Saturday, September 23, 2023

सनातन (वैदिक) विरोधी हिंदू धर्म हा महायान बुद्धिज़्मचे परिवर्तित रूप आहे का?

 


तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेली टिप्पणी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नव्हे तर या टिप्पणीवर सनातन धर्मातील काही बिघडलेल्या साधुनी उदयनिधी स्टॅलिनला मारण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले. सामान्य हिंदू मात्र सनातन धर्मावरील या चर्चेने फार गोंधळलेला दिसतोय, कारण त्याला वाटते की, मी तर हिंदू आहे, मग हा सनातन व वैदिक धर्म आहे तरी काय?.  किंबहुना त्याला वाटायला लागल कि, मी नेमका कोणत्या धर्माचा? सनातन कि हिंदू. म्हणूनच सनातन आणि हिंदू धर्म यांच्यातील खरा संबंध तपासणे आणि तो समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला सामाजिक विषमता, भेदभाव, उचनीच, जातिवाद आणि स्त्रियांचे अवमूल्यन यांच्याशी जोडून डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग जसे दूर करतोय, त्याच प्रमाणे सनातन धर्मातील असमानतावादी तत्त्वे नष्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. पण आरएसएस आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याला नरसंहाराची सुपारी म्हणून प्रसारित केलंय.

सनातन धर्म म्हणजे नेमकं काय?

वास्तविक, ‘सनातन’ हा पाली भाषेतील मूळ शब्द आहे. गौतम बुद्धांनी सनातन हा शब्द अपरिवर्तनीय अवस्थेशी जोडला होता. उदाहरणार्थ, शत्रुत्वाने शत्रुत्व वाढते, प्रेमाने प्रेम वाढते, प्रत्येक जन्मलेल्या मानवाला एक दिवस निश्चित निर्वाण प्राप्त होणे. ह्या बाबी नित्यनेमाने होणाऱ्याच असतात. कारण ते शाश्वत आहे. गौतम बुद्धांनी निसर्ग, सूर्य, चंद्र, पाणी, अग्नी, वायू आणि पृथ्वी यांना शाश्वत म्हटले होते, जे अगदी अनादी काळापासून अस्तित्वात आहेत आणि पुढेही राहणार आहेत. म्हणून त्या सनातन आहेत. सनातनमध्ये बदलाला वाव  नसतो.

परंतु काही लोक सनातनच्या नावाने चुकीचे संदेश देऊन स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करीत असतात. सनातन शब्दाला धर्मग्रंथातील घटनासी जोडून ग्रंथात सांगितलेल्या गोष्टींना त्यांनी सनातन असे संबोधले. म्हणजेच ग्रंथात सांगितलेल्या वाईट बाबी ह्या न बदलणार्या आहेत. सनातनच्या धर्मग्रंथामध्ये वेद, उपनिषदे आणि स्मृती (मनुमूर्तीसारखे ग्रंथ) यांचा समावेश होतो. सनातन धर्माचे पालन प्रामुख्याने उच्चवर्णीय वर्गातील लोक करतात. कारण ते सनातन धर्म हाच आपला मूळ धर्म आहे असे मानतात.

सनातनी शब्दाचा गैरवापर

धर्मग्रंथ हे सनातनी वर्गाच्या पूर्वजांनी रचलेले आहेत. या धर्मग्रंथांमध्ये काही कथा आणि गोष्टींचा उल्लेख आहे. या कथातील उल्लेख त्यांनी आपल्या फायद्यासाठी लिहिलेल्या आहेत. परंतु त्यात सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या, भेदभाव, अपमान करणार्या आणि समाजात फूट पाडणार्या आहेत. या धर्मग्रंथानुसार जातिवाद, वर्णवाद, अस्पृश्यता,  देशाटन, शुद्र व स्त्रीयांना शिक्षण व मंदिर प्रवेश बंदी आणि भेदभाव हे शाश्वत (सनातन) आहे असे मानून कट्टर उच्चवर्णीय लोक त्यातील बदलाच्या विरोधात आहेत. आणि हेभांडणाचे खरे मूळ आहे. सनातनी शब्दाचा गैरवापर करून धर्मातील वाईट गोष्टीचे समर्थन करण्यात येते

