Monday, November 19, 2012

मदर बॉक्सर- मेरी कोम

एरवी काय किंमत असते तुमच्या संघर्षाला.? गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष मी केला तो या देशात अनेक जण करतात. मात्र नुसत्या संघर्षाला काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला. तुमच्या कर्तृत्वाला.!मुळात मारून, डोकी फोडून प्रश्न सुटत नाहीत, हे मला लंडन ऑलिंपिकनंतर कळून चुकलंय.! तुमच्याकडे पाहणार्‍या नजरा बदलण्याची शक्ती केवळ एकाच गोष्टीत असते - तुमचं यश. खणखणीत यश (Daily Lokmat19.11.12)
गोष्ट एका मेरी कोमची नाही.
माझ्या गोष्टीची सुरुवात मी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचा विचार करण्यापूर्वीच झाली होती.
ती गोष्ट आहे, माझे गुरू-ट्रेनर-मार्गदर्शक इबोमचा सिंग यांची.
१९८0च्या दशकातली ही गोष्ट.
आजही भारताच्या नकाशावर मणिपूर कुठे आहे हे फार कुणाला माहिती नसतं. त्या काळाची तर गोष्टच वेगळी होती. त्या काळी ‘मेनलॅण्ड इंडिया’वाल्यांच्या दृष्टीनं मणिपूरला काही किंमतच नव्हती.
पण इबोमचांच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं. चॅम्पियन होण्याचं. 
ते सैन्यात होते; पण त्या काळी देशातच क्रीडासंस्कृती नावाचा काही प्रकार नव्हता. इबोमचांच्या स्वप्नाला पहिली चूड लागली ती तिथेच. भारतीय सैन्यानं त्यांच्या बॉक्सिंग नावाच्या खेळाला आर्थिक पाठिंबा देणं नाकारलं. मग त्यांनी ठरवलं, आपण आपल्या हिमतीवर प्रयत्न करू. 
१९८६ साली जकार्तामध्ये होणार्‍या प्रेसिडेंट कपसाठी त्यांची निवड झाली होती. ते विमानतळावर जाऊन बसले होते. फ्लाईटमध्ये चढण्याची वाट पाहत होते; पण त्यांना ती फ्लाईट गाठताच आली नाही. ‘मेनलॅण्ड इंडिया’वाल्यांचं पॉलिटिक्स असं की, इबोमचा त्या स्पर्धेत भागच घेऊ शकले नाहीत, 
त्यादिवशी इबोमचांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. रडून घेतलं मनसोक्त आणि ठरवलं, ‘ज्या राज्यातल्या बॉक्सरच्या वाट्याला अशी अवहेलना येते, त्याच राज्याची ओळख एक दिवस बॉक्सिंग ठरेल.’ 
- ते त्यांनी खरं करून दाखवलं. 
आजवर त्यांनी ट्रेन केलेल्या ५0 बॉक्सर्सनी आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवली आहेत. इबोमचांना भारत सरकारनं ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. 
आणि त्यांच्या याच तपश्‍चर्येचं एक ढळढळीत उदाहरण म्हणजे मी. मेरी कोम.
त्यांनी ट्रेन केलं नसतं, माझ्या अंगात भिनवलं नसतं बॉक्सर होण्याचं स्वप्न, तर आज मेरी कोम, बॉक्सिंग आणि मणिपूर ही नावं देशात कुणालाच माहीत झाली नसती.!
मणिपूरच्या मेरी कोमला बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल नाही मिळवता आलं; पण निदान आज मणिपूरची एक ओळख म्हणून तर तिचं नाव घेतलं जातं, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.’
आमच्या मणिपूरमध्ये आजही तसं काय आहे, अंधार आणि दहशतीशिवाय?
आजही तुम्ही माझ्या गावात येऊन पाहा, भीतीनं पोटात गोळा येईल. मिट्ट अंधार आणि सैन्याचा खडा पहारा. थंडीत होणारी उपासमार. माझ्या २९ वर्षांच्या आयुष्यात तरी हे चित्र बदललेलं नाही.
