Tuesday, May 16, 2023

कर्नाटक निवडणुक निकालाचा अन्वयार्थ

कर्नाटक सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२३ चे बहुप्रतीक्षित निकाल लागले. या निकालात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १३५ जागा आणि ४२.९ टक्के मतासह विजेता म्हणून उदयास आली आहे. कर्नाटकातील मागील तीन विधानसभेचे (तक्ता क्र.१ व २) निकाल बघता २०२३ चे निकाल   हे कॉंग्रेससाठी मोठे उल्लेखनीय यश आहे. कारण त्यांना १९८९ च्या निवडणुकीपासून इतका मोठा जनादेश प्राप्त झाला नव्हता. १९८९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला १७८ जागासह एकूण ४३.७९ टक्के मते मिळाली होती.  २०१८ च्या निवडणुकीत मिळालेल्या ८० जागांच्या तुलनेत अधिक ५५ जागा मिळवून कॉंग्रेस विजयी झाली आहे. कर्नाटक विधानसभेचा निकाल हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्काच आहे. कारण भाजपा विजयाच्या खात्रीमध्ये असताना त्यांना मागील २०१८ च्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या १०४  जागाच्या तुलनेत ३८ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो जनता दल (धर्मनिरपेक्ष)  पक्षाला. या पक्षाने मागील २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ५० टक्के जागा गमावल्या. मागील निवडणुकीत ३७ जागा मिळविलेल्या जनता दलाला मात्र २०२३ मध्ये केवळ १९ जागांवर विजय मिळविता आला.  

निवडणुकीतील एकूण प्रचारावरून कर्नाटक विधानसभा निवडणूक हि मोठी अटीतटीची होईल असे वाटले होते. परंतु मतदारांनी एकतर्फीच कौल दिल्याचे मतदानावरून दिसून येते. निवडणूक प्रचारात मोठमोठे दिग्गज उतरले होते. कॉंग्रेसची धुरा मुख्यत: कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, कॉंग्रेस राज्य अध्यक्ष डी.के.शिवकुमार व सीतारामय्या यांचेकडे होती तर भाजपाची मदार मुख्यत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे होती. या निवडणुकीमध्ये राज्यात भाजपाकडे सशक्त नेता नसल्याची उणीव दिसली. त्याचाही निवडणूक निकालावर परिणाम झाला असू शकतो, कारण राज्यातील जनता स्वत:च्या राज्यात सशक्त नेता शोधत असते.

भारतीय जनता पक्षाने २०१८ च्या तुलनेत २०२३ च्या निवडणुकीत ३६ टक्के मताची टक्केवारी कायम ठेवण्यात यश मिळविले. तर कॉंग्रेस पक्षाने अतिरिक्त ४.८ टक्के मते मिळवून विधानसभेत बहुमत प्राप्त केले. परंतु देवगौडा कुटुंबासाठी हि निवडणूक दु:खद राहिली, कारण त्याने मागील मतापेक्षा ५ टक्के मते गमावली. यावरून जनता दलाची मते कॉंग्रेसला तर मिळाली असेलच परंतु भारतीय जनता पक्षाला मागील पाच वर्षात जो नवीन युवा मतदार निर्माण झाला त्याने मात्र झिडकारल्याचे स्पष्ट दिसते. किंवा जुन्या मतदारांचा भ्रमनिराश  होवून ते भाजपापासून दूर झाले असावेत.

 या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी बऱ्यापैकी ५.२ टक्के मते मिळवून २ जागा प्राप्त केल्या. इतर राष्ट्रीय पक्षांपैकी बहुजन समाज पक्षाला २०१८ च्या विधानसभेत मिळविलेली १ जागा या निवडणुकीत गमवावी लागली. तर २००८ च्या निवडणुकीपासून राज्यात बसपा २.७ टक्क्यापासून ०.३ टक्के पर्यंत घसरली. कर्नाटकातील दलित मते हि कॉंग्रेस व भाजपा मध्ये विभाजित झाली. परंतु २०२३ च्या निवडणुकीमध्ये दलित व आदिवासी मते कॉंग्रेसकडे वर्ग झाली. संघ-भाजपाच्या भीतीयुक्त धोरणाला लक्षात घेवून मुस्लिमांची मते कॉंग्रेसच्या तळाला लागली. मताची हि बेरीज यावरच थांबली नसून कॉंग्रेसने ओबीसीना दिलेले जाती जनगणनेचे आश्वासन हा सुध्दा महत्वाचा घटक होता. नरेंद्र मोदी हे ओबीसी असून ओबीसीच्या अधिकारासाठी ते काहीच करीत नाही हे ओबिसीना कळू लागले असल्यामुळे ते भाजपाच्या हिंदुत्वापासून फारकत घेवू लागले आहेत.

