Wednesday, December 31, 2014

विवेक जागृत करू पाहणारा “ पिके ”

अध्यात्म हा मानवाला गुढतेकडे नेणारा मार्ग आहे. तो माणसातील स्वत्व हिरावून घेतो. माणसाला वाटत असत अध्यात्मवाद हा माझ्या सर्व समस्याच उत्तर आहे. म्हणून तो पुंजापाठ, मंत्रपठण, चालीसा, देवाला नैवद्य दाखविणे असे प्रकार करीत असतो. या सर्व गोष्टी केल्याने व त्यात तथ्य असेल चुटकीसरशी जीवनामरनाचे प्रश्न का सुटत नाहीत? माणसाला कष्ट का करावी लागतात?. कार, संगणक, ध्वनीयंत्रना, दूरदर्शन, मोबाईल्स यांची निर्मिती अध्यात्माने केली आहे का?. याचा विचारही माणूस करताना दिसत नाही. आपण ज्या सुख व समृद्धीसाठी तळमळतो,  नित्यनेमाने पूजापाठ करतो,
उपासतापास, उत्सव सोहळे, गंडदोरे, अष्टधाम यात्रा, दर्शनासाठी रांगा लावतो, साधुना व मंदिरात दान देतो तरी आम्ही सुखी व स्वस्थ का नाही? रोगराई, दवाखाने याचा आटापिटा सदैव आमच्याच पाठीशी का? परंतु ईश्वराला कधी हातही न जोडणारे, नतमस्तक न होणारे, उपासतापास न पकडणारे नास्तिक सुखी कसे? असे प्रश्नही श्रध्दाळू लोकांच्या मनात निर्माण होत नाहीत. एवढे निर्बुध्द या अध्यात्मावाद्यांनी लोकांना बनवून ठेवले आहे.
विवेकवादी हा इहवादी असतो. तसेच तो व्यवहारी आणि वास्तववादी असतो. केवळ तात्त्विक आदर्शांना कटाळून राहात नाही तर तो तर्काने पुढे जातो. त्यांनीच तर्कातून विज्ञान निर्माण केले. आपल्या देशाची ऐहिक प्रगती व्हावी असे इतरांप्रमाणे त्यालाही वाटते. विवेकवादी विचारसरणीचा प्रसार व्हायला हवा. असे विवेकवादी माणसाला मनापासून वाटते. त्यामुळे तो सामाजिक बांधिलकी मानत शक्य होईल तेवढे जनप्रबोधनाचे काम करण्यात प्रयत्‍नशील असतो. मात्र देव-धर्म-श्रद्धा यांच्या नावाखाली श्रद्धाळूंना सतत अज्ञानात ठेवून त्यांचे निर्दयपणे आर्थिक शोषण करणार्‍या धूर्त दांभिकांविषयी मात्र नाइलाजास्तवे चिडून उभे व्हावे लागते.
जगात असा कोठेही आदर्श धर्म नाही, पण प्रत्येक धर्म स्वत:लं आदर्श मानीत असतात. धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा धर्मदलालांचा प्रयत्न चालू आहे. धर्माची प्रवचने, कीर्तने, मंदिराचे व देवतांचे उदंड पिक समाजात आले आहे. अशा अधर्माकडे केवळ सामान्य जनच नाही तर शिकलेली, मोडेलिंग करणारी, हाफ स्कर्ट व पॅट घालणारी तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. आस्थेला धर्मांधतेकडे वळविण्यात, धर्मभावनेचे  व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करण्याचे प्रकार तेजीत चालू आहेत. लोकांच्या प्रश्नावर कामे करून मते मागण्या ऐवजी लोकांची धर्मभावना उद्दीपित करून सत्तेकडे जाण्याचा राजकीय शार्टकट धर्मात व मंदिरात शोधला जात आहे. धर्माचे भ्रष्टीकरण साधनीकरण होण्याचे भयं वाढले आहे. त्यामुळे अशा धर्मांची व धर्मदलालांची चिकित्सा होणे फार गरजेचे झाले आहे. धर्मचिकित्सा हि चित्रपटाच्या माध्यमातूनही करता येते. त्याचा समाज मनावर मोठा प्रभाव ही पडत असतो.