सनातन धर्म आणि हिंदू धर्म यांच्यातील विरोधाभास

हिंदू धर्म या शब्दाचा इतिहास फार प्राचीन नाही. हिंदू शब्दाचे अस्तित्व कोणत्याही धर्मग्रंथ, वेद, स्मुर्त्या आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यांमध्ये आढळत नाही. म्हणूनच हिंदू हा शब्द पौराणिक आणि जुना नाही. हिंदू हा शब्द आदि शंकराचार्यांच्या काळातही अस्तित्वात नव्हता. त्यांच्या काळात उत्तर आणि दक्षिण भारताच्या काही भागात शैव आणि वैष्णव यांसारखे पंथ उदयास आले. सनातन धर्म वैदिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही धर्मांना मानणारा एकमेव समूह म्हणजे आर्य ब्राह्मण होत. परंतु सनातन धर्माचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नसून हिंदू हा शब्द भारतात पहिल्यांदा तेराव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी वापरला. ते भारताला हिंदुस्थान आणि स्थानिक लोकांना हिंदू म्हणू लागले. सनातनी वैदिक धर्म हा भारतात हिंदु शब्द येण्याच्या आधीपासून अस्तित्वात होता. त्यामुळे वैदिकांची धर्मग्रंथे ही हिंदूची नाहीत हे सिद्ध होते. परंतु जसजसा हिंदू हा शब्द बहुजन समाजात रूढ होऊ लागला आणि त्यांची सांस्कृतिक व्यवस्था हिंदू शब्दाने ओळखु जाऊ लागली, तसतसे वैदिक ब्राह्मण स्वत:ला हिंदू म्हणवू लागले. आणि त्यांच्या वैदिक धार्मिक ग्रंथांना हिंदू शब्दाशी जोडून त्यांना हिंदू धर्माचे ग्रंथ संबोधू लागले. जातिव्यवस्था ही ब्राह्मणी वैदिक धर्मग्रंथांची देणगी असून ती हिंदू व्यवस्थेची नाही. हिंदू स्वत:ला कमी दर्जाचे समजून घेणारे नव्हते तर ते समानतेचे भोक्ते होते. म्हणून अशा ग्रंथांना हिंदू व्यवस्थेत स्थान नव्हते.

महायानी बौद्ध हेच आजचे नामपरिवर्तीत हिंदू  

भारतात बहुजन समाज संख्येने अधिक होता. जेथे ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती आणि धर्मांतरित लोकांचा समावेश होतो. या बहुजन समाजावर बौद्ध धर्माचा अधिक प्रभाव असल्यामुळे ते बौध्दधर्मीय होते. कालांतराने बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायानामध्ये अधिक वेगाने विभाजन होत गेले. महायान पंथ नवीन रूप धारण करत होता. त्यांच्यात  मूर्तीपूजा, गूढवाद आणि चमत्कारांचा विस्तार होत होता. शेती, पाळीव प्राणी, जलीय प्राणी  आणि सामाजिक जाणिवेसोबतच मनोरंजनासाठी उत्सवाचे नवनवीन प्रयोगही विकसित होत होते. या विकासामुळे बहुजन समाजाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडण वाढली आणि स्थिर झाली. भारतात अनेक ठिकाणी महायानांनी मंदिरे आणि स्तूप बांधले आणि त्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती बसवण्यात आल्या. परंतु आदि शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या काळापासून राजाश्रय मिळू लागल्यामुळे महायानी बौद्धांची मंदिरे ताब्यात घेतली जाऊ लागली. मंदिरांमधील बुद्धाच्या मूर्तींमध्ये बदल करण्यात आले. गौतम बुद्धांच्या मूर्तींवर भगवा रंग लावून त्यांची देवी-देवता म्हणून पूजा केली जावून  प्रत्येक मंदिराच्या काल्पनिक कथा रचण्यात आल्या.

