Wednesday, December 3, 2014

कर्तुत्वशुन्य नेतृत्व व दिशाहीन आंबेडकरी चळवळ

बहुजन समाज जितका दुभंगुन राहील तितकाच तो अधिकाधीक दुबळा होईल, त्याच्या दुबळेपनामुळे तो आपल्याला हाकवन्याजोगा होत राहील व नंतर त्याला पाहिजे त्या दिशेने वळवता येईल.  सत्ताधा-यांचे असे हे एक सूत्र असते. सत्ता हि शासन, प्रशासन व प्रशासनामार्फत जनतेला कंट्रोल करण्याचे साधन असते. याबरोबरच ती समाजव्यवस्था, धर्म व अर्थव्यवस्थेवरही वर्चस्व गाजवीत असते. त्यामुळेच सत्ता हि सत्ताधा-यासाठी सर्वस्व असते. म्हणून वर्चस्वाच हे गाजर नेहमी आपल्या हातात ठेवण्यासाठी सत्ताधारी लोक वेगवेगळी माध्यम शोधीत असतात. भारतात धर्म, देव व संस्कृती हि त्यांची माध्यमे तर आहेतच परंतु बहुजनात लाचार व स्वार्थी लोकांचा समूह निर्माण करून त्यांचा ते आपल्या सोयीसाठी माध्यम म्हणून वापर करीत असतात.
सत्तेची ताकद व त्यापासून होणारे फायदे बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी राजकीय व्यासपीठे निर्माण केली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया हि बाबासाहेबांनी निर्माण केलेली राजकीय व्यासपीठे होती. त्यांचा हेतू हाच होता कि सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती मध्ये बदल घडवून आणावा. म्हणून सत्तेच विस्तारीकरण व त्याचे विविध फायदे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक संस्थांचे जाळे निर्माण केले. विविध संस्थांचे हे नेटवर्किंगच नियोजित ध्येय गाठण्यासाठीचे शिलेदार असतात. बाबासाहेबांनी निर्माण केलेले नेटवर्किंग त्यांच्या अनुयायांना चालविता नाही आले. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच नेट्वर्किंग च्या माध्यमातून मध्यवर्ती सत्ता हस्तगत केली. त्यामार्फत आपला सनातनी एजंडा राबविण्यास सुरुवातही केली. बाबासाहेबांचे अनुयायी मात्र हे करू शकले नाही. ज्या ठिकाणाहून त्यांनी चालायचे ठरविले होते, त्याच ठिकाणी ते आजही आहेत.
बाबासाहेबांच्या चळवळीतून विकावू व स्वार्थी नेते निर्माण झाले. त्यांच्या अनुयायिक नेत्यांनी चळवळीची पूर्णत: दिशाभूल केली.  आंबेडकरी चळवळ पूर्णत: व्यक्तीकेंद्रीत केली. काही काळानंतर ती विभागवार विभाजित झाली. दादासाहेब गायकवाड, रा.सु.गवई, राजाभाहू खोब्रागडे व बी,सी.कांबळे यांनी स्वार्थासाठी एकमेकाचे नेतृत्व झुगारले. कांग्रेसने टाकलेल्या जाळ्यात हि नेतेमंडळी सहजच अडकलीत. दलित जनतेवर धर्म व जातीय अत्याचार झालीत तरी ते तोंडातून ब्र काढीत नसत. त्यातूनच मग तरुणांनी नेत्याविरुध्द विद्रोह करीत दलित पॅन्थरच्या  झेंड्याखाली अत्याचारित जनतेला न्याय व सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला गेला. याही परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष गटातटात कायम राहिलीत. आर्थिक विवंचना, पोलिसी अत्याचार वा वैचारिक भेद कि सत्ताधा-यांची फूस यापैकी कोणत्या कारणांनी पॅन्थर फुटली हे आजही गुलदस्त्यातच असले तरी पॅन्थरच्या चळवळीतून सत्तेचे बरेच नवे दलाल निर्माण झाले. रामदास आठवले हे त्यापैकी एक. कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सारख्या पक्षात फिर फिरून आता भाजपा व संघाच्या गलबल्यात दलितांचा प्रतिनिधी म्हणून वावरतोय. रामदास आठवले हे कोणत्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात? हे त्यांनाच विचारलेले बरे!
