Tuesday, December 9, 2014

भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी हे संघीय षडयंत्र

नरेंद्र मोदीने “गुजरात” माडेलचे गाजर सर्व देशवाशियाना दाखवून संपूर्ण देशाचा विकास हा गुजरात प्रमाणे करु, परदेशातील काळा पैसा देशात आणून भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट करू, भ्रष्टाचा-यांना तुरुंगात टाकण्यात येईल, देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची हमी देण्यात येईल असे अनेक आश्वासन व आमिषे जनतेला दिले होते. सोबतच त्यांनी आपण मागास जातीचे आहोत, एका मागास समाजाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविणे हे तुमच्याच हाती आहे असे भावनिक आवाहन त्यांनी ओबीसींना करीत आपण चायवाला असल्याचे सांगत या देशातील गरिबांचेही मनेही जिंकली जिंकली. या आश्वासनाच्या बळावरच लोकांनी मोदीला न भूतो न भविष्यती
असे मतदान करून संपूर्ण बहुमत दिले. जनतेनी हे बहुमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व त्यांच्या नीतीला दिले नव्हते. जनतेने हे बहुमत राम मंदिर, भगवतगीता, संस्कृत, वेद पुराने यांना बघून दिले नव्हते तर त्यांनी केवळ विकासाचे स्वप्न बघून  मोदींना सत्तेत बसविले. परंतु या बहुमताचा गैरफायदा संघ व त्यांच्या विविध संघटना घेत आहेत. देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडविणे सुरु केले आहे. सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्मुर्ती इराणी ह्या शिक्षण क्षेत्रात वेद व पुरानाणा घुसवून देशाला अंधारयुगात ढकलीत आहेत. गिरीराज किशोर, निरंजन ज्योती, हरियानाचे मुख्यमंत्री खत्तर यांनीही देशहित व समाजद्रोही घोषणा केल्या आहेत. तर आता सुषमा स्वराज यांनीही त्यात उडी मारून भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी करून केवळ  घोषणा करणे बाकी आहे असे एका संघप्रणीत कार्यक्रमात सांगितले.