तत्कालीन राजे ब्राम्हण वर्गाच्या सल्ल्याने राज्य चालवू लागल्यामुळे प्रजेवर ब्राम्हणांचे वर्चस्व प्रस्थापित होवू लागले. सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत पुराणे, महाकाव्ये आणि काव्ये रचली गेली. आजही प्रसिद्ध मंदिरांमध्ये बुद्धाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. जमिनीखाली जिथे उत्खनन केले जाते तिथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडतात. परंतु त्यात सनातन वैदिकांची कोणतेही प्रतीके आढळत नाही. एवढेच नव्हे तर शिलालेखावर कोरलेली प्राकृत व खरोष्ठी भाषा असून त्यात संस्कृतचा मागमूसही दिसत नाही. यावरून वैदिकांची शास्त्रे व संस्कृत भाषा ही अति प्राचीन नसल्याचे व तिचा त्याकाळातील जनतेवर प्रभाव नव्हता.

सन १९५६ पर्यंत भारतात स्वत:ला महायान किंवा हिनयान बौध्द म्हणवून घेणारे कोणीही अस्तित्वात नव्हते. याचाच अर्थ १३व्या शतकाहिंदु हा शब्द प्रस्थापित झाल्यानंतर बौद्ध धर्माच्या महायान व हिनयानी जनतेने स्वत:ला हिंदू संकल्पनेमध्ये सामावून घेतले. नंतरच्या काळात त्याला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. असे असले तरीही ब्राह्मण लेखक आणि तथाकथित विचारवंत सनातनी वैदिक धर्मियांच्या ग्रंथासाठी हिंदू शब्दाचे लेबल लावीत असतात. हे नैतिकतेच्या आणि वस्तुनिष्ठ नियमांच्या विरुद्ध असून सनातनी वैदिकही स्वतःला हिंदू म्हणवू लागले आहेत. स्वार्थासाठी ते सनातन आणि वैदिक धर्म, शैव, वैष्णव पंथ आणि आपल्या देवी-देवतांना विसरले आहेत. आता तर हिंदू धर्मालाच आपला सनातनी आणि वैदिक धर्म ठरवू लागले आहेत. वर्तमान काळात नेहमीच आपले हित सुरक्षित ठेवू पाहणारे वैदिक सोयीप्रमाणे डावपेच बदलताना दिसतात. बदलत्या काळात हिंदुनीही वैदिकांचे डावपेच ओळखून आपल्या पूर्वजांच्या समानतेच्या विचाराकडे झेपावले पाहिजे.

बापू राऊत

लेखक आणि विश्लेषक

13 comments:

  1. खुप छान आणि विश्लेषणात्मक लेख लिहिल्या बाबद आपले मना पासून अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या संस्कृतीची व धर्माची आठवण करून देण्यासाठी हा लेख प्रपंच होता. भारतीयांच्या पूर्वजांची संस्कृती ही सहिष्णुतेची व सर्व समावेशकतेची होती. त्यांची सहिष्णुता व वैज्ञानीक दृष्टीकोन यामुळेच भारत सर्व क्षेत्रात अग्रेसर होता. परंतु अलीकडच्या काळात काही मुलतत्ववाद्यांनी भारताच्या प्रतिमेला ओरबडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक भारतीय म्हणून तसे होवू देवू नये हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या संस्कृतीची व धर्माची आठवण करून देण्यासाठी हा लेख प्रपंच होता.

