Saturday, December 24, 2022

हिंदूंचा बौध्द धर्मप्रवेश व त्याची कारणे

बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय समाजाला उद्देशून म्हणाले होते कि, धर्म हा तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू धर्मीय लोकाजवळ धार्मिक व सामाजिक हक्काची मागणी करता. परंतु तुम्हास ते अधिकार देण्यास तयार नाहीत. याचा अर्थ धर्माने तुम्ही हिंदू नाहीत. ज्या  हिंदू धर्मात तुम्ही आहात त्याच धर्माचे लोक तुमचा द्वेष करतात. तुम्हाला शत्रू मानतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नवा मार्ग चोखाळला पाहिजे. निष्कारणपणे हिंदू लोकांचे चरण धरून व विनविण्या करून तुम्ही तुमच्या माणुसकीला कमीपणा आणू नका. जे धर्म तुमच्या सामाजिक सुधारणा व उन्नतीकडे लक्ष देतात त्या धर्मासबंधी विचार करा. ज्या धर्मात तुम्ही आहात, त्या धर्मात तुम्हीच काय, पण  इतरांनी देखील राहण्यासारखा तो धर्म नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या ६६ वर्षानंतरही हिंदू धर्म, तिची संस्कृती व धर्ममार्तंड लोकांच्या स्वभावगुणधर्मात आजही बदल झालेला दिसून येत नाही. रोज कोठे ना कोठे काळीज पिळवटून टाकनाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाजात अस्वस्थेतून हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याचे प्रमाण वाढले असून ज्यांना मानवतेची कास आहे अशा अनेक सुपरिचित व्यक्तींनी बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दिसते. 

 

धर्मांतराच्या घटना :

भारतातील पहिले मोठे धर्मांतर हे नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाले. या धर्मांतराचे मुख्य प्रवर्तक असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचेसोबत ५ लाख लोकांनी धर्मांतर केले होते. हिंदू धर्मात मिळालेल्या वाईट अनुभवामुळेमी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा  करीत जन्म कोठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते परंतु मी कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहेअसे त्यांनी म्हटले होते.  आज संपूर्ण देशात बऱ्याच ठिकाणी बौध्द धर्मात धर्मांतरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे धर्मांतरन लपवाछपवी न करता शासकीय यंत्रणाकडे नोंद करून केल्या जात आहे. यात आमिष, पैसा व बळजबळी याचा किंचितही लवलेश नसून या धर्मांतरात उत्स्फूर्तता व मानसिक गुलामीतून मुक्त झाल्याचा आनंद वाहताना दिसतो. बौध्द धर्म हा भारताच्या भूमीत जन्मलेला मुख्य धर्म असून भारतातील ८० टक्के भारतीय जनतेचे पूर्वज  हे पूर्वी बौध्द धर्मीय होते.

  

माजी खासदार उदित राज यांनी २००१ मध्ये दिल्ली येथे दहा हजार लोकासोबत बौध्दधर्म स्वीकारला होता. गुजरातमधील  उना येथे ३०० हिंदूनी (वर्ष २०१६) गाय रक्षक तुकडीने मारल्याच्या निषेधार्थ बौध्द धर्माची दिक्षा घेतली. सहारनपुर (वर्ष २०१७) येथे १८० हिंदुनी तर २०१८ ला उत्तर प्रदेशातील बहरीचच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी कानपूर येथे दहा हजार लोकांसोबत हिंदूधर्म सोडत बौध्दधर्म स्वीकारला. विशेषत: २०२१-२२ मध्ये धर्मांतराचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुनी बौध्द धर्मदीक्षा घेतली. बांरा येथे २५० लोकांनी, भुलोन येथे एका कुटुंबातील १२ सदस्यांनी तर भरतपूर जिल्ह्यातील सामुहिक विवाह मेळ्यात ११ नवविवाहित जोडप्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. या सर्वांनी आपापल्या घरातील देवी-देवतांच्या मुर्त्या व भिंतीचित्रे काढून नदी पात्रात विसर्जित केल्या. तर हिंदू धर्मात अपमान व उपहासा व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही असे सांगून १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्नाटकातील शोरापूर येथे ४५० हिंदुनी बौध्दधर्म प्रवेश केला.  उत्तराखंड येथे उधमपूर जिल्ह्यातील काशीपुर येथे ३०० हिंदुनी तर लखनौ, येथे भन्ते सुमितरत्न यांचे हस्ते हजारो हिंदुनी २२ प्रतिज्ञाचे उच्चारण करीत बौध्द धम्म दीक्षा घेतली. गुजरात राज्यातील बालासिनोर येथे  (वर्ष २०२२)  ४५ हिंदूनी, तर अहमदाबाद, दानालीपाडा, कलोल आणि सुरेंद्रनगर येथे ३५१ व्यक्तींनी बौध्दधर्म स्वीकारला. यात एमबीए झालेले  विद्यार्थी, अधिकारी व शिक्षकांचा समावेश आहे. दीक्षाभूमी नागपूर येथे २०० हिंदुनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यात नवसृजन ट्रस्टच्या प्रमुख मंजुळा प्रदीप यांचेसोबत ९० गुजराती हिंदुचा समावेश आहे. तर औरंगाबाद येथे (१४.१०.२०२२) रोजी श्रावण गायकवाड, भारत पाटणकर (सांगली), अच्युत भोईटे (मुंबई), लक्षण घुमरे (बुलठाना) यांचेसह ४०७ हिंदुनी दीक्षा घेतली. महाराष्ट्रात यापूर्वी ओबीसी सत्यशोधक परिषदेचे हनुमंत उपरे यांचे उपरांत ओबीसी समाजाच्या ६५०० हिंदुनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. तर व्यक्तिगतरीत्या रूपा कुलकर्णी, कबीर बेदी, सुरेश भट, पूनम जोशी यांनी तर चर्चित चित्रपट अभिनेते गगन मलिक यांनी २०१४ ला श्रीलंका येथे बौध्द धम्म दीक्षा घेतली.  