यावरून भारतीय जनता पक्षालाच नव्हे तर नरेंद्र मोदीनाही देशाच्या विकासातच नव्हे तर देशात सामाजिक सलोखा निर्माण करण्यात कोणताही रस नसून केवळ संघाला खुश करण्याचे धोरण त्यांच्याकडून आखण्यात येत आहे. म्हणूनच ते ज्या ज्या देशात जात आहेत त्या त्या देशाच्या प्रमुखांना भगवतगीता वाटत फिरत असतात. संघाचा प्रचारक म्हणून ते जग फिरत आहेत. नरेंद्र मोदीचे नाव प्रधानमंत्री पदासाठी व पक्षाचा प्रचारकप्रमुख करण्यात संघ व नरेंद्र मोदी यांच्यात हिंदुत्ववादी एजंडा राबविण्याचा समझोता झाल्याची अधिक शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून नरेंद्र मोदीने चूप राहणे पसंत करीत इतरांना ते धर्माच्या नावाखाली देशात दुफळी माजवून हिंदुराष्ट्र निर्मिती व ब्राम्हनवाद कसा रुजवता येईल यासाठी मोकळीक देत असावेत. भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाच्या दर्जाची मागणी ही संघाच्या कूटनीतीचा भाग आहे. हिंदू धर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वण्याचे संरक्षण ही संघाची सामाजिक भूमिका आहे. त्यामुळे ते जो जो संघविरोधी तो तो हिंदुविरोधी असे लेबल त्यांचे कार्य न मानणा—यावर वा टीका करणा-यावर चीपकावित असतो.
भगवतगीता हि श्रेष्ठ कशी आहे? हे सांगण्यात भाजपा व संघ नेत्यात चढाओढ सुरु झाली आहे.  अशोक सिंघलने तर गीता हि देशाच्या राज्यघटनेपेक्षा मोठी आहे असे म्हटले आहे. या देशातील संघीय ब्राम्हणांना सर्वधर्मसमानतेची व एकोप्याने राहण्याची अक्कल त्यांच्या वेद, पुराने व गीतेने दिली नाही हा मोठा दुर्वविलास आहे. हा देश केवळ हिंदूंचा नाही. या देशात विविध धर्म व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. त्या त्या धर्माचे पूज्य ग्रंथ आहेत. एखाद्या धर्माचा ग्रंथ दुस-या धर्माच्या लोकांसाठी कसा पूज्य ठरू शकतो?. भगवतगीतेचे उदाहरण घेतल्यास ती सर्व हिंदुनाही पूज्य नाही. सद्सद्विवेक बुद्धिनिष्ठ स्त्रियांना तर ती नाहीच नाही. परंतु ८५ टक्के मागासवर्गीय लोकांना ती मान्यच नाही. असे असताना कोणाला व कशासाठी गीतेचे महत्व वाढवायचे हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले आहे. या गीतेमध्ये असे काय दडलेले आहे कि तिला अधिक महत्व द्यावे? या गीतेला अनेकांनी आपापल्या परीने विरोधाभाषी स्वरूपात वापरले आहे. अनेक हिंदू विद्वान गीतेला महत्व देत नाहीत. मेघनाद देसाई हे तर गीता हि  सेक्युलर नाही असे मानत गीतेच्या लेख व तत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. अमेरिकेतील संस्कृतच्या विद्वान वेंडी डनिगर ह्यांनी हिन्दुइसम –अन आल्टरनेटीव्ह हिस्ट्री ह्या ग्रंथात वेद पुराने व गीता यातील सत्य बाहेर काढल्यामुळे ते पुस्तकच विक्रीला येवू नये म्हणून संघाच्या विविध संघटनांनी प्रकाशकावर दबाव आणून ते पुस्तकच बाजारातून काढून घेण्यात आले.

गीतेतील तत्वज्ञान नेमके आहे काय? याविषयी अनेक उलटसुलट मते प्रचलित असलेली दिसतात. गीता हा मोक्षप्रद ग्रंथ वा तो मोक्ष शास्त्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मीची सर्व पापे नष्ट होवून तत्काळ मोक्षास पावणे तर सोडाच, परंतु जाणीवपूर्वक गीतेचे निट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे मला मोक्षलाभ प्राप्त झाला असे सांगणारा कोणी अस्तित्वात आहे काय? आजपर्यंत कोणत्याही ब्राम्हणाने व साधूने तसा दावा केला नाही. यावरुन गीतेचा व मोक्षाचा काहीही सबंध नाही हे सिद्ध होते. मुळातच मोक्ष ही केवळ एक कल्पना आहे त्यापलीकडे दुसरे काहीही नाही.

लोकांच्या भोळसटपणाचा फायदा घेवून त्यांना विविध कर्मकांडामध्ये गुंतवून त्याद्वारे स्वत:चा गोरखधंदा व्यवस्थित चालवायचा तर मुळात लोकांच्या मनात आपण पापी आहोत, आपण पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्ये केली आहेत ही भावना रुजवावी लागते. हिंदू धर्मात ही भावना पुनर्जन्माच्या माध्यमातून साधलेली आहे. त्यामुळे ‘आजवर मी काहीही पापे केलेली नाही‘ अशी खात्री असणा-यांनासुद्धा तुम्ही पूर्वजन्मात अनेक पापे केली आहे असे सांगण्याची सोय ब्राम्हण पुरोहित समूहाकडून करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्म हा दुसरे तिसरे काहीही नसून तो केवळ कर्मकांडे, याज्ञिक, सामाजिक, राजकीय व सोवळ्याओवळ्याचे नियम  व बंधने या सा-यांचे कडबोळे आहे. हा धर्म नसून निव्वळ हे करा व ते करू नका अशा आज्ञा व बंद्या यांचे सामिश्रण आहे.

