Saturday, November 17, 2012

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गेला



बाळासाहेब एकदा एका सभेत दलित नेत्याविषयी म्हणाले होते की तुम्हाला काय भांडायचे असेल ते भांडा, चाटा, समाजाचे वाटोळे करा. नाहीतरी काय केल तुम्ही समाजासाठी?. बाबासाहेबांची भीमशक्ती वाया जात आहेच ना!. आंबेडकरी चळवळीची कालची व आजची राजकीय दुर्दर्शा व फाटाफूट बघितली तर बाळासाहेब जे म्हणाले त्यात खरेपणा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. एक आंबेडकरवादी व विश्लेषक म्हणून मला तर ते मुळातच नाकारता येणार नाही.

बाळासाहेबाने महाराष्ट्रात एक धाक निर्माण केला होता. त्यांचे सवेंदनाक्षम भाषण व त्यांच्या विराट सभा हे विरोधकांना धडकी भरविणारे होते. त्यांच्या वादळी भूमिकांमुळे महाराष्ट्रात जातीयवादी दंगली झाल्या होत्या. दलित विरुद्ध हिंदू हा संघर्ष शिवसेनेमुळे महाराष्ट्रात निर्माण झाला होता. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्यास विरोध करतानाच बाळासाहेब ठाकरेंचा अनुसूचित जातींच्या आरक्षणास कटटर विरोध होता. त्यांच्या या भूमिकेमुळे दलित समाज बाळासाहेबावर नाखूष होता. त्यांच्या अशा भूमिकामुळेच दलित विचारवंत त्यांच्यावर वर्णव्यवस्था समर्थक, ब्राम्हणवादी, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराविरोधी होती असा त्यांच्या ठपका ठेवत असत. असे असले तरी त्यांनी मराठी माणसा संदर्भात ज्या भूमिका घेतल्या त्या सर्वाच्या फायद्याच्याच होत्या.
बाळासाहेबासारखा स्पष्टवक्ता, त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर ठामपणे कायम राहणे हा त्यांचा स्वभाव देशाच्या कोणत्याही राजकारण्यात आढळत नाही. रोखठोक बोलणारे व काहीही झाले तरी त्यावर कायम राहनारे बाळासाहेब देशात एकमेव नेते होते. ते महाराष्ट्रातील आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय नेते होते.
कोणत्याही राजकीय नेत्याला सत्तापदांचा कायम मोह असतो. सत्ता दिसू लागली की तो हपापतोच परंतु बाळासाहेबांना सत्ता मिळूनही ते कधी सत्तेत गेले नाहीत. ते कार्यकर्त्यांना मोठे करीत राहिले. त्यांनी सामान्य, बेरोजगार व चौकात चीडीमारी करणा-या सामान्य मराठी माणसांना त्यांनी नेते व मंत्री बनविले. बिनचेह-याच्या मराठी तरुणांना त्यांनी बळ दिल होत. बाळासाहेबांचं हे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होत. बाळासाहेबाच्या जाण्याने आता  "मराठी माणसा'चे काय होणार”?. हा एक मोठा प्रश्न काही लोकांच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे. शिवसेनेने मराठी माणसाला नेमके काय दिले किंवा मराठी राज्याचे काय भले केले?. यावर काहीजण वाद करतीलही हा राजकीय जमाखर्चा भाग आहे. शिवसेनेने मराठी माणसाला मुंबईत सातत्याने भावनिक आधार दिला, त्याला अस्तित्वाचे अदृश्‍य बळ पुरविले, हे कुणाला नाकारता येणार नाही. त्यांच्यामुळेच मुंबई महाराष्ट्रात टिकून आहे. अन्यथा मुंबई अन्य लोकांची झाली असती. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांच्यापर्यंत अन्य प्रदेशातील मुंबईत येणारे लोंढे अडवून ठेवण्याची ताकद नव्हती. बाळासाहेब नसते तर मुंबई ही तामिळ, मल्याळी, तेलगू व भैय्यांची झाली असती हे कोणी नाकारू शकतील का?. बाळासाहेब महाराष्ट्राचे ढाण्या वाघ होते. अशा मोठ्या ताकदीच्या नेत्यास सलाम करण्यावाचून राहवत नाही.
बाळासाहेबांना माझी ही भावपूर्ण श्रंध्दाजली.

                                                        बापू राऊत

No comments:

Post a Comment