 

छत्तीसगढ़ मधील राजनांदगाव येथे महापौराच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी बौध्द धर्मप्रवेश केला. मात्र या सगळ्यात अधिक गाजावाजा झाला तो आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल यांचा. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी १०००० हजारपेक्षा अधिक लोकांसोबत झालेल्या  बुध्द धर्म दीक्षा समारोहात त्यांच्याकडून   नेहमीप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणण्यात आल्या. त्यावर संघ-भाजपाच्या लोकांनी हंगामा करीत गौतम पाल यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री  केजरीवाल यास भाग पाडले. 

 

धर्मांतराची कारणे 

आम्हाला तुमच्यासारखेच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहेत. हिंदू म्हणून तुम्ही जे धार्मिकसामाजिक सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभागतातेच स्वातंत्र्य हिंदू म्हणून आम्हास हवे आहे. अशी त्यांची मागणी आहे. परंतु  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंतसुध्दा देशात एका हिंदूकडून दुसऱ्या हिंदुवर अत्याचार चालूच असल्याच्या घटना घडत आहेत.  अत्याचारांच्या या घटनांमुळे लोकामध्ये अस्वस्थता वाढून धर्मांतराच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यापैकी काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

कर्नाटकातील शोरापुर (अमलिहला गाव) येथील स्थानिक मंदिरात दलितांना प्रवेश नाकारण्यात आला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना मंदिर प्रवेश करावा लागला. कोलार जिल्ह्यात मंदिरातील देवीच्या खांबाला हात लावल्यामुळे एका व्यक्तीस  ६०००० हजार रुपये जुर्माना लावण्यात आला. याच तालुक्यातील किरधल्ली गावात दलितांच्या परिवारात एखाद्याचा  मृत्यू झाल्यास गावातील सवर्ण आपली सर्व हॉटेल्स व दुकाने बंद करतात. परंतु सवर्ण व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ते बंद करण्यात येत नाही. याचे कारण म्हणजे अंत्यसंस्कार कार्यासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या दलितांचा कोणत्याही कारणाने दुकानात येवून स्पर्श होवू नये यासाठी हॉटेल्स व  दुकाने बंद ठेवली जातात. चामराजनगर जिल्ह्यातील हेगगोतरा गावात १८ नोव्हेंबर २०२२ ला लग्न कार्यासाठी बाहेरून आलेल्या एका दलित महिलेने पाणी पिण्यासाठी पाण्याच्या  टाकीला हात लावला म्हणून शिव्या देत टाकीला गोमुत्राने साफ करण्यात आले. राजस्थान मधील जोधपुर जिल्ह्यातील सुरसागर गावात अशीच घटना घडून मारहाणी मध्ये एका पिडीताचा मृत्यू झाला. जितेंद्रपाल मेघवाल या दलित युवकाची सोशल मिडीयात  मिशावर पीळ देणारा फोटो टाकल्यामुळे हत्या करण्यात आली. जालोर येथील शाळेत इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याचा मटक्यातील पाणी पिल्यामुळे शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. एका आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला दलित असल्यामुळे घोडीवर चढून लग्नाची वरात काढण्यास विरोध करण्यात आला. यावरून सामान्य लोकांचे कसे हाल करण्यात येत असतील याची कल्पना येते. मध्य प्रदेशातील भिंड शहरातील दाबोहा मध्ये दिलीप शर्मा नामक व्यक्तीसोबत विवाद केल्यामुळे पंचायतीकडून दीड लाख रुपये देण्याचे सांगून दलित असलेल्या दोन भावांचे डोके भादरण्यात येवून गावात फिरविण्यात आले