व्यापारी वृत्तीचे लुटारू फक्त व्यापार व राजकारण या क्षेत्रातच असतात असे नसून ते अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान, शिक्षण, मंदिरे, मठ वगैरे सर्व क्षेत्रात शिरून पैसे जमविण्याचा धंदा सुरु केला आहे. श्रोत्याच्या व  वाचकाच्या मनात श्रद्धा व भीतीयुक्त आदर निर्माण व्हावा म्हणून त्यासाठी ते धर्मग्रंथ, पोथ्या, पुराने, गीता यासारखे ग्रंथ लिहिण्यात आले. या ग्रंथांचीच भीती सामान्य लोकांना दाखविण्यात येते. या धर्मग्रंथाच्या लेखकांनी आपले नाव गुप्त ठेवीत हे ग्रंथ प्रत्यक्ष ईश्वराने लिहिले आहेत अशी थाप मारलेली दिसते. तर या ग्रंथाचा ज्यांना सरळ फायदा पोहोचतो ते सांगतात की, गीतेतील ज्ञान हे अत्यंत प्राचीन आहे, हे ज्ञान परम असून ते ईश्वराचे खास कृपापात्र आहे, हे ग्रंथच तुमचे एकमेव तारणहार आहेत. त्यामुळे सर्व धर्माचा त्याग करून ग्रंथातील देवांना शरण जाणे हाच तुमच्या पापमुक्तीचा मार्ग आहे. पापमुक्तीचे फळ फक्त श्रद्धा ठेवणा-यांनाच लाभते. संशयी वृत्तीच्या व चिकित्सक लोकांचा मात्र विनाश होतो. त्यांना लोकी व परलोकी कोठेच सुख मिळत नाही. असे ते लोकांना ठासून सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात असे काहीही होत नसते.

धर्ममार्तंडाकडून श्रीकृष्णाच्या ईश्वरत्वाचा व  त्याच्या ठायी असणा-या अतिमानवी शक्तीचा पुरावा म्हणून त्याचे सुदर्शन चक्र, द्रोपदीचा धाव्यास दिलेला प्रतिसाद, जयन्द्रथ वधाचे वेळी सुदर्शन चक्राने सूर्य झाकणे वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. परंतु आपली सद्सद्विवेक बुद्धी कायम ठेवून समजून घ्यायला पाहिजे की, असे दैवी सामर्थ्य कृष्णाजवळ असते तर त्याने अर्जुनाला गीतोपदेश करून युध्दाचा पसारा मांडण्याऐवजी त्याने फक्त दुर्योधन, दू:शासन, शकुनी, धृतराष्ट्र, कर्ण यांनाच काय तो सरळ उपदेश करून व त्यांचे हृदय परिवर्तन घडवून समेट करने कृष्णाला सहज शक्य झाले असते. परंतु ते जमेल असे वाटत नव्हते तर लाखो निरपराध लोकांना युध्दात लोटण्यान्याऐवजी सरळ सुदर्शन चक्राने दुर्योधन व त्याच्या कंपनीला यमसदनी का पाठविले नाही? म्हणजे सर्व प्रश्न एकदम निकाली निघाले असते. परंतु हे ही कृष्णाला जमलेले दिसत नाही. ज्या अर्जुनावर कृष्णाचा वरदस्त होता त्या अर्जुनाचा पराक्रम तरी काय? तर जयद्रथ, द्रोणाचार्य व कर्ण यांना कपटाने मारणे हा होता.
त्याकाळात सर्व सामान्य लोक संस्कृत बोलत असत असा कोठेही पुरावा दिसत नाही. संस्कृत ही केवळ देवाची म्हणजे ब्राम्हणांची भाषा होती. अर्जुन व कृष्ण हे दोघेही ब्राम्हण नव्हते. अर्जुन क्षत्रिय तर कृष्ण हा यादव कुळातील शूद्र. या दोघानाही संस्कृत येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे कोणतेही संभाषण हे त्याकाळच्या बोलीभाषेतच झाले असेल. त्यामुळे संस्कृत भाषारूपी गीतेचे भारुड हे  कोण्या ब्राम्हनानेच रचले आहे यात शंकाच उरत नाही. त्यामुळे कृष्णाने अर्जुनास न सांगितलेल्या गोष्टी ह्या गीतेमध्ये घुसविल्याची अधिक शक्यता आहे.

