Friday, October 28, 2022

हिंदुत्व व बहुजनांचे जातीय शोषण

 

जाती हा भारताच्या सामाजिक व्यवस्थेचा मुख्य गाभा आहे. जातीवरून भेदभाव करणे हा भारतीय संस्कृतीचे एक अभिन्न अंग बनले असून  कोणत्याही  निर्णय प्रक्रियेत जातीकडे मुख्य घटक म्हणून बघितल्या जाते. आपल्या देशातील हे  उघड  वास्तव व सत्य वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला मोठे मन लागते. जगाला हे सत्य सांगण्यात आपण नेहमीच चाचपडत असतो. आंतरराष्ट्रीय पटलावर जेव्हा भारतातील जातीय भेदभाव व अन्यायाचा  प्रश्न येतो तेव्हा  येथे जातीय भेदभावाचा प्रकारच नाही असे केंद्र सरकार कडून धांदात खोटेच सांगितले जाते. ठासून खोटे बोलण्याचा हा प्रघात  भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

भारतीय नागरिकासाठी धर्म हा शरीराचा बाह्य भाग असून जात व जाती ह्या त्यांचा अंतरात्मा असून  आम्ही सारे एकसमान हिंदू आहोत हा शब्द पाण्याच्या  बुडबुड्यासारखा क्षणिक झाला आहे. हिंदू ह्या शब्दात आत्मभाव नसून तो  जातीय असमानतेच्या कैचीत बंदिस्त झाला आहे. खरे तर, हिंदू हा शब्द धार्मिक किंवा धर्मवादी नसून राजनीतिक आहे. ती एक  भौगोलिक संज्ञा असून हिंदू या शब्दाची उत्पत्ती अरेबियन लोकाद्वारे भारतीयांना संबोधण्यासाठी झाली आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ हिंदू या शब्दावर प्रेम व गर्व करण्याइतका कोमल नसून मानहानीकारक आहे. त्यामुळे अशा मानहानीकारक शब्दावर बहुजन लोकांनी  प्रेम का करावे ? असाही प्रश्न उपस्थित होतो. ज्या काळात अरब भारतात आले, त्या काळात परंपरेने भारतीय जनता हि बुध्दाच्या विचाराची  उपासक होती. तर ब्राम्हण हे वैदिक धर्म वा सनातन धर्माशी सबंधित होते. त्यामुळे हिंदू हा कोणाचा तरी धर्म आहे हि संकल्पनाच व्याह्यात अशी आहे. तरीही हिंदू शब्दाला चिकटून राहण्याची कवायद वैदिक करीत आहेत.

भारतात जे लोक हिंदू वा हिंदुत्वाचा बागुलबुवा उभा करतात, ते सर्वाधिक जातीयवादी आहेत. त्यांनी हिंदू म्हणजेच जाती व वर्णाचे कडबोळे असे समीकरण बनविले आहे. भारतात ब्राम्हण (वैदिक) व श्रमण (अवैदिक) अशीच उभी विभागणी होती. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर म्हणजेच पुष्यमित्र शुंगाच्या काळात मनुस्मृतीच्या रचनेतून  जाती व उचनीचतेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. मनूच्या रचनेत हिंदू व हिंदूची रचना अशा शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. एका जातीकडून आपण दुसऱ्या जातीपेक्षा कसे वरचढ आहोत यावर कथा लिहिण्यात आपले जीवन घालविले. त्यालाच नंतर परंपरा व पुर्वइतिहास असे गोंडस नाव देण्यात आले. ब्राम्हण जाती ह्या इतर जातीपासून आपण फार वेगळे आहोत हे सार्वजनिकरीत्या आपल्या कृतीतून दाखवीत असतात. डोक्यावर शेंडी ठेवणे, गळ्यात जाणवे घालणे, मूत्रपक्षनाच्या वेळीस जानवे कानात घालणे, कपाळावर रक्षा व आडवे गंध लावणे ह्या गोष्टी ब्राम्हण आपला वर्चस्वपणा दाखविण्यासाठी उघडपणे करीत असतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे समोरच्या व्यक्तीस हि व्यक्ती ब्राम्हण जातीची आहे हे कळून येत असते. मात्र बाकी कोणत्याही जातीकडे असे सार्वजनिक दिखाव्याची व अलगपणाची कोणतीच मापदंडे नाहीत. ब्राम्हण जातींची आडनावे व बहुजन जातीतील आडनावे तसेच लग्नविधी सारख्या इतर पध्दती मध्ये कुठेच साम्यता दिसून येत नाही. म्हणून हिंदू या भौगोलिक क्षेत्रात ब्राम्हण हि अधिक विषमतावादी जात म्हणून समोर येते.