 

दलित स्त्रिया व तरुणी हा तर अत्याचारास हमखास बळी पडणारा वर्ग बनला आहे. बरेली जिल्ह्यात बलात्कारित पिडीताच्या आईवडिलांनी समझोत्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्याच जिल्ह्यात दहावीत शिकणार्या उच्च जातीच्या मुलीसोबत बोलल्यामुळे दलित मुलाच्या गळ्यात चपलांचा हार टाकून गावात फिरविण्यात आले. द प्रिंट मधील बातमीनुसार, १४ वर्षीय मायेच्या शाळेमध्ये सवर्ण समाजाचे विद्यार्थी ती दलित असल्यामुळे जवळ बसत नव्हते. तू दूर रहा, तू खालच्या जातीची आहे असे तीला टोमणे मारले गेले.

 

मध्यप्रदेशात चाईल्ड राईट ऑब्जवेटरी व मध्यप्रदेश दलित अभियान संघ द्वारा दहा जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार ९२ टक्के दलित मुलामुलीना शाळेत पाणी पिऊ दिल्या जात नाही. ८० टक्के गावात मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तर ५० टक्के गावात मुलामुलींचे चांगले नाव ठेवल्यास कुटुंबास मारहाण करण्यात येते. बुंदेलखंडमध्ये त्यांना ५२ प्रकारच्या जातीभेदाचे प्रकार आढळले. तामिळनाडू मध्ये दलित सरपंचाला झेंडा फडकावू दिल्या गेला नाही. तामिळनाडू अस्पृश्यता निवारण फ्रंटने केलेल्या सर्वेनुसार ८६ पंचायती पैकी २० दलित पंचायती प्रमुखांना खुर्ची उपलब्ध्द करून दिल्या गेली नव्हती तर  फलकावरील पंचायती प्रमुखांच्या यादीमध्ये दलित पंचायती प्रमुखांचे नाव टाकले जात नाही. काही शाळेमध्ये केवळ दलित विद्यार्थ्यांना मुत्रीघर व टाँयलेट साफ करायला लावल्या जाते. हा शिक्षकात असलेला जातीभेदाचा मोठा नमुना आहे. 

 

तथाकथित हिंदू यावर कधी विचार करणार

खरे तर एक हिंदू दुसऱ्या हिंदुवर एवढ्या क्रूरपणे  अत्याचार का करतात? यावर विचार करून ते थांबविण्याची  गरज आहे. जे अत्याचार करतात त्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना न्यायालयामार्फत जबर शिक्षा होण्यासाठी दबाव टाकला पाहिजे. अत्याचार करणार्यांच्या गळ्यात फुलमाळा टाकल्याने देशाचे नुकसान होईल याचे भान काही संघटनांनी  ठेवले पाहिजे. आपले अधिकार मागणाऱ्यांचे डोके फोडण्यासाठी दगड उचलण्याएवढी असहिष्णुता काही जातीमध्ये कशी जिवंत राहिली यावर मंथन होणे आवश्यक आहे.

 

धर्मपरंपरेच्या माध्यमातून अपमानित करणाऱ्या व डोकी फोडणाऱ्यांच्या संस्कृतीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धर्मांतर हाच होय, हे आता लोकांना समजायला लागले आहे. अशा पीडितांना चिकित्सेतून कोणता धर्म चांगला व वाईट याचे मूल्यमापन करून नवीन धर्म घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. एखाद्याला आताच्या धर्मात अपमानजन्य स्थितीमध्ये जगायचे नसल्यास त्याने दुसऱ्या  धर्मात प्रवेश केल्यास त्यात इतरांनी डोके खुपसण्याची गरजच काय.  अशांना, तुम्ही आमचे मालक बनावे हे तुमच्या हिताचे असेल परंतु आम्ही तुमचे गुलाम बनावे हे आमच्या हिताचे नाही हे ठामपणे सांगण्याची गरज आहे.

 

लेखक: बापू राऊत

 

No comments:

Post a Comment