माझं बालपण कसं गेलं हे सांगितलं तर ही गोष्ट तुम्हालाही तितकीच अविश्‍वसनीय वाटेल. 
मणिपूरमधल्या चुराचंदपूर जिल्ह्यातल्या कांगथेई गावातला माझा जन्म. म्हणजे मोईरांगपासून अगदी जवळ. मोईरांग हे भारत-म्यानमार हद्दीवरचं शेवटचं गाव. त्या मार्गेच मणिपूरमध्ये कोकेन येतं. आमचा सगळा जिल्हाच नशेच्या वाळवीनं पोखरलेला आहे. आजही हे चित्र बदललेलं नाही. जगणं अत्यंत अवघड. त्यात माझ्या आई-वडिलांची स्वत:ची जमीन नव्हती. ते कुणा-कुणाच्या शेतीवर मजुरी करायला जायचे. आमच्याकडे झूम शेतीची पद्धत. आज इथे, उद्या तिथे काम. पहाडी भागात शेती कसणंही अवघड. पैसेही फार मिळायचे नाहीत. 
मी घरात सगळ्यात मोठी. आई-वडील कामावर गेले की धाकटी बहीण आणि भावाला सांभाळायची जबाबदारी माझीच. मी भयंकर चिडकी होते. अजूनही तशीच आहे. खूप तापट. 
आपली मुलं अडाणी राहू नये म्हणून आई-वडिलांनी आम्हाला तिघांना मोईरांगच्या ‘लोकताक ख्रिश्‍चन मिशन स्कूल’मध्ये शिकायला ठेवलं, पण तिथे आठवीपर्यंतच शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी मी इंफाळला आले. तिथल्या आदिमजाती स्कूलमध्ये प्रवेश घेतला. इंफाळमध्ये खेळाचं वातावरण तसं बरं होतं. मलाही पुस्तकात काही फार रस नव्हताच. मी चौकशी केली, तर मला बॉक्सिंग क्लबविषयी कळलं. त्याचवेळी पाचव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मणिपूरच्या बॉक्सर्सनी चांगली कामगिरी केली होती. डिंखो सिंग हे नाव तर सगळ्यांना माहिती झालं होतं. इंफाळमध्ये एकाएकी खेळाचं वातावरण निर्माण झालं.
मला खेळायची आवड होतीच. वाटलं, आपणही असंच काहीतरी करावं. पुस्तकं गुंडाळून ठेवून दिली आणि मी सरळ स्थानिक क्लबला जाऊन भेटले. त्यांना सांगितलं, ‘मला बॉक्सिंग खेळायचंय.’
तिथे खुमान लम्पक भेटले. त्यांनी काही दिवस मला प्रशिक्षण दिलं आणि मग माझी आणि इबोमचा सिंगांची भेट झाली. त्यांच्याकडे माझं प्रशिक्षण सुरू झालं.
मला कुठून एवढा राग यायचा देव जाणे. तो सगळा राग-संताप बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवायला इबोमचांनी मला शिकवलं. माझ्यातली प्रगती पाहून मणिपूर बॉक्सिंग असोसिएशननं मला खूप मदत केली. स्पर्धा सुरू झाल्या. मणिपूर सरकारनं मला २00५ मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टरची नोकरी दिली. माझा रोजीरोटीचाही प्रश्न सुटला आणि मी सगळं लक्ष खेळावर एकाग्र करायला सुरुवात केली.
हे सगळं होतंच, पण घराची जबाबदारीही होती. आईवडील- भावा-बहिणीची शिक्षणं सगळं माझ्या पगारावर चालत होतं. पगार पुरायचाच नाही. स्वत:चे बॉक्सिंग ग्लोव्हज घ्यायलासुद्धा पैसे नसायचे. आम्हाला खेळताना आहारभत्ता मिळायचा, तो वाचवून मी ग्लोव्हज घेत असे.