आंबेडकरवादी राजकीय चळवळीची घंटा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी कांग्रेसच्या गळ्यात बांधल्यानंतर आंबेडकरवादी सरकारी कर्मचा-यामध्ये अस्वस्थता पसरली. नागपूर व पुणे या शहरातील आंबेडकवादी कर्मचा-यांनी नवीन पर्याय शोधणे सुरु केले. मा. कांशीराम व दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने बामसेफ या कर्मचारी संघटनेची स्थापना झाली. बामसेफनी आपल्या कार्यक्रमाची रूपरेखा बामसेफ: एक परिचय या पुस्तीकेद्वारा मांडली. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या लिखित जाहीरनाम्यात होती. मा.काशीराम सारखा निस्वार्थी नेता चळवळीला लाभला परंतु राजकीय पक्ष निर्माण करण्याची प्रक्रिया व दुस-या फळीत निर्माण झालेला नेतृत्वाचा प्रश्न याची गुंतागुंत व त्यावर स्वार्थीपणाचे पुटे चढल्यामुळे बामसेफचे विभाजन झाले. हा चळवळीचा एक टर्निंग पाईंट होता. बहुजन समाजाची मातृसंघटना बनण्याची बामसेफची ज्योत तिथेच मालवली. मान्यवर कांशीराम हयात असेपर्यंत फुले आंबेडकरी राजकीय चळवळीचा धसका प्रस्थापित कांग्रेस व भाजपानी घेतला होता. त्यातच कांशीराम यांच्या नीतीमुळे बहुजन समाजात बसपाला आकर्षण प्राप्त झाले होते.
मा.काशीराम यांच्या पश्चात बसपात हाराकिरी झाली. मायावतींकडून बसपातील आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्याच्या सपाटा चालू करून कर्तुत्व नसलेल्या व चापलूसगिरी करणा-या लोकांना पक्षात महत्वाच्या पदावर स्थानापन्न करण्यात आले. त्यातच मायावतीने सर्वजन समाजाच्या नावाखाली ब्राम्हनांसी केलेली जवळीक हि कारणे मुख्यत: बसपाच्या राजकीय बरबादीची नांदी ठरत आहे. एका मोठ्या राज्यात सत्ता बळकावलेल्या बसपाची हि अवस्था होत असताना त्याला पर्याय देण्याची ताकद कोणत्याही आंबेडकरवादी नेत्यात नाही. रामविलास पासवान, उदित राज, रामदास आठवले यांच्या निष्ठा तत्वासी नसून सत्तेसी आहेत. आपली व्यक्तिगत सत्ता हेच सर्वस्व मानणारे समाजाचा केवळ स्वत:साठी वापर करीत असतात. प्रकाश आंबेडकर यांना वगळून सर्व नेत्यांना भाजप व संघाने सत्तेचे गाजर दाखवीत आपले दास बनविले. राजकीय आरक्षणाचा फायदा घेवून निवडून येणारे दलित प्रतिनिधी हे दलितांचे प्रतिनिधी नसतात तर ते त्या त्या राजकीय पक्षाचे गुलाम असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणूनच दलितांच्या कोणत्याही प्रश्नावर, हक्कावर व त्यांच्यावर होणा-या अन्यायाविरोधात संसद वा विधानसभेत “ब्र”  ही काढीत नसतात. त्यामुळे अशा राजकीय आरक्षणाची गरजच काय? असा प्रश्न निर्माण होतो.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी आंबेडकरवादी राजकीय चळवळीची अशी दारुण अवस्था केल्यानंतर ती राजकीय पोकळी भरून काढण्याचे व पर्याय देण्याचे सुतोवाच बामसेफच्या एका गटाने तर एंबस नावाच्या दुस-या गटाने केले. वामन मेश्राम प्रेरीत बहुजन मुक्ती पक्षाची स्थापना एकीकडे तर दुसरीकडे एंबसचे प्रवर्तक विजय मानकर यानी आंबेडकरवादी पार्टी फ इंडिया या पक्षाची स्थापना केली. हे अलीकडच्या काळात नवीन निर्माण झालेले पक्ष आहेत. यांचे पुन्हा गटतट निर्माण व्हायला पाच वर्षे तरी लागतील. एखाद्या गटातून फुटून निघालेला एखादा नेता जेव्हा आपला स्वत:चा नवा पक्ष स्थापन करतो, तेव्हा त्याच पक्षातील दुसरा नेता काही कालावधी नंतर त्यातून फुटून स्वत:चा नवा गट निर्माण करीत असतो. देशात व महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर चालनारे अनेक पक्ष आहेत. त्यातील अनेकांचे पक्ष हे कांग्रेस व भाजप या पक्षांचे अनुसूचित जातीजमातीचे उपपक्ष वा सेल च्या स्वरुपात काम करीत असतात. उद्देश एकच असतो, तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतातील अनुसूचित जाती /जमाती ह्या स्व:जातीच्या पक्षात व नेत्यांच्या नेतृत्वाखाली एकवटू नये. तसे झाल्यास उच्चजाती ह्या कधीच सत्तेच्या भोवताल फिरू शकणार नाही याची जाणीव त्यांना आहे. परंतु ह्याच जाणीवेचा अभाव अनुसूचित जाती/जमाती व त्यांच्या नेत्यामध्ये आढळतो.  It has not been a uniting force for dalit leaders, movements, and parties. Despite the convergence of many movement and parties towards the idea of Ambedkar, no all India Dalit ideology or movement has developed. Thus while everywhere the problems faced by Dalit are similar, in each region or state the Dalit movement has developed along its own trajectory with distinct feature and forms. 