या निवडणुकीमध्ये एकूण १२ मतदारसंघातील विजय हे २००० मतापेक्षा कमी मताच्या फरकाने झाले आहेत. यात सात भाजपाचे असून पाच कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. जयनगर या विधानसभा क्षेत्रात भाजपाने अवघ्या 16 मतांनी विजय प्राप्त केला. तर २५००० पेक्षा अधिक मताच्या फरकाने ७४ उमेदवारांना जिंकवीत मतदारांनी निर्णायक कौल दिला. ७९ विधानसभा मतदारसंघ असे आहेत कि ज्यात १० हजार ते २५००० हजाराच्या फरकाने उमेदवार विजयी झाले आहेत. २०२३ च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये  एकूण १८५ महिला उमेदवारापैकी केवळ १० महिला उमेदवार यशस्वी ठरल्या. त्यापैकी लक्ष्मी हेब्बाळकर यानी सर्व विजयी महिलांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने (५६०१६ मते) विजय प्राप्त केला. मागील २०१८ च्या निवडणुकीमध्येही त्या सर्वाधिक (५१७२४) मताने निवडून आल्या होत्या. नव्या विधानसभेतील निर्वाचित महिला उमेदवारापैकी कॉंग्रेसच्या चार महिला, भाजपाच्या तीन, जनता दल (से.) च्या दोन तर एक अपक्ष महिला आमदार आहे.  

कर्नाटकातील विभागवारीकडे बघितल्यास तेथे एकूण सहा राजकीय विभाग आहेत. हे विभाग म्हणजे बंगलोर,कित्तूर/मुंबई, मध्य, गुलबर्गा/कल्याण/हैद्राबाद, मैसूर/दक्षिण आणि तटीय क्षेत्र. निवडणुकीतील विभागवार ध्रुवीकरण बघितल्यास  बंगलोर विभागात कॉंग्रेसच्या जनाधारात २००८ पासून सातत्याने वाढ होत आहे. परंतु भाजपाच्या तुलनेमध्ये ती कमीच म्हणायला हवी, कारण या अर्बन विभागात भाजपाला बऱ्यापैकी फायदा झालेला दिसतो. याचा अर्थ मध्यमवर्गीय लोकांसाठी भाजप हि पहिली पसंती दिसते. कित्तूर हा भाजपाचा बालेकिल्ला परंतु यात कॉंग्रेसने बाजी मारत आपली संख्या १७ (२०१८) वरून ३३ (२०२३) पर्यंत वाढविली. भाजपाचे अधिक नुकसान मध्य विभागात झाले असून आधीच्या २४ जागेवरून ते ६ जागांवर मर्यादित राहिले. तर कॉंग्रेस १२ वरून २७ जागेवर विजयी झाली. गुलबर्ग/हैद्राबाद मध्ये कॉंग्रेस चांगल्या स्थितीमध्ये होती. या विभागात भाजपा व जनता दल या दोन्हीची एकूण विजयी जागेची संख्या व मताच्या टक्केवारीमध्ये घट झाली. कर्नाटकाची किनारपट्टी हा भाजपाचा सर्वात मोठा बालेकिल्ला व संघाची प्रयोगशाळा आहे. परंतु २०१८ च्या तुलनेत या निवडणुकीत (२०२३) भाजपाला मोठा पक्षघात होवून तोटा सहन करावा लागला. दुसरीकडे कॉंग्रेस ने आपल्या जागची संख्या ३ वरून ८ पर्यंत नेली आणि मताचा हिस्सा ३९.२ टक्के वरून ४१.३ पर्यंत नेला. तर भाजपची टक्केवारी ५१ टक्क्यावरून ४६.३ पर्यंत खाली आली. म्हणजेच संघ भाजपाच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या सांस्कृतिक व राजकीय विचारधारेला ब्रेक लागलाय असे म्हणता येते. असे का झाले! याचा विचार केल्यास त्याचे उत्तर त्यांच्या अतिवादी धर्मांधते मध्येच दिसून येते. सामान्य जनतेला सततचा असंतोष, दंगली, भांडणे व विवाद नको असतात. त्यांना शांतता हवी असते. ती अधिक काळ दुसऱ्याच्या द्वेष करू शकत नाही. संघ भाजपाने कर्नाटकाला दक्षिणेचा गुजरात बनविण्याचे ठरविले होते. परंतु कर्नाटकाच्या जनतेने ते मनसुबे पार धुडकावून लावले. राहुल गांधीच्या भाषेत सांगायचे झाल्यास कर्नाटकात अब नफरत का बाजार बंद और मोहब्बत कि दुकान खुली झाली. कॉंग्रेसच्या या विजयात राहुल गांधीची भारत जोडो यात्रा, प्रियांका गांधीची प्रभावी भाषा व भाजपाची  विखारी आग याही घटकांचा हातभार लागलेला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकतील पराभव हा जनतेने भाजपाला दिलेला इशारा आहे असे म्हणणे धाडसाचे होईल. पुढील काळात तेलंगना, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यातील निवडणुकांमध्ये मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार्या प्रचारानंतरही पराभव पत्करावा लागल्यास २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी जड जाईलच परंतु मोदी-शहा यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतील.  म्हणून आगामी काळ हा  केवळ भाजपालाच नव्हे तर भारतीयांसाठी सुध्दा मोठ्या उत्सुकतेचा राहील एवढे मात्र नक्की. 

बापू राऊत

ई-मेल :bapumraut@gmail.com

मो.न.९२२४३४३४६४ 



No comments:

Post a Comment