त्याचदरम्यान मी प्रेमात पडले. दिल्लीत मला ओनलर भेटला. आम्ही लग्न करायचं ठरवलं; पण त्या लग्नाला माझ्या आई-वडिलांचा प्रखर विरोध होता. ओनलर माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा होता, मी फक्त २३ वर्षांची होते. पण त्या सगळ्यांच्या विरोधात जात मी ओनलरशी लग्न केलं. ते लग्न हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट.
ओनलर भेटला नसता तर एका विशिष्ट टप्प्यानंतर मी बॉक्सिंग सोडून दिलं असतं. मूल झाल्यावर पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये पाय ठेवणं सोपं नसतं. आमच्या खेळात नुसत्या तोंडानं बाता मारण्यात अर्थ नसतो. शारीरिक क्षमता फार महत्त्वाची असते. ती असेल तर तुम्ही मेंटली टफ राहता. तुमच्या पंचमध्ये दम नसेल तर तुम्ही रिंगमध्ये काय परफॉर्म करणार.?
त्यात दोन मुलांची आई झाल्यावर तर शरीर झिजतंच. ‘आपण कधी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरू शकू’ हा विचारच मी सोडून दिला होता. त्यावेळी ओनलर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ‘घर आणि मुलं मी सांभाळतो’, असं वचन त्यानं मला दिलं आणि आग्रहानं पुन्हा माझं ट्रेनिंग सुरू केलं. ते सोपं नव्हतं.
तेव्हाही आर्थिक चणचण होतीच. माझ्या उत्पन्नाचे तीन हिस्से मला करावे लागत होते. पहिला हिस्सा माझे आई-वडील-भावा-बहिणीचा, दुसरा माझ्या घरचा, ट्रेनिंगचा आणि तिसरा ओनलरच्या कुटुंबाचा. 
माझ्यातली बॉक्सर किती का रागीट असेना, आई तर हळवीच होती. ती इमोशनलच व्हायची. कस लागत होता माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा. पण त्याकाळी मीच स्वत:ला पुन:पुन्हा सांगत होते, ‘डोण्ट पॅनिक, डू नॉट गिव्ह अप. यू आर नॉट ओन्ली मदर, नॉट अ बॉक्सर. यू आर मदर बॉक्सर.!’
पण तरी पाय डगमगायचेच. मुलांचं आजारपण, पैसा, ट्रेनिंग या सार्‍यात जिवाचा चोळामोळा व्हायचा. 
एक मात्र खरं, या काळात, गॉड वॉज विथ मी. ऑलवेज !
एक बायबल सोडलं तर आयुष्यात दुसरं एकही पुस्तक मी हातात धरलेलं नाही. बायबलनंच मला शिकवलं की, जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते, जी आपण मेहनतीनं करतो, तिच्यावरचा आणि देवावरचा विश्‍वास ढळू द्यायचा नाही.
मी तेच केलं. शिकत राहिले. ट्रेनिंग सुरूच ठेवलं. एका मागोमाग एक स्पर्धा जिंकत गेले. या काळात वाटेत किती अडचणी आल्या, मणिपुरी म्हणून जगण्याची ओळख किती अवघड आहे याचेही अनुभव आले; पण त्याहूनही मोठा आनंद दिला खेळानं आणि पाठिंबा दिला काही चांगल्या माणसांनी. एक-दोनदा नाही पाच वेळा बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन झाले. 
२00१ मध्ये पहिल्यांदा मला बक्षीस म्हणून नऊ लाख रुपये मिळाले होते. मी स्वत:साठी एक टू व्हिलर घेतली आणि आई-वडिलांसाठी जमिनीचा एक तुकडा. तो दिवस आमच्या घरासाठी किती मोठा होता याची कल्पनाच कुणी करू नाही शकणार. पिढय़ान्पिढय़ा दुसर्‍याच्या जमिनीवर राबणार्‍या आमच्या घरात पहिल्यांदा कुणाला तरी आपली हक्काची जमीन मिळाली होती. माझी आई तो जमिनीचा कागद छातीशी कवटाळून ढसढसा रडली होती.