गीतेतील सारांशाकडे ढोबळमनाने बघितल्यास गीतेचा मूळ उद्देश हा “चल उठ आणि युध्दाला लाग” असा मोजक्या शब्दात असताना त्यामध्ये स्थितप्रज्ञ, दैवी व आसुरी संपत्ती, पुनर्जन्माची प्रक्रिया, ध्यानयोग, भक्तियोग, यज्ञ ह्याचा पसारा ऐन युध्दभूमीवर कृष्ण कशाला मांडत बसला.? कृष्णाला अर्जुनाकडून हे सारे करवून घ्यायचे होते तर त्याने अर्जुनाला संमोहित करून आदेश देवू शकला असता. पण तसे त्याने केलेले दिसत नाही. गीतेतील प्रमुख उपदेश म्हणजे “निष्काम कर्मयोग”. निष्काम कर्मयोग म्हणजे कोणतेही काम करताना त्यातून अपेक्षित असणारा लाभ आपणाला मिळेलच अशा खात्रीची आशा बाळगू नये. परंतु खुद्द कृष्ण गीतेच्या आरंभास (२.३७) “युध्दात तू जर मारला गेलास तर स्वर्गप्राप्तीचे सुख उपभोगसील  आणि जिंकलास तर पृथ्वीवरचे साम्राज्य उपभोगशील असे आमिष अर्जुनास दाखवून त्याला युध्द प्रवृत्त केलेले दिसते. तर मग कृष्णाच्या उपदेशास निष्काम कर्मयोग कसे म्हणता येईल.? एकीकडे म्हणायचे एवढी हत्या करूनही पाप लागणार नाही तर दुसरीकडे युध्द न केल्यास पाप लागण्याचे भयं दाखवायचे याचा अर्थ काय? (१८:६६). अर्जुना, लोकांच्या मताची पर्वा न करता मी सांगेन तसतसे वाग, म्हणजे तू युध्दात विजयी होशील, हत्येमुळे लोक तुला दोष देतील, याची तू काळजी करू नकोस हे गीतेतील ज्ञान आजच्या कोणत्या सामाजिक तत्वात बसते? आजच्या परिस्थितीमध्ये ते कोणत्या उपयोगाचे व फायद्याचे. गीतेमध्ये अशा अनेक विसंगती व परस्पर विरोध भरलेला दिसतो. त्यामुळेच गीतेची रचना हि वास्तवता  नसून केवळ कवी कल्पना आहे हे स्पष्ट होते. भगवतगीतेच्या निर्मितीचा कालखंड हा मुख्यत: मौर्य राजा बृहदत्त व पुष्यमित्र शुंग यांच्यात झालेल्या युध्दानंतरचा आहे. या दोघांच्या युध्दाचे वर्णन म्हणजे भगवतगीता होय. सम्राट अशोकाने उपस्थित केलेले अनेक प्रश्न भगवत गीतेमध्ये आढळतात. अमेरिकेतील संस्कृतच्या विद्वान वेंडी डनिगर ह्यांनी हिन्दुइसम –अन आल्टरनेटीव्ह हिस्ट्री ह्या ग्रंथात केलेल्या नोंदीवरून त्यास पुष्टी मिळते. त्या म्हणतात, The Mahabharat story may have begun earlier than that of the Ramayan, but the text that we have was probably composed in North India between approximately 300 BCE and 300 CE , after Mauryas and before the Guptas. It is therefore share the general chronology of the Ramayan, entre deux empires, a time shifting political and economic power. The Mahabharat is set in and around the earlier capital of Hastinapur, already a great city in the age of Bramhins, instead of the Ramayanas cities of Rajagriha in Magadh and Kashi in Kosala which were setteled latter, it tells  the new version of old stories.

