Saturday, December 10, 2022

गुजरात व हिमाचल विधानसभा - २०२२ निकालाचा अन्वयार्थ

गुजरात, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका व पोटनिवडणुकांचे निकाल घोषित झाले. गुजरातमध्ये प्रधानमंत्री मोदीनी राज्यात आपला वरचष्मा कायम ठेवला. तर कॉंग्रेसने हिमाचल हा एक गढ सर केला. यात सर्वात अधिक फायदा झाला असेल तर तो केजरीवाल यांचा. आम आदमी पक्षाने दिल्ली मध्ये भाजपावर मात करीत एमसीडी वर कब्जा मिळवून आपची सत्ता आणली. तर गुजरात मध्ये मिळालेल्या यशातून आप पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा या राज्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल संमिश्र असून कोणत्याही राजकीय पक्षाने व नेत्यांनी  हुरळून जाण्यासारखी  परिस्थिती नाही हे निकालावरून स्पष्ट दिसून येते. मोदी हे सर्वशक्तिमान नाहीत, मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र लढला नाही तर नरेंद्र मोदींना हरविणे कठीण आहे. हे या निकालावरून अधोरेलीखीत झाले आहे.  

गुजरात विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने १५६ जागेवर विजय मिळविला असून त्यांना  एकूण मिळालेल्या मताची टक्केवारी ५६.२ एवढी आहे. हे प्रमाण २०१७ (४९.१ टक्के) च्या तुलनेत ७.१ टक्के अधिक असून त्यात ५७ अतिरिक्त जागांची भर पडली आहे.  प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाला २०१७ च्या तुलनेत तब्बल ६० जागांची घट होत केवळ १७ जागांवर विजय प्राप्त करता आला. एवढेच नाही तर मताच्या टक्केवारीत १४.१ एवढी घसरण झाली.  कॉंग्रेसच्या या पराभवात आम आदमी पक्षाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. गुजरातमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ०.१ टक्के मते घेणारा आम आदमी पक्ष २०२२ च्या निवडणुकात मात्र त्यांचे ५ उमेदवार जिंकून येत त्यांच्या मतामध्ये १२.९२ टक्के मताची भर पडली. हि आम आदमी पक्षासाठी उत्साहवर्धक बाब आहे.  याच गुजरातने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा प्राप्त करून दिल्याची इतिहासात नोंद झाली. राजकारणात विचारधारा फार महत्वाची असते. परंतु केजरीवाल यांच्या भूमिकेवरून या पक्षावर बिना विचारधारेचा पक्ष असा आरोप केल्या जातो. बराच गाजावाजा झालेल्या बहुजन समाज पक्षाला केवळ ०.५ टक्के तर ओविसीच्या एमआयएम ला केवळ ०.२९ टक्के मते मिळाली असून त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 

दुसरे राज्य, हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात होते. या राज्यात कॉंग्रेस पक्षाने सरकार बनविण्यापुरता विजय प्राप्त केला असून त्यांनी ४३.९ टक्के मतासह विधानसभेच्या ४० जागा जिंकल्या असून भारतीय जनता पक्षाला २५ जागा मिळून ४३ टक्के मते मिळाली. २०१७ च्या तुलनेत हि टक्केवारी ५.८ टक्क्यांनी कमी होत भाजपाचा १९ जागांवर पराजय झाला. तर कॉंग्रेसला २.२ टक्के मताचा फायदा होत १९ जागा अधिक मिळाल्या. हिमाचल प्रदेशच्या जनतेने दिलेला हा कौल त्यांचा परंपरागत दृष्टीकोन असल्याचे मानले जाते. कारण या राज्यात नेहमीच दर पाच वर्षात सरकार बदलले जाते. हिमाचल प्रदेशात सुध्दा बहुजन समाज पक्षाची कामगिरी शून्यावर असून त्यांना केवळ ०.३५ टक्के मते मिळाली. या पक्षाची अशीच वाटचाल सुरु राहली तर २०२४ नंतर पक्षाची राष्ट्रीय पक्ष असलेली मान्यता टिकणे अवघड होईल.  असे झाल्यास, कांशीराम यांनी जे कमावले, ते मायावतीनी गमावले असे म्हणण्याची वेळ येईल. 

काही  राज्यात रिक्त झालेल्या जागेवरील  निवडणुकानुसार मैनपुरी लोकसभा पोट निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव २ लाख मताच्या अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. हि जागा  मुलायमसिंग यादव यांच्या निधनाने रिक्त झाली होती. खतौली मतदारसंघात  जयंती चौधरी यांचा लोकदल, रामपूर येथे भाजपा, बिहार मधील कुऱ्हानी विधानसभा मतदार संघात भाजपाने राजद कडून जागा हिसकावून घेतली.  मायावती व अखिलेश सिंग यादव यांची लोकसभा निवडणुकांमध्ये युती असतानाही भाजपाचे बहुसंख्य खासदार निवडून आले. त्यामुळे हा नितीशकुमार व तेजस्वी यादवसाठी एक इशाराच आहे.  तर छत्तीसगढ मधील भानुप्रतापपूर आणि राजस्थान येथील सरदारशहर येथे कॉंग्रेसी उमेदवार विजयी झाले असून ओडिशा येथे बिजू जनता दलाला विजय प्राप्त झाला.