देशात नुकताच आमिरखान यांची मुख्य भूमिका असलेला पिके नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा निर्माता व संवादलेखक हे दोघेही हिंदू आहेत. चित्रपटाला देशभरातून व विदेशातून मोठा प्रतिसाद मिळत असताना चित्रपटामध्ये हिंदुधर्माची खिल्ली उडविण्यात आल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदु जनजागृती समिती या संघटनानी "हिंदु धर्मीयांच्या भावना दुखाविणाऱ्या या चित्रपटावर तत्काळ बंदी आणली जावी,‘ अशी मागणी केली आहे. धर्माचे ठेकेदार म्हणविणारे लोक हा  चित्रपट "लव्ह जिहादचे समर्थन करणारा असून, यामध्ये हिंदू धर्मावर टीका करणारे वाक्य आहेत त्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या संघटनांनी लोकशाही मार्गाने नाही तर दंडेलगिरी व तोडफोड करून  बंदी आणण्याची मागणी केली आहे. बहुसंख्य समाज चूप राहून चिंतन करीत असताना या तीन टक्के धर्मदलालांना हिंदू धर्माचा ठेका कोणी दिला?
चित्रपटावर बंदी आणावी असे या आहे तरी काय? असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. चित्रपट बघितल्यानंतर मात्र तथाकथित धर्माचे ठेकेदार बंदीची मागणी का करतायत? याचा खुलासा होतो. हा चित्रपट देव व भक्तगण यामध्ये जे दलाल असतात त्या दलालांचे पितळ उघडे पाडणारा आहे. धर्माच्या दलालावर यात सडकून टीका केली आहे. यात हिंदू, इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या दलालांनी जी समाजात बुजबजगिरी निर्माण केली त्यावर आघात करणारा आहे. एकूणच धर्म व देवाच्या नावाखाली लुबाडणूक कारण-या दलालापासून सावध राहण्याचा इशारा देणारा तर आहेच परंतु काही प्रश्नही निर्माण करणारा व त्याचे उत्तर देणाराही आहे.  काही विशिष्ट गुणांनी युक्त असलेला अलौकिक ईश्वर अस्तित्वात आहे हे अध्यात्मवादी भक्तांना देव कोपन्याची भीती दाखवून अंधश्रध्दाळू कसे बनवीत असतात?. मानवी तर्कबुद्धीला पटावा असा ईश्वराच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा अथवा युक्तिवाद अद्यापि उपलब्ध नाही. केवळ कल्पनांच्या अकलेचे तारे तोडून अध्यात्माची शाळा पाखंडी चतुरांनी निर्माण केली आहे. मानवता हि सर्वश्रेष्ठ असून हिंदु व मुस्लिम यांच्यामध्ये काहीही फरक नाही. परस्पर विश्‍वास व श्रद्धा हे आपल्या आयुष्याचे महत्त्वपूर्ण घटक आहेत, माणूस जन्मास येताना त्यावर कोणत्याही जातीचा व धर्माचा ठप्पा नसतो, मग आपण जाती व धर्म अशा फालतू गोष्टीसाठी का भांडावे? हा संदेश या चित्रपटातून मिळतो.
धर्माच्या नावावर दंगली घडविण्यात येतात, लव जिहादच्या नावाखाली तरुणांच्या भावभावनांचा व त्यांच्या भविष्याचा चेंदामेंदा करण्यात येतो. बहु लाव बेटी बचाव असे नारे देवून समाज तोडण्याचे प्रयत्न या देशातील धर्ममार्तंड करीत आहेत. एकीकडे सामान्य भक्त लुबाडल्या जात आहेत तर दुसरीकडे देवांचे दलाल करोडोपती बनत आहेत. असे का होत आहे? यावर विचारप्रवण करा असे सांगणारा हा चित्रपट आहे. विवेकवादी भूमिका ठासून मांडणारा भारतातील एकमेव चित्रपट असे “पिके” चे वर्णन करावे लागते.