अर्थात, स्पर्धा जिंकणं म्हणजे हमखास सरकारी नोकरी आणि महिन्याला घरी येणारा ठरावीक पगार एवढंच मलाही माहिती होतं. तसंही माझं सगळं कुटुंबच माझ्यावर अवलंबून होतं. हळूहळू जग कळायला लागलं. मणिपूरमध्ये जन्माला आल्यापासून आम्ही हेच शिकतो. ‘मॅनेज कर लेना.’ 
जे आहे ते, तसंच, ‘चलता है’ म्हणत स्वीकारायचं आणि जगायचं मन मारून.!
बॉक्सिंगने माझ्यातली ही ‘चलता है’ वृत्ती मार खाऊन खाऊन बाहेर काढली. आता कुणी ‘चलता है’ असं म्हटलं की मला वाटतं, ‘याच्या नाकावर एक सॉलिड पंच मारावा.!’
पण कुणाकुणाला मारणार ?
मुळात मारून, डोकी फोडून प्रश्न सुटत नाहीत, हे मला लंडन ऑलिंपिकनंतर कळून चुकलंय.! तुमच्याकडे पाहणार्‍या नजरा बदलण्याची शक्ती केवळ एकाच गोष्टीत असते - 
तुमचं यश. खणखणीत यश ! 
एरवी काय किंमत असते तुमच्या संघर्षाला.?
गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष मी केला तो या देशात अनेक जण करतात. मात्र नुसत्या संघर्षाला काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला. तुमच्या कर्तृत्वाला.!
लंडन ऑलिंपिकहून परत आल्यापासून मी तेच अनुभवते आहे.
इबोमचा नेहमी सांगायचे तेच खरं होताना मला दिसतं आहे.
आमच्यावर अन्याय होतो आहे, आम्हाला न्याय द्या असं कितीही टाहो फोडून सांगितलं तरी लोक तुम्हाला बरोबरीनं वागवत नाहीत. तुमचा सन्मान करत नाहीत. 
तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस ठरता, तेव्हाच लोक तुमचा आदर करतात. 
आज मणिपूरच्या मेरी कोमला ‘मेनलॅण्ड इंडिया’वाले असेच सलाम ठोकू लागले आहेत.
मेरी तीच आहे, जी पूर्वी होती.
ती बदलली नाही, 
बदलल्या आहेत तिच्याकडे पाहण्याच्या नजरा. 
त्या नजरेत कौतुक आहे. प्रेम आहे. आदर आहे. त्याचबरोबर पैसा आणि प्रसिद्धी आहे. तमाम चॅनलवाले, बातम्यांवाले माझ्या मागे फिरताहेत. एरवी त्यांना मणिपूर आणि मेरी कोम कधी दिसले होते?
पण आज ते दिसतात.
का.?
तर ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा महिला बॉक्सिंगचा समावेश झाला आणि त्यात मी ब्रॉन्झ मेडल जिंकलं.! 
आम्ही पोडिअमवर उभे होतो. सुवर्णपदकविजेत्या ब्रिटनचं राष्ट्रगीत वाजत होतं आणि मी रडत होते. मला सुवर्ण जिंकता आलं नाही. नाहीतर त्यावेळी भारतीय राष्ट्रगीताची धून वाजली असती. एका मणिपुरी मुलीच्या प्रयत्नांमुळे भारताचं राष्ट्रगीत जगानं ऐकणं म्हणजे किती मोठी गोष्ट झाली असती हे केवळ मणिपुरीच समजू शकतो.!
दुर्दैवानं ते झालं नाही. 
अर्थात मी हरले नाही. अजूनही प्रयत्न सुरूच आहे. 

No comments:

Post a Comment