ब्राम्हण हि जात इतर जातीवर अधिक अन्याय करते त्याचे दुसरेही पैलू आहेत. धर्म व पूजापाठांच्या बाबतीत ते ठळकपणे जाणवते. कोणतीही गोष्ट हि ब्राम्हणांच्या हातातूनच झाली पाहिजे. असा त्यांचा दावा असतो. या दाव्यासाठी त्यांनी वेद, पुराण, स्मुर्त्या मधून कथांची शिस्तबध्द पेरणी केली आहे. आणि ह्या कथा देवानी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यात बदल करण्याचा कोणासही अधिकार नाही. असे अधिकारवाणीने सांगितले जाते. असे न केल्यास आपल्या कुटुंबात काही विपरीत घडेल व त्यातून आपले फार मोठे नुकसान होईल अशी भीतीही दाखवीत असतात. मंदिराचा पुजारी ब्राम्हणच असला पाहिजे. मंदिरात मिळणाऱ्या दानावर ब्राम्हणच आपला दावा ठोकत असतात. हिंदुतील इतर जातीना यापैकी कोणतेही हक्क नसतात. त्यामुळे बहुजन जातीवर धार्मिक विधीसाठी केवळ उधळपट्टी करणारा सामाज असा शिक्का बसतो.

असा  धार्मिक वर्चस्ववाद टिळक व सावरकरांना कायम टिकवायचा होता. त्यासाठीच त्यांनी हिंदू  व हिंदुत्व या शब्दावर अधिक भर दिला. म्हणून  हिंदुत्व हे दुसरे तिसरे काही नसून भौगोलिक हिंदूतील ब्राम्हणांचे इतर जातीवर वर्चस्व गाजविणारी शब्दरचना ठरते. हिंदुत्व हे समजदार व चतुर लोकांनी असमजदार व भोळ्या लोकावर लादलेले एक सांस्कृतिक व्याकरण होय. हिंदुत्व हे बहुजन जातींच्या सुधारणा व सुसंस्कृत बनण्या विरोधातील अस्त्र होय. हिंदुत्व हे बहुजन जातींना आस्था, अंधश्रद्धा व काल्पनिक कथामध्ये गुरफटवून ठेवणारी मालिका आहे. हे जातीय हिंदुत्व शासनाच्या विविध आस्थापनेत अधिक प्रखरतेने दिसून येते. महत्वाच्या पदावर अवैदिक हिंदुना शिरकाव करू देण्यात येत नाही. हे लोकसेवा आयोगातील लेटरल प्रवेश व आर्थीक आरक्षणाच्या भरतीवरून दिसून येते.   माध्यमांच्या क्षेत्रात केवळ वैदिकांचे वर्चस्व आहे. एकूणच देशाला नियंत्रित करणाऱ्या सर्व संस्थावर ब्राम्हण जातींनी  आपला कब्जा  केला हे  शासकीय आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. हे सारे नियोजन हिंदुत्वाचा जप करीत हिंदुत्ववाद्यांनी आपल्या सोयीसाठी केलेली व्युव्हरचना आहे. भारतातील ब्राम्हणेत्तर जातीसाठी हिंदुत्व हि एक अफूची गोळी ठरली आहे. अफूच्या या गोळीचे महत्व हिंदुत्वाच्या जन्मदात्यांना कळून चुकले होते. हे ब्राम्ह्णेत्तर लोकांच्या विरोधात रचलेले  कुंभाड आहे हे लक्षात येवू नये यासाठी त्यांनी मुसलमानाना आपले साधन  बनविले असून हेगडेवार व गोळवलकरांच्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून अशा हिंदुत्वाचा शिस्तबध्द प्रचार जोरकसपणे सुरु आहे. 

हिंदुत्व हे मुस्लीम विरोधी नसून हिंदुतील जातीना वश करून ठेवण्याची नीती  आहे. या नीती विरोधात हिंदुतील जातींनी बंड करू नये म्हणून मुसलमान नावाचे हाड चघळण्यासाठी ब्राम्हणेत्तर जातीकडे फेकण्यात आले असून  ब्राम्हणेत्तर जाती (ओबीसी, दलित व आदिवासी ) यास बळी पडल्या आहेत. 

संपूर्ण जगाने फार पूर्वीच आधुनिकतेकडे प्रवेश केला आहे. नवनवे शोध लागून जुन्या संकल्पना कालबाह्य ठरून मोडकळीत निघाल्या. सर्वांना समान संधी व सर्वाकडे समान नजरेतून बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाल्यामुळे जुने ग्रंथ हे  इतिहास म्हणून ठीक असले तरी आचरण म्हणून कालबाह्य झाले आहेत. पूर्वीचे लोक हे आजच्या आधुनिक लोकांपेक्षा हुशार व विद्वान होते असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. त्यामुळे सार्वमताच्या, एकमेकांच्या सन्मानाच्या व समानतेच्या मार्गाने जाणे हेच अधिक सयुंक्तिक ठरून जंगलेल्या शब्दप्रामाण्यांना मनाच्या कुंपणाबाहेर ठेवणे कधीही हिताचे होईल. यातूनच बहुजन जातीचा विकास होवून हिंदुत्वाच्या नावाखालील अदृश्य असे जातीय शोषण नष्ट होण्यास मदत होईल.  

लेखक: बापू राऊत 

No comments:

Post a Comment