आज खरेच धर्माची गरज आहे का? हाच मोठा कळीचा मुद्दा आहे. माणूस धर्माशिवाय जिवंत राहू शकत नाही काय?. या देशातील श्रध्दभक्त धर्माच्या दलालावर विश्वास ठेवून धर्मांध व दंगलखोर बनत आहे. त्यामुळेच धर्मावर निष्ठा ठेवणारा सात्विक व भोळा असतो हे प्रमेयच चुकीचे आहे. असे असते तर काटो, मारो, खून करो, मंदिर-मस्जिद गिरावो, हरामजादे, रामजादे असे शब्द या श्रध्दावानांच्या तोंडी आलेच नसते. याउलट देव व धर्म न मानणारा माणूस हाच अधिक मानवतावादी व सात्विक असतो. कारण तो कधीच या दलालांच्या तावडीत सापडत नसतो. तो कधीच काटो, मारो, जलावोच्या भानगडीत पडत नसतो. धर्माला व देवाला न मानणारी व्यक्ती व त्यांचे कुटुंब सदैव सुखीच जीवन जगतात.

पिके ला विरोध करणारे म्हणतात, हिंदुच्या देवदेवतावरच टीका का? अशी टीका करणारे हे वास्तव स्थितीपासून पळणारे असतात. या देशातील ८५ टक्के जनतेला हिंदुत्वाचे लेबल लावले आहे. यापैकी ७० टक्के हिंदू जनतेची  देव, धर्म व दलालांच्या आस्थेमध्ये हजारो वर्षापासून पिळवणूक होत आहे. दरवर्षी हजारो लोक तीर्थक्षेत्रात व यात्रेच्या प्रवासात मरत असतात. वर्षभर कष्ट करून जमा केलेली पुंजी धर्मयात्रा, पूजापाठ, जेवनावळ्या व भटजी यावर खर्च केली जाते. असे केले तरी या कष्टक-यांना मिळते तरी काय? तेच कष्ट, तेच दु:ख, तीच मानहान, तीच गरिबी. याउलट धर्माचा धंदा करणा-याकडे बघा, श्रीमंतीत लोळतात, विदेशवा-या करतात, करोडो रुपयाचे धनी असतात, मुले मुली विदेशात शिकतात. रामदेव बाबा, श्री श्री, आसाराम, सत्य साईबाबा, नित्यानंद,  पॉल दिवाकरन, रामपाल असे लाखो धर्माचे दलाल करोडोपती आहेत. यांच्याकडे एवढी संपती कशी व कोठून आली? त्यांच्या भक्तांनी हा प्रश्न का विचारला नाही? आता तर काही उद्योगपतीही धर्माचा धंदा करायला लागले आहेत. उद्या ते धर्माला उद्योगाचा दर्जा देण्याचीही मागणी करणार नाहीत हे  कशावरून?

पुढच्या काळात देव, धर्म, आस्था व धर्मदलाल यांच्यावर टीका करणे वा विरोधात ब्र काढणेही कठीण होणार आहे. कारण या धर्मवादी दलालाकडे स्वत:चे भाडोत्री सैनिक असतील. ते कधीही कोणावरही तुटून पडतील. त्यांचे कोणीही बिघडवू शकणार नाही. राजकारणी तर अशा दलालांचे पाया पडण्यास सदैव तयार असतातच. यात भरडला जाणार तो सामाण्यजनच. नावापुरते असलेले सरकार केवळ बघ्याची भूमिका घेईल. एक तालिबानी देश असे लेबल लागण्यास फार काळ लागणार नाही. अमेरिकन विमाने जसे तालिबान्यांच्या ठिकाणावर बाम्ब हल्ले करून तालीबानान्या पकडते तोच प्रकार भारतातही घडून हिंदू आंतकवाद्यांना पकडण्याचे काम भविष्यात अमेरिकेला करावे लागेल.    

म्हणून पिके चित्रपटाकडे डोळसपणे पाहण्याची व विचार करण्याची वेळ आली आहे. धर्मातील मूळची तत्त्वे आणि त्यांचे आचरण ह्यातील नेमकी तफावत कोणती आहे, ज्यामुळे हे सगळे घडते आहे? ह्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पिके च्या निमित्ताने आपला विवेक जागृत करण्याची वेळ आली आहे. हा विवेक आहे तरी काय? सारासार विचार करण्याची शक्ती. विवेचक बुद्धी. खरे काय-खोटे काय, चांगले काय-वाईट काय, न्याय्य काय-अन्याय्य काय, नैतिक काय-अनैतिक काय इत्यादि भेद जाणण्याची क्षमता म्हणजे विवेक होय." चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन. ते कधीही घडत नाहीत. कोणालाही शक्य नाही हे समजण्याची कुवत म्हणजे विवेकबुद्धी. असा विवेक आपल्यात निर्माण झाल्यास माणसाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणारे, लुटणारे लबाड आणि धूर्त लोकांचा डाव समाप्त होईल. ‘श्रद्धेमुळे आर्थिक शोषण होते याचे ज्ञान प्राप्त होईल असा विवेकवाद “पिके” च्या निमित्ताने सर्वसामान्याच्या मनात रुजला तर तो कोणाला नको आहे? 

बापू राऊत

मो.न.९२२४३४३४६४


No comments:

Post a Comment