भारतात अनेक प्रथांचा व धार्मिक जुलमाचा कहर माजल्यानंतर बौध्द, जैन या निरीश्वरवादी धर्माचे प्राबल्य वाढून लोक कर्मकांड, दान वैगेरे बुद्धाचा मार्गक्रमण करू लागले. परिणामी पंडे पुरोहित यांचा धंदा संकटात आल्याने, कोणीतरी कृष्ण भक्तीचे स्तोम प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने रचलेला हा कट दिसतो.  कोणत्या तरी व्यक्तीने कृष्णाच्या नावे रचलेले हे कुंभाड आहे स्पष्ट होते. या वरुण गीता म्हणजे कुरुक्षेत्रावर कृष्ण अर्जुन यांच्यामध्ये  प्रत्यक्ष घडलेले संवाद नसून तिच्या अनेक लेखकांनी काही सार्थक, निरर्थक, काही उपयोगी, काही निरुपयोगी  तर काही हास्यास्पद विचाराची सरमिसळ केलेला ग्रंथ आहे असेच दिसते. काल्पनिक गोष्टीचा बागुलबुवा उभा करून पिढ्यानपिढ्या लबाडांच्या कारस्थानास लोक आजतागायत बळी पडलेले दिसतात. सर्वसामान्य लोक तर सोडाच  सुविद्य विद्वानही या कारस्थानास बळी पडलेले आहेत. गीतेतील ह्या बाबी किती निरर्थक व टाकावू आहेत याचे भानही त्यांना दिसत नाही.

भारतीय राज्यघटना व भगवतगीता याची तुलना कधीही होवू शकत नाही. राज्यघटना ही राष्ट्राची नियमावली आहे. त्यानुसार देश चालतो. भगवतगीतेचे काय? ती एका पंथाची पोथी. भगवतगीता असमानता शिकविते. ती स्त्रि व गरीबावर अन्याय करते. ती कोणत्याही दिशेने हिंदुचीही नाही. कारण भगवतगीते मध्ये हिंदू, हिंदुत्व वा हिंदू धर्म यापैकी कसल्याही शब्दाचा उल्लेख नाही. त्यामुळे जबरदस्तीने भारतीयांच्या डोक्यावर संघाची व ब्राम्हणाची प्राणप्रिय भगवतगीता लादल्यास देश कलहाच्या दिशेने मार्गक्रमण करणार नाही हे कशावरून? त्यामुळेच संघवाल्यांनी देशविरोधी उचलेगीरी बंद करने गरजेचे आहे.


लेखक: बापू राऊत

3 comments:

  1. kauva biryani khanar ka?

    ReplyDelete
  2. nila talibani,
    tuzyakadun dursi apekha pan kay karnar?

    ReplyDelete
  3. गीतेला हिन्दू धर्मियांतूनच विरोध सुरू झालेला आहे. यासंबंधी लोकमतमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. गीता आणि गाथा असे त्याचे हेडिन्ग आहे. लोकमताचे पत्रकार सूर्यकांत पळसकर यांनी हा लेख लिहिला आहे. गीतेऐवजी तुकाराम महाराज यांच्या गाथेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पळसकर यांनी या लेखात केली आहे. आता बोला. हा लेख पुढील लिन्केवर वाचता येईल -

    http://suryakant-palaskar.blogspot.in/2014/12/blog-post_19.html

    ReplyDelete