Saturday, November 24, 2012

इंदू मिलसाठी रिडल्स सारख्या आंदोलनाची गरज



आंबेडकरी जनतेने बाबासाहेब आंबेडकराच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी चैत्यभूमीलगत असलेल्या  इंदू मिलच्या  जागेची  महाराष्ट्र व केंद्र सरकारकडे  मागणी करून बराच कालावधी झालेला आहे. या इंदू मिलच्या जागेसाठी प्रसंगी अनेक संघटना, पक्ष व व्यक्तींनी आंदोलनसुध्दा  केलेले आहेत. तरीही केंद्र व
राज्य सरकारकडून अद्याप स्मारकासाठी जागा मिळालेली नाही. केवळ सकारात्मक प्रतिसाद या नावाखाली आंबेडकरी जनतेची फसवणूक केल्या जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेहमी केवळ वरीष्ठासोबत चर्चा चालू आहे असी बतावणी करीत असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याशी चर्चा सुरु आहे असे सांगतात तर कधी ते महाराष्ट्रातून शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जातात. परंतु आजपर्यंत कोणताही निर्णय होताना दिसत नाही. केंद्र व राज्यात काग्रेसचीच सरकारे आहे. तरीही निर्णय होताना दिसत नाही. केवळ टोलवाटोलवीची  प्रक्रिया चालू आहे. यावरून सरकारच्या ओठात वेगळे व अंतर्मनात वेगळे आहे हे स्पष्ट आहे. ही जागा आंबेडकर स्मारकासाठी मिळू नये म्हणून रोज नवनवीन क्लुप्त्या व बहाणे बनविण्यात येत आहे. आता काहींनी बाळासाहेब ठाकरेच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी केली आहे. तर काही उद्योगपती राजकीय नेत्यांना हातासी धरून हाटेल व मालसेंटर बांधण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. एकूणच सरकार आंबेडकरी जनतेची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट जाणवते.
आंबेडकरी जनतेने इंदू मिलच्या जागेसाठी आता कंबर कसली पाहिजे. सर्व आंबेडकरी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व आंबेडकरी वर्तमानपत्रे  या सर्वानी एकत्र येऊन इंदू मिल कृती समिती बनवून रिडल्स सारखे मोठे आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे. सरकार व काग्रेस/राष्ट्रवादी पक्ष काही दलित संघटना व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना हातासी धरून वेगळे राजकारण खेळण्याची अधिक शक्यता असून इंदू मिलच्या जागेसाठी सरकार नवीन अडथळे निर्माण करू शकते. त्यामुळे आंबेडकरी जनतेने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकराच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सर्वानी आपसातील सर्व मतभेद विसरून इंदू मिलसाठी रिडल्स सारख्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र येण्याचा आंबेडकरी जनतेने लवकरच निर्णय घ्यावा.
                                                         बापू राऊत
                                                        ९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment