कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद व प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना व एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय लढे हे एकाच वेळेस व एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता व सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.