      Delete
  3. सन १९५६ पर्यंत भारतात स्वतःला हिनयानी व महायानी समजून घेणारे कुणीही अस्तित्वात नव्हते.१३ व्या शतकात हिंदू हा शब्द प्रस्थापित झाल्यानंतर बौद्ध महायान व हिनयानी जनतेने स्वताला हिंदु संकल्पनेमध्ये सामावून घेतले होते.त्याचे कारण बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे,ही संकल्पना वैदीक धर्मीयांनीच हिंदू धर्मात रुजवली.त्यास महायानी वा हिनयानी जनतेने विरोध दर्शविला नसावा.जैनानी जशी शरणागती पत्करून स्वतः ला हिंदू धर्मात समाविष्ट करुन घेतले तसेच काहीसे बौद्ध धर्मीयांनी केले असावे.आणि ज्यांनी तसे केले त्यांच्या वर अस्पृश्यता लादण्याचे क्रौर्य , मनुस्मृती व्दारे याच वैदिक धर्मीयांनी केले. आणि हिंदू धर्मीयांनी हे सर्व निमुटपणे स्विकारले ,असे यावरुन दिसते.
    आता या हिंदू धर्मीयांनी वैदिकाचे हे डावपेच ओळखुन आपल्या पूर्वजांच्या समतेच्या विचारांकडे झेपावले पाहिजे,असे लेखकाला वाटत असेल तर ही अपेक्षा स्वप्नवत वाटते. सध्याच्या हिंदू धर्मीयांना भिती वाटत आहे की, वैदिकांच्या विरोधात आपण गेलो तर आपल्याला ही ते अस्पृश्यतेत ढकलून देतील.अस्पृश्यांची स्थिती पुर्वी कशी होती, आताही कायदा करून अस्पृश्यता घालवली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन, प्रशासनावर नियंत्रण असणारे राज्यकरते ,इथली न्याय व्यवस्था, प्रसार माध्यमे त्या कायद्याची कशी वासलात लावतात.त्यामुळे अशा अवस्थेत ते, हिंदू स्वताला झोकून देऊ शकत नाहीत.
    अखेरीस एकच मार्ग उरतो तो म्हणजे राजा अशोकाच्या तोडीचा राजा, जो स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी होता,असा राजा सत्ताधीश होऊन राज्यकारभार करणार नाही , अर्थात बौद्ध धर्माला राजाश्रय लाभत नाही,तो पर्यंत हिंदू धर्मीय वैदिकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या महायान, हिनयानी बौद्ध धर्माच्या समतेच्या, समानतेच्या विचाराकडे झेपावणार नाहीत.
    धन्यवाद!


    ReplyDelete
    Replies
    1. वैदिकांना विरोध करणार्या एखाद्या समूहाला परत अस्पृश्यतेसारख्या पध्दतीला सामोरे जावे लागेल. ही भीती शहरी नागरिकांना नवीन वाटते. परंतु देशातल्या काही भागात ही प्रथा आजही अस्तित्वात असून तिचे कमी अधिक प्रमाणात पालन होतेय. ही वस्तुस्थिती आहे. संविधानाच्या काटेकोर पालनाने ते नष्ट करता येत होती. परंतु राजकीय व प्रशासकीय सत्तेमध्ये वर्णव्यवस्थेचे पालन करणारे लोकच असल्यामुळे ते ती होवू देत नाहीत. समानतेची मानसिकता आजही भारताच्या नागरी समाजा मध्ये रुजली नाही.

      Delete
  4. राजाश्रयाशिवाय धर्माचा प्रचार-प्रसार होणार नाही हे सत्य. आणि सध्याची परिस्थिती बनता राजाश्रय अशक्य. उलट छळच जास्त. त्यामुळे प्रबोधनाखेरीज दुसरा मार्ग दिसताच नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. किशोर भगतSeptember 23, 2023 at 12:23 PM

      राजाश्रय अशक्य आहे हे एकदा मान्य केले की समतेचा आग्रह निर्धार पुर्वक,वेळ पडल्यास सक्तीने करण्याचा मार्ग बंद होतो(राजाश्रय नसल्याने).मग उरतो तो आपण सुचविल्या प्रमाणे आधुनिक लोकशाहीतील प्रबोधनाचा मार्ग.त्या मार्गाने हिंदू समाज बदलण्याचे प्रयत्न अनेक समाजसुधारकांनी आजतागायत केले आहे.पण कुणालाही १०० टक्के यश मिळाले नाही,हा इतिहास आहे.चर्वाक, तसेच अनेक बुद्ध गिळंकृत, पचवून करून वैदिक धर्म प्रबळ झाला आहे. तथागत गौतम बुद्धांनी इश्वरी शक्तीला नाकारण्याचे जसे धाडस केले,तसे धाडस त्यानंतर च्या कोणत्याही धर्म संस्थापकाने उदाहरणार्थ इसाई, इस्लाम,जगातला तरुण धर्म शीख या धर्माच्या संस्थापकांनी केल्याचे दिसत नाही.त्याचे प्रमुख कारण देखील हेच असावे की जैनांनी जशी शरणागती पत्करली, वैदिकांचे म्हणणे मान्य केले,त्याचेच अनुकरण आपण केले नाही तर हिनयानी, महायानी बौद्धांना म्हणजे
      आपण म्हणता त्या हिंदू धर्मीयांना वैदिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, किंबहुना अस्पृश्यता पत्करावी लागेल अशी भीती आजही कायम आहे.
      धन्यवाद!

