोबा शोभतील अशा मराठा व जैनाला अरेतुरे म्हणत
असे. अशा प्रथा “परंपरा म्हणून आतापर्यंत चालत आल्या असतीलही, परंतु आता
त्या खपवून घेणार नाही व चालू देणार नाही” असे म्हणत ते कडाडले होते.
औदुंबर येथे
दत्त जयंतीचा भंडारा उत्सव भरत असे. या भंडार्यासाठी पैसे व धान्य शेतकरी व बहुजन
समाजातील लोकाकडुन जमा करण्यात येई. या भंडार्यात दत्ताचा प्रसाद म्हणून
जेवणाच्या पंक्ति बसत असत. परंतु त्या पंक्ति केवळ ब्राम्हणांच्या असत. ब्राम्हण
जेवत असत आणि तेथे जमलेले असंख्य शेतकरी ते दृश्य पाहत असत. धान्य त्यांनीच दिलेले
परंतु ते सर्व ब्राम्हणांच्या पोटात जात असे. ब्राम्हण जेवल्यावर उरलेले अन्न
इतरांना वाटण्यात येत असे. काहींना यात श्रध्दा दिसत असेलही. उभ्या असलेल्या
शेतकर्यात काही सत्यशोधकही होते. त्यांना हे पाहावले नाही. त्यांनी कर्मवीर
पाटलांना हा प्रसंग सांगितला. कर्मवीर विचलित झाले. ते म्हणाले, “उद्या
तेथे ब्राम्हनांची एकही पंगत होता कामा नये. पंगतीच्या जागेवर माझा भाषणाचा टेबल व
प्यायला पाणी ठेवा. मी उद्या तेथेच शेतकर्यासामोर भाषण देणार आहे.
कर्मवीर पाटलांचा
आवाज बुलंद होता. त्यांच्या भाषणात शेतकर्याविषयीची तळमळ व कळवळा होता. ते तब्बल पाच
तास बोलले. भुकेले ब्राम्हण जेवणासाठी ताटकळत उभे होते. सोबतच कर्मवीराच्या
भाषणाचे सोटेही खात होते. एवढ्यात त्यांना पंगतीसाठी जागा रिकामी करण्याच्या सूचना
आल्या. त्यावर कर्मवीर म्हणाले, तुमचे ब्राम्हण भुकेले
असतील, परंतु तुमचे अन्नदाते हे समोर बसलेले शेतकरीसुध्दा
भुकेले आहेत. त्यांच्या भुकाकडे कधी लक्ष दिले होते का? आता
असे करा, ब्राम्हणांची व ब्राम्हणेत्तरांची एकच पंगत बसवा. देवाचा
प्रसाद आहे. आगे मागे काही नको. सार्यांनाच प्रसाद घेवू द्या.
व्यवस्थापक
म्हणाले,
अन्न फुकट गेले. ब्राम्हण वाट पाहून निघून गेले. कर्मवीर म्हणाले, नशीब त्या ब्राम्हणांचे, टाका ते अन्न कृष्णामाईत
आणि ते सभास्थानाहून चालते झाले. त्या भाषणातून शेतकर्यांना नवा संदेश व नवा विचार
मिळाला होता. अर्थातच तो संदेश समानतेचा व विषमतेला गाडून फेकण्याचा होता. पहिले, “केवळ तुम्हीच नाही, तर मिळून
मिसळून सर्व एकसाथ”.
सार्या शेतकर्यांना
कर्मवीराचा तो विचार पटलाच असेल असे नाही. तसे असतेच तर आज पाटलाच्या व
ब्राम्हणेतरांच्या घरात पूजेसाठी ब्राम्हणांना आवतन गेले नसते. आपल्या घरी पकलेले अन्न
ब्राम्हण खात नाही म्हणून अन्नाचा कच्चा शिधा ब्राम्हणाच्या घरापर्यंत पोहोचविला नसता.
खुद्द भाउराव पाटील मान्य करतात की, आमचे लोकच कच्चे होते.
चळवळीचे ज्ञान त्यांना नीट कळले नाही. तारतम्य जाणण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. सत्यशोधक
चळवळ बंद झाली, हेच ठीक झाले. आता दुसर्या वाटा शोधता
येतील.
हा खरे तर सत्यशोधक
चळवळीचा पराजयच होता. सत्यशोधक कसे इकडे तिकडे पसार झाले हा इतिहास आहे. महात्मा फुले
व शाहू महाराजांच्या विचारांचे धणूष्यबान त्यांना पेलता आले नाही. यापेक्षाही पेरियार
आंबेडकर चळवळीची कितीतरी वाताहत झाली. आंबेडकरवादी चळवळ ही धार्मिक, सांस्कृतिक
सामाजिक, राजकीय व प्रशासनिक दृष्ट्या एक हरलेली आणि स्व:हस्ते
हरवलेली चळवळ आहे. हे असे का झाले? यावरील विचारांच्या खोलात
जाण्यासाठी हा लेखप्रपंच नाही. पुढे कधीतरी यावर लिहू.
लेखक : बापू राऊत
No comments:
Post a Comment