एकूणच २०२२ वर्षा अखेरीस गुजरात व  हिमाचल प्रदेश या दोन राज्यासकट इतर ठिकाणाहून आलेल्या निकालानुसार हे निकाल संमिश्र असेच आहेत.  गुजरात मध्ये भाजपाच्या ऐतिहासिक विजयात प्रधानमंत्री मोदी यांचा करिष्मा हा गुजराती माणूस देशाचे नेतृत्व करतो ते तसेच टिकले पाहिजे या भावनेचा परिपाक दिसतो. भाजपाचे अनेक दिग्गज नेते, मंत्री,  मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा ताफा  तसेच  मोदी आणि अमित शहा यांच्या झुंझार प्रचाराने  विजयश्री खेचून आणली. गुजरात विकास हे या विजयाचे कारण असावे असे नसून हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण, हिंदुत्व -हिंदू राष्ट्र, लव-जीहाद,  बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची मुक्तता याचीही झालर या विजयात असल्याचे दिसते. परंतु याच मुद्यांचा करिष्मा हिमाचल मधील निवडणुकात दिसून येत नाही. प्रधानमंत्री मोदी सकट भाजपाच्या बड्या नेत्यांनी येथेही सभा घेतल्या परंतु त्या निष्प्रभावी ठरल्या. याचा अर्थ इतर राज्यात मोदी प्रभावीच ठरतील असे नाही. प्रियांका गांधी यांच्या हिमाचल मध्ये अनेक प्रचार सभा झाल्या, तशा सभा प्रियांका सोबतच सोनिया व राहुल  गांधीनी गुजरात मध्ये घेतल्या असत्या तर निकालात एकतर्फीपणा दिसला नसता. गुजरात राज्य हे कॉंग्रेससाठी बिना चेहऱ्याचे राज्य होते. केजरीवाल यांची आश्वासने भाजपा मतदारावर प्रभाव पाडू शकली नसली तरी कॉंग्रेसच्या मतदारांना आम आदमी पक्षाने पळविले हे स्पष्ट दिसून येते.

या विधानसभा निवडणुकांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकासाठी एक स्पष्ट अन्वयार्थ आहे. आणि तो म्हणजे विरोधी पक्ष हे जितके जास्त विभाजित होत निवडणुका लढवतील  तितकाच अधिक फायदा नरेंद्र मोदी यांचा होईल. प्रधानमंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतील. मोदीनी आपल्या रणनीती नुसार महागाई, बेरोजगारी, शेतकरी व मजदूर यांच्या  समस्यांवर उपाय व अस्त्र शोधून ठेवले असून योग्य क्षणी त्यांचा वापर करतील. सोबतच त्यांनी विविध जाती संघटनाच्या लोकांना जोडण्याचे काम हाती घेतले आहे. याचाही त्यांना निश्चितच फायदा होईल.

एक विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष सर्व राज्यात अस्तित्वात आहे. परंतु प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसला आपला शत्रू नंबर एक समजतात. वेळ आल्यास हे पक्ष भाजपाशी हातमिळवणी करू शकतात. या पक्षासाठी धर्मनिरपेक्षता, तत्व विचार व लोककल्याण हे महत्वाचे नसून खुर्ची महत्वाची असते. त्यामुळेच विविध राज्यांची प्रादेशिक पक्ष व त्यांच्या प्रधानमंत्री बनण्याच्या  अपेक्षा, मुस्लिमबहुल क्षेत्रात ओवेसीचे उमेदवार उभे असणे, बसपाच्या मायावती यांचे तिरकट धोरण व सपाच्या अखिलेश सिंग यांची एकल वृत्ती व नव्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून जन्मास आलेला आप पार्टी, हे सारे पक्ष एकत्रित होवून  एक सशक्त  विरोधी आघाडी बनवतील हे एक दिवास्वप्नच आहे. आजची स्थिती अशीच कायम राहिली तर, विरोधी पक्षच मोदींना स्वत:हून  प्रधानमंत्रीपदाच्या खुर्चीवर स्वत:हून नेऊन बसवतील यात यतकिंचीतही शंका नाही. हे एका सत्य अभिवचना सारखेच आहे.

बापू राऊत 
लेखक व विश्लेषक

1 comment:

  1. फारच छान विश्लेषण। अभिनंदन लेखकाचे ।

    ReplyDelete