      Delete
    2. सर, कोणत्याही विचारधारेच्या वाढीसाठी राजाश्रय महत्वाचा असतो. त्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. परंतु ते पूर्णसत्य आहे असे म्हणता येत नाही. कारण एखाद्या तत्ववेत्त्याचा विचार जर मार्मिक, सहृदयी, तार्किक, वास्तव व निसर्गाच्या दैनंदिन बदलासी समरस असेल तेव्हा ते विचार किंवा तत्व हे मनुष्यत्वाच्या बुद्धीला सहज पटू लागते व मग ते सर्वाना स्वीकार्य होत असते.

      Delete
  5. निसर्ग नियम म्हणजे सनातन धर्म. वैराने वैर वाढते. अवैराने ते शांत होते. हा निसर्ग नियम आहे. या नियमालाच बुद्धांनी सनातन धम्म म्हंटले आहे. अशाच प्रकारचे निसर्ग चक्राचे नियम आहेत.
    आपण जर वाराणशीच्या संग्रहालयात गेलात तर वेदिक धम्म हा बुद्धांच्या काळात होता. वेद हे त्यावेळी लिखीत स्वरूपात नव्हते. भगवान बुद्धांच्या धम्माचे जेव्हा संगायन झाले तेव्हा तिपिटक हे अरहंत भिक्षूंच्या मुखोदगत होते. तोंडपाठ होते. ती परंपरा सम्राट अशोकाच्या काळात पाटणा येथे तिसरी धम्म संगीती होईपर्यंत होती. ती पद्धती म्यानमार श्रीलंका देशात आजही अस्तित्वात आहे. पूर्ण तिपिटक तोंडपाठ असणारे तिपिटकधारी, विनयपिटक तोंडपाठ असणारे विनयपिटकधारी. सुत्तपिटक तोंडपाठ असणारे सुत्तपिटकधारी व अभिधम्म तोंडपाठ असणारे अभिधम्म पिटकधारी असतात. तसे सम्राट अशोकाच्या काळात होते. सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी त्यांचे शिलालेख, प्रस्तरलेख हे ब्राह्मी भाषेत लिहिले. त्यावेळी भाषा पाली होती व लिपी ब्राह्मी होती. या ब्राह्मी लिपीसोबतच उलटी लिहली जाणारी खारोष्टी लिपी होती. त्यावेळी आठ स्वर होते. व्यंजन पण कमी होती. पुढे ब्राह्मी लिपीचे विस्तारित रूप म्हणजे संस्कृत लिपी. संस्कृत म्हणजे च्यापासून बनलेला ( Made up from). म्हणजे संस्कृत भाषा सम्राट अशोकाच्या काळात इ.सा.पू २०० मध्ये अस्तित्वात नव्हती. ती त्यानंतर कधीतरी अस्तित्वात आली. मग संस्कृत भाषेतील ग्रंथ देखील खुप नंतर आले. मग हिंदू धर्म सनातन धर्म कसा होवू शकतो.
    पाली भाषेतील अमत हा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे आता पुन्हा मरण नाही. अ म्हणजे नाही. मत म्हणजे मृत्यू. पुन्हा मृत्यू नाही असे अमतं पद. म्हणजे निब्बाण.
    भगवान बुद्धांची आई महामाया हिचे निधन झाल्यानंतर मावशी महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थ गौतमाचा संभाळ केला म्हणून आई मरो व मावशी उरो ही म्हण प्रचलित झाली.
    अशा प्रकारे हिंदू धर्म हा कर्मकांडात रूपांतरीत केलेला धर्म आहे. त्यांच्या न बदलणारी अशी मनुस्मती आहे ती कधीच निसर्ग नियम म्हणजे सर्वत्र एकाच प्रकारे होते तशी ती नाही. म्हणून सनातन असा कोणताही धर्म नाही. तर निसर्ग नियम हाच सनातन धर्म आहे. जो भगवान बुद्धांनी सांगीतला आहे.
    जयभिम. नमोबुद्धाय.

    ReplyDelete
  6. खुप छान अन अभ्यास पूर्ण लेख. जय भीम🙏

    ReplyDelete
  7. खूप सुंदर आणिआभ्यस पूर्ण लेख वाचून आनंद झाला.

    ReplyDelete