सध्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक कच्चे पैलू आहेत. ही चळवळ केवळ प्रतिक्रियावादी झालेली दिसते. महापुरुषांच्या पुतळ्याची नासधूस व एखाद्यावर जातीय अत्याचार (उदा. जिवंत मारणे /बहिष्कार टाकणे) झाल्यास त्याची प्रतिक्रिया सहजच उमटते. परंतु उमटणारी ही प्रतिक्रिया एकसुरीही दिसत नाही. तर  त्यातून आपला स्वत:चा ठसा समाजासमोर कसा उमटवता येईल याचीच अधिक काळजी घेतल्या जाते.  स्वार्थी हेतूने गटातटाचे मोर्चे काढून व निवेदनाची पब्लिसिटी करून स्वत:ला चमकविण्याचा स्टंटच अधिक प्रमाणात केला जातो. दुसरीकडे मध्यमवर्गीय कर्मचा-यांची चळवळ ही केवळ सवलती संदर्भातील शासकीय उणीवावर बोट ठेवून दरवाजाबंद चर्चा घडवून आणण्यात धन्यता मानते. म्हणूनच अनुसूचित जाती जमाती मधील गरीब व अती गरिबांच्या प्रश्नावर लढणारी व अनुसूचित जाती/जमातीच्या व्यतिरिक्त इतर जातीच्या गरिबांचेही प्रश्न हाताळून व्यापक स्वरूपात रस्त्यावर लढणारी आंबेडकरी चळवळ अजून जन्मास यावयाची आहे असे म्हणावेसे वाटते.
आंबेडकरी चळवळीच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उभी फुट पडणे, अनेक गटतट निर्माण होणे व गटातटाच्या या लढाईत जो तरेल तोच समोर जाईल असा विचार कार्यकर्त्यामध्ये सोडून गटबाजीचे समर्थन करने ही महान चूकच नाही तर आंबेडकराच्या तत्वासी गद्दारी करने होय. कारण गटातटाच्या लढाईत कोणीही तरणारे व संपणारे नसतात तर उलट नवनवीन गटाची निर्मिती होत असते. केवळ एका नेत्याच्या नावावर व एकाच जातीसमुहाच्या बळावर शेकडो पक्ष काढणे हा नवा ऐतिहासिक इतिहास नाही तर आंबेडकरी चळवळीला लागलेला महारोग आहे. आंबेडकरी चळवळीला अशा रोगट नेत्यांची वाळवी लागलेली आहे. हि वाळवी आंबेडकरवादी राजकीय चळवळ नष्ट केल्यानंतरच दम घेईल असेच तूर्तास तरी वाटते.
तथाकथित नेत्यांचे ऐक्य होवून देशाच्या राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रातील विकासात वाटा मिळेल. अन्याय, सामाजिक बहिष्कार व गुलामासारखे जीवन जगण्याची अगतिकता नष्ट होईल अशी आशा शिक्षित व नोकरदार वर्गाची नसली तरी खेड्यापाड्यातील लाखो दलितांची आहे. कारण ब्राम्हनवादाच्या सामाजिक व धार्मिक अभिशापाचे तेच अधिक बळी ठरलेले आहेत. देशात खैरलांजी. जवखेड व झज्जर अशा घटना रोजच घडत असतात. फक्त त्या प्रकाशात येत नसतात. अशा अन्यायाला बळी पडणा-या दलितांनी कोणत्या नेत्याकडे आपली कैफियत मांडावी? आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधा-यासी भांडणारा, झगडणारा, हक्क मिलावून देणारा, आपल्याकडे प्रेमाने बघणारा नेता त्यांच्या दृष्टीपथात नाही. त्यामुळे आजची आंबेडकरी चळवळ हि नेताविहीन अशीच आहे. गटवादी नेत्यांचे जे घोळके दिसतात त्यात नेतेपदाचा स्पष्ट अभाव दिसतो. कोणी कोणाचे नेतृत्व स्वीकारावे? यावर सारे अडले आहे. आज कोणताही नेता आपले नेतेपद सोडून कार्यकर्ता बनण्यास तयार नाही. जनता सुध्दा वेगवेगळया नेत्यामध्ये विभागलेली असल्यामुळे प्रत्येक नेत्याला आपणच इतरापेक्षा मोठा असल्याचा भास होतो. आपल्या कर्तुत्वाने भुरळ पाडणारा असा कोणताही नेता आंबेडकरी चळवळीमध्ये नसल्यामुळे ही चळवळ दिशाहीन झालेली आहे. जोपर्यंत ही चळवळ दिशाहीन राहील तोपर्यंत प्रस्थापितांच्या सत्तेला कोणीही सुरुंग लावणार नाही व ती कायम राहील हेही तेवढेच खरे.


बापू राऊत

No